Thursday, August 16, 2012

सलाम लंडन ! अलविदा !

बँड –बाजा- बारात सगळे छान झाले आणि निरोपाची घडी जवळ आली तशी लंडन
नगरीला पुन्हा हुरहूर लागली. बिदाईच्या कार्यक्रमापर्यंत अगदी जोषात,
नाचत –गात उत्साहात सगळे पार पडले. सतरा दिवस धगधगणारी ऑलिंपिक ज्योत
विझली. लंडनच्या ‘या’ घरचा लाडका ऑलिंपिक ध्वज रिओच्या ‘त्या’ घराकडे
सोपवण्यात आला, तेव्हा यजमानांच्या वतीने ते कार्य करणाऱ्या लंडनच्या
मेयरच्या चेहऱ्यावर सोहळा यथासांग पार पडल्याचे अपूर्व समाधान दिसत होते.

कार्याची धामधूम संपली तशी, ‘सोहळा कसा बाकी झकास झाला’, अशी चर्चा इथे
सुरू आहे. उद्घाटन सोहळा अर्थवाही होता, समारोपाला त्याची सर नव्हती, अशा
प्रतिक्रियाही येत आहेत. एकूणच ब्रिटीश संस्कृतीला गोंजारणारा, इंग्लिश
विकासाचे टप्पे दाखवणारा डॅनी बॉयलचा कार्यक्रम साहेबाला एकदम पसंत पडला
होता. त्यातून इंग्रजी अभिमान (आणि किंचित अहंकारही) कुरवाळला गेला. तसे
किम गॅविनच्या आफ्टर शो पार्टीतून ब्रिटीशांचे संगीत प्रेम आणि
सेलिब्रेशनचे कल्चर दिसून आले. पण या सगळ्यापेक्षा अधिक कौतुक सध्या होत
आहे, ब्रिटीश अॅथलिट्सचे. तिसऱ्या क्रमांकावर येऊन गेल्या शंभर वर्षातली
सर्वोत्तम कामगिरी इथल्या खेळाडूंनी यंदाच्या ऑलिंपिकमध्ये केली आहे.

आपल्या परंपरा, संस्कृती, ज्ञान, समृद्धी याबाबत पराकोटीचा अभिमान असलेला
साहेब, गुणीजनांचे कौतुक करताना मात्र हातचे काही राखत नाही. या
ऑलिंपिकमधून तेही जाणवले. सुरुवातीला आपल्या रुटीनमध्ये थोडा बदल करावा
लागणार, गर्दी वाढणार असे चुकचुकणारा साहेब ऑलिंपिक सुरू झाल्यावर मात्र
रंगात आला. चांगली कामगिरी करणाऱ्या इतर देशांच्या खेळाडूंनाही इथे
भरभरून प्रतिसाद मिळाला. युसेन बोल्टला तर ब्रिटीशांनी डोक्यावरच घेतले.
त्यातून आपल्या देशाची उत्तम कामगिरी पाहून तर अख्खा ब्रिटन ऑलिंपिकच्या
रंगात रंगला. टीम जीबीचे खेळाडू ब्रिटीश नागरिक असले तरी त्यामध्ये
वेगवेगळ्या वंशाचे, रंगाचे, वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगळी संस्कृती
जपणारे अनेकजण होते. कॉस्मोपॉलिटन लंडन शहराचे स्वरूप अगदी तसेच आहे.
सगळ्या भाषा, धर्म, संस्कृतींना सामावून घेतानाही आपला सांस्कृतिक अभिमान
जपणारी ही आजची लंडननगरी आणि टीम जीबीची या वर्षीची कामगिरी खरोखर
‘इन्सपायर द जनरेशन’ या ऑलिंपिक थीमला साजेशी ठरणारी आहे.

१७ दिवसांच्या या सोहळ्याची धामधूम गेली सात वर्षे सुरू होती. त्याचे चीज
झाल्याच्या समाधानात आता सगळे थोडे थंडावले असले तरी शहर लगेचच आपल्या
रुटीनला जुंपले गेले आहे. लंडनचा ईस्टएंड मात्र पुढचे काही दिवस भकास
दिसणार. जत्रा उठून दुसऱ्या गावी जाते, तेव्हा माणसे, दुकाने उठतात पण
पालं काही दिवस तशीच राहतात. ऑलिंपिकची पालं आता ईस्टएंडमध्ये उरली आहेत.
पुढचे अनेक दिवस ही रिकामी पालं त्या सगळ्या धामधुमीची, जल्लोषाची आणि
आनंदाची आठवण देत राहणार.

Wednesday, August 15, 2012

आफ्टरशो पार्टी मूड

दोन आठवडे सुरू असलेला क्रीडा जल्लोष आता अंतिम टप्प्यात आला आहे. हा लेख
वाचत असताना स्पर्धेचे सगळे निकालही लागलेले असतील. पदकतक्ता, त्यात
भारताचे स्थान, कामगिरी याची पूर्ण कल्पना आलेली असेल. आता वेळ आहे
समारोपाची. सतरा दिवस तेवत असलेल्या ऑलिंपिक ज्योतीला लंडन संगीतमय
वातावरणात अलविदा म्हणणार आहे. समारोपाचा कार्यक्रम कसा असेल, सिक्रेट
सेलिब्रिटी कोण असणार याची चर्चा सध्या रंगली आहे. उद्घाटन सोहळ्याइतका
गंभीर आणि अर्थवाही कार्यक्रम नसून ती एक रंगतदार आफ्टर शो पार्टी असेल,
असे ऑलिंपकचे संयोजकच सांगत आहेत.

ऑलिंपिकचा उद्घाटन सोहळ्याबाबत जेवढी उत्सुकता होती, तितकी नसली तरी आता
इथे क्लोजिंग सेरिमनीचे वेध लागले आहेत. साहेब आता सेलिब्रेशनच्या
मूडमध्ये आहे हे नक्की. ब्रिटनने गेल्या १०० वर्षातली सर्वोत्तम कामगिरी
या वर्षी ऑलिंपिकमध्ये केली आहे. एवढी पदके कमावल्याच्या आनंदात आता
रविवारची संध्याकाळ म्युझिकल पार्टीत रंगणार. डॅनी बॉयलने रंगवलेला
उद्घाटन सोहळा इंग्लिश आदरातिथ्य, कलाप्रेम, उज्ज्वल इतिहास, औद्योगिक
क्रांती, इंग्लिश कंट्री लाईफ अशा अनेक अंगांनी ब्रिटीश संस्कृतीचे दर्शन
घडवणारा होता. बॉयलने प्रत्येक प्रसंगामधून ब्रिटनबद्दल सांगण्याचा
प्रयत्न केला होता. त्यातले गर्भित अर्थ अनेकांना कळले नाहीत आणि तो
कार्यक्रम अनेकांच्या डोक्यावरून गेला. त्याबद्दल जगभरातून संमिश्र
प्रतिक्रिया आल्या. पण खऱ्या ब्रिटीश माणसाला मात्र कार्यक्रम आवडला.
साहेबाचा अभिमान आणि थोडा अहंकार कुरवाळला जाईल, असाच तो कार्यक्रम होता.
डॅनी बॉयलचे त्यामुळे वारेमाप कौतुकही झाले. आता किम गॅविन यांचा
समारोपाचा समारंभ मात्र एवढा अर्थगर्भी असणार नाही, अशी चर्चा आहे.
उद्घाटनाच्या कार्यक्रमासारखीच समारोप सोहळ्याबाबतही शेवटपर्यंत गुप्तता
पाळण्यात येणार आहे.

किम गॅविन हे नाव ब्रिटनमध्ये यशस्वी इव्हेंट मेकर म्हणून परिचित आहे.
सिम्फनी ऑफ ब्रिटीश म्युझिक या नावाने गॅविन प्रामुख्याने संगीत-
नृत्यप्रधान कार्यक्रम देणार आहे. स्पाईस गर्ल्स हा बँड या कार्यक्रमाचे
‘स्पाईस’ असल्याचे बोलले जात आहे. जगभरात लंडनची ऑलिंपिकची प्रतिमा कायम
कोरलेली राहावी यासाठी पुन्हा एकदा लंडन नगरीची वैशिष्ट्य असणाऱ्या
इमारती, पूल अगदी लंडनची ब्लॅक टॅक्सीसुद्धा कार्यक्रमात दिसेल. हा सोहळा
आयोजित करताना गॅविनपुढे सगळ्यात मोठे आव्हान आहे ते या शेवटच्या
पार्टीसाठी तयार होण्याचे. ऑलिंपिक स्टेडियमवरची शेवटची स्पर्धा
संपल्यानंतर केवळ १६ तासात सगळे स्टेज तयार करणे, टॉवर ब्रिज सारखे
लंडनचे लँडमार्क प्रतिकृतींच्या स्वरूपात साकारणे हे नक्कीच जिकीरीचे काम
आहे.

या ब्रिटीश पार्टीमध्ये लॅटिन अमेरिकन कसा आणि किती भाव खाऊन जातात हेही
पाहण्यासारखे असेल. क्लोजिंग सेरिमनीमध्ये २०१६ चे यजमान रिओ दी जानिरो
आठ मिनिटांत सांबा डान्स म्युझिकचे कौशल्य दाखवणार आहेत. पुढच्या
ब्राझिलियन ऑलिंपिकची ही नांदी म्हणायला हरकत नाही.

Tuesday, August 14, 2012

एकाक्ष वेनलॉकची क(व्य)था


ऑलिंपिक स्पर्धेचा चेहरा म्हणजे ऑलिंपिकचा शुभंकर - मॅस्कॉट. आजपर्यंतच्या इतिहासात ऑलिंपिक मॅस्कॉटस तुफान लोकप्रिय झालेले दिसतात. यजमान देशाची ओळख सांगणारा मॅस्कॉट स्पर्धेच्या प्रत्येक ठिकाणी सतत दिसत
राहतो.  लंडन ऑलिंपिकचा मॅसकॉट - वेनलॉक हा सुरुवातीला त्याच्या वेगळेपणामुळे गाजला. जागोजागी हा वेनलॉक दिसतोय खरा पण त्याची आत्तापर्यंत फारच कमी दखल घेतली गेली आहे. लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्याचे भाग्य वेनलॉकच्या वाटेला येईल की नाही याची शंका आहे.

स्टीलपासून बनलेला, मोठे डोके असलेला, हातात फ्रेंडशिप बँड घातलेला हा एकाक्ष वेनलॉक प्रथमदर्शनी विचित्र असा प्राणी वाटतो. हा कुठल्या परग्रहावरील जीव आहे का, अशा प्रतिक्रिया याच्या पहिल्या दर्शनानंतर सामान्यांकडून आल्या होत्या त्या यामुळेच. खरे तर संयोजकांना वेनलॉकच्या या असल्या रुपामधून बराच आशय सांगायचा आहे. औद्योगिक क्रांतीची जननी असलेल्या लंडन नगरीने आता जागतिक डिजिटल युगाचा ध्यास घेतला आहे हे सांगायला त्याची निर्मिती स्टीलच्या एका थेंबातून झालेली त्यांनी दाखवली
आहे आणि डोळा म्हणून कॅमेरा लेन्स लावली आहे. पुन्हा मॅस्कॉटमधून जागतिक बंधुभाव व्यक्त करण्याचाही संधी सोडलेली नाही. त्यासाठी त्याच्या हातात ऑलिंपिक रिंगच्या पाच रंगातले फ्रेंडशिप बँड घालण्यात आलेत. लंडनची ओळख असणाऱ्या पारंपरिक ब्लॅक टॅक्सीची आठवण करून देणारा पिवळा हेडलाईट
डोक्यावर लावलेला आहे. हा एवढा सारा गर्भित अर्थ किती लोकांपर्यंत पोचतोय माहित नाही. प्रथमदर्शनी तरी याची ओळख ‘वनआईड क्रीचर’ अशीच बनली गेली आहे एवढे खरे.

ऑलिंपिक मॅस्कॉट छान असावा, लहान मुलांना आवडेल, गोड वाटेल असा असावा, अशी आत्तापर्यंतची पद्धत होती. सर्वसाधारणपणे ऑलिंपिकच्या यजमान देशात सापडणारा प्राणी किंवा यजमान देशाची ओळख ठरू शकेल असे कॅरॅक्टर मॅस्कॉट म्हणून वापरले गेले. यजमान देशातील जनतेने यातील अनेक मॅस्कॉटना अगदी
डोक्यावर घेतले. अस्वलाचे पिल्लू, वाघांचे बछडे, गरुड यांची कॅरॅक्टर्स ऑलिंपिकचे मॅस्कॉट म्हणून येऊन गेली आहेत. आपल्याकडे एशियाडचा अप्पू आणि नॅशनल गेम्सचा राजू अजूनही अनेकांच्या लक्षात असेल. यंदाच्या वेनलॉकला लोकांनी तेवढे आपलेसे केलेले नाही. १९९६ ला अमेरिकेत झालेल्या अटलांटा ऑलिंपिकच्या वेळी व्हॉट्जिट किंवा इज्झी असे विचित्र नाव ठेवलेला मॅस्कॉट असाच लोकांना झेपला नव्हता. पहिले कॉम्प्युटर जनरेटेड कॅरॅक्टर असे कौतुक झाले तरी तो लोकांना फारसा रुचला नव्हता. आता इंग्लिश वेनलॉकची तुलना अमेरिकन इज्झीशी होत आहे.

नाव आले कुठून?

इंग्लंमधील श्रोपशायर परगण्यात असलेल्या ‘मच वेनलॉक’ या गावाच्या नावावरून ऑलिंपिक मॅस्कॉटला तसे नाव देण्यात आले. या गावाला आधुनिक ऑलिंपिकच्या इतिहासात आद्य स्थान आहे. मच वेनलॉक येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धांपासून प्रेरणा घेऊनच प्राचीन ग्रीक ऑलिंपिक परंपरेचे १९ व्या शतकात पुनरुज्जीवन करण्यात आले. पॅरालंपिकचा मॅस्कॉट मँडेव्हिलचे नाव एका इंग्लिश हॉस्पिटलवरून ठेवण्यात आले आहे. बकिंगहॅमशायर परगण्यातील स्टोक मँडेव्हिल हॉस्पिटलच्या डॉ लुडविग गटमन यांनी १९४० च्या दशकात स्टोक मँडेव्हिल गेम्स सुरू केले. पॅरालंपिक गेम्सची ती मुहूर्तमेढ होती, असे मानले जाते.

ब्रिटीश ब्रिटीश परंपरेला जागून काहीतरी खूप वेगळे करण्याच्या नादात लंडन ऑलिंपिकमध्ये हे वेनलॉक आणि मँडेविल सादर केले पण लोकांच्या मनाला ते भिडले नाहीत, हे खरे.

चोख सुरक्षा आणि लंडनचे भामटे


स्पर्धेदरम्यानची सुरक्षा व्यवस्था हा ऑलिंपिककाळात लंडनसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. जागतिक दहशतवादाचा तडाखा २००५ मध्ये लंडनला बसला असल्याने प्रशासनाने सुरक्षेत कोणतीही कसर ठेवलेली नाही. जागोजागी पोलिस तैनात आहेत. या चोख व्यवस्थेमुळे स्पर्धेच्या काळात गुन्हागारीचे प्रमाण कमी असेल, अशी आशा लंडन प्रशासन व्यक्त करीत आहे. कारण या आधीच्या विशेषतः सिडने ऑलिंपिकच्या वेळेला यजमान शहरातील क्राईम रेट एकदम कमी झाला होता. लंडनमध्ये मात्र अद्याप तसा ट्रेंड दिसलेला नाही. उलट पोलिसांचा आव आणून लोकांना लुबाडण्याचा नवा फंडा लंडनच्या भामट्यांनी शोधून काढला आहे.

चार दिवसांपूर्वी लंडन प्रशासन आणि पोलिस खात्याकडून सर्व मोठ्या कंपन्या आणि ऑफिसमध्ये एक विशेष अॅलर्ट जारी करण्यात आले. वृत्तपत्रांमधूनही सावधगिरीची सूचना देण्यात आली. आपण साध्या वेशातील पोलिस असल्याची बतावणी करत प्रेक्षकांना, पर्यटकांना लुबाडण्याच्या काही घटना घडल्याने सावध राहावे, अशी सूचना खुद्द पोलिसांनीच दिली आहे. गेल्या आठवड्यात लंडनच्या भामट्यांनी चोरीची ही वेगळीच शक्कल चालविल्याचे उघड झाले. हे साध्या वेशातील खोटे पोलिस लोकांकडे पैसे मागतात आणि जवळ कॅश नसेल तर एटीएममधन ती काढून द्यायलाही लावतात. सेंट्रल लंडनमध्ये अशी चलाखी करणाऱ्या दोघांना शेवटी अटक झाल्याचे कळले. पण तरीही हे प्रकार थांबलेले नाहीत.

शहरात गर्दी वाढली की, त्याचा फायदा भुरटे चोर, पाकिटमार घेतातच. पण जगभरात नावाजलेल्या स्कॉटलंड यार्ड किंवा बॉबीच्या नावाखालीच अशी लूटमार केली जात आहे, हे विशेष. खरे तर ऑलिंपिकच्या काळात कोणताही धोका उद्भवू नये म्हणून युद्धपातळीवर सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली आहे. ऑलिंपिक पार्कच्या जवळच्या उंच इमारतींवर जमिनीवरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्र सज्ज ठेवण्याची तयारीही होती. त्यावरून इथे थोडा गदारोळ माजला होता. लिटनमधील एका टॉवरमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी याला आक्षेप घेतला. ग्रीनीचजवळच्या नदीपात्रात ब्रिटनमधील सर्वात मोठी युद्धनौका तैनात करण्यात आली आहे. यावरून टेहळणी करणारी हेलिकॉप्टर झेपावत असतात. १० हजारांवर पोलिसांखेरीज आणखी तेवढेच खासगी सुरक्षारक्षक आणि १३,५०० लष्करी जवान ऑलिंपिक स्पर्धेसाठी सज्ज आहेत.  

सुदैवाने ऑलिंपिकदरम्यान किरकोळ गुन्ह्यांखेरीज अद्याप तरी मोठा पेच उभा राहिलेला नाही. बहुतेक गुन्ह्यांचे स्वरूप चिथावणीखोर भाषण, रेशियल अब्युज, शिवीगाळ, दारू पिऊन धिंगाणा घालणे असे आहे. प्रेक्षक, स्पर्धक आणि ऑलिंपिक अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणारे गुन्हेगार अधिक. अशा ऑलिंपिक ऑफेन्ससाठी अटक झालेल्या कोणालाही २४ तासांच्या आत न्यायालयात हजर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहेत. स्ट्रॅटफर्डला सुरू केलेल्या फास्ट ट्रॅक कोर्टात या केस चालतात. ऑलिंपिक दरम्यान न्यायव्यवस्थेवर कामाचे दडपण येऊ नये म्हणून आधीच सुट्टीचे विशेष कोर्ट बसवून प्रलंबित प्रकरणे निकालात काढली गेली होती. विशेषतः वर्षभरापूर्वी लंडनमध्ये उसळलेल्या दंगलीच्या केस संपवण्यासाठी त्याचा उपयोग झाला.

Monday, August 13, 2012

ऑलिंपिकमधले उत्साही 'नारायण'


कोणताही सोहळा यशस्वी करण्यासाठी आपुलकीने राबणारे हात हवे असतात. लग्नकार्यात एखादा तरी नारायण लागतोच. ऑलिंपिकसारख्या महासोहळ्यासाठी तर असे अनेकजण लागतात. कोणत्याही मोबदल्याशिवाय आपुलकीने आणि पडेल ते काम करणारे असे ७० हजारांवर नारायण ऑलिंपिकसाठी राबत आहेत. या व्हॉलेंटिअर्सशिवाय एवढा मोठा सोहळा पार पडूच शकला नसता याची ऑलिंपिक संयोजन समितीलाही जाणीव आहे आणि म्हणूनच त्यांना गेम मेकर्स असे म्हटले जात आहे.

हे स्वयंसेवक निवडण्याची प्रक्रिया गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीतच सुरू झाली. ऑलिंपिकसाठी काम करायला २ लाख ४० हजार अर्ज आले होते. त्यापैकी लाखभर जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि ७० हजार जणांना निवडण्यात आले. सध्या ट्रेन स्टेशनपासून ऑलिंपिक पार्कपर्यंत सगळीकडे प्रेक्षकांना मार्गदर्शन करणारे हे हजारो व्हॉलेंटिअर लंडनभर दिसत आहेत. जांभळ्या गणवेशातील हे मदतनीस अगदी उत्साहाने, हसतमुखाने आपणहून तुमची चौकशी करतात, तेव्हा खरच आपण एखाद्या कार्याला आलो आहोत आणि यजमानांचे प्रतिनिधी विचारपूस करीत असल्याचा भास होतो. या गेम मेकर्समध्ये काही मराठी नावेही आहेत हे विशेष.

जयेश रेवाटकर
या जागतिक महासोहळ्याचा प्रत्यक्ष भाग होणं म्हणजे लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी. आता पुढच्या पिढीलाही मी अभिमानाने सांगू शकेन, एवढा छान अनुभव मिळाला. देशाविदेशातील सपोर्टर्सचा जोश पाहून चार्ज झालो आहे,” जयेश रेवातकर सांगत होते. एका पेट्रोलियम कंपनीसाठी मॅनेजर म्हणून काम करणारे ४४ वर्षीय रेवातकर थेट ऑलिंपक स्टेडियममध्ये सिक्युरीटी टीमचा भाग म्हणून काम करीत आहेत. मुलाखतीमध्ये खेळाबद्दलची पॅशन, काम करण्याचा उत्साह बघून निवड करण्यात आली, असे ते सांगतात. त्यानंतर प्रत्येकी ३ ते ४ तासांची तीन ट्रेनिंग सेशन्सही झाली. वेम्बली स्टेडियम आणि ऑलिंपिक पार्क अशा दोन ठिकाणी काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

रंगनाथ ऊर्फ जयंत देशपांडे अशाच काही उत्साही गेममेकर्सपैकी एक मराठी नाव. मूळचे नांदेडचे, पेशाने इंजिनअर आणि जनरल इलेक्ट्रिकलसारख्या बड्या कंपनीत नोकरी. पण केवळ खेळाविषयी पॅशन असल्याने सात दिवस सुट्टी घेऊन ऑलिंपिकसाठी स्वयंसेवक म्हणून रुजू झाले. रीडिंग शहरातून दररोज सकाळी उत्साहाने ते लॉर्ड्स गाठत होते. तेथे होणाऱ्या आर्चरीच्या स्पर्धेसाठी देशपांडे यांची नेमणूक झाली होती. "लहानपणापासूनच खेळाची आवड होती. क्रिकेट आणि फूटबॉल तर जिव्हाळ्याचा विषय. ऑलिंपिकचा प्रत्यक्ष भाग होण्याचा अनुभवच विलक्षण होता. त्यात क्रिकेटची पंढरी असणाऱ्या लॉर्ड्सवर एवढा वेळ घालवायला मिळाला ते सुख वेगळंच",  ते सांगतात. देशपांडे अजूनही पूर्णपणे ऑलिंपिकमय आहेत. २८ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान दररोजचे सात ते नऊ तास व्हॉलेंटिअर म्हणून घालवल्यानंतर आता इतर स्पर्धा बघायलाही सहकुटुंब जाताहेत. 

Saturday, August 11, 2012

लॉजिस्टिक्सला सलाम


लंडनसारख्या प्रचंड मोठ्या शहरात ऑलिंपिक आयोजित करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. शहराचे इतर व्यवहार सुरळीत चालतील याची काळजी घेणे आणि त्याचवेळी ऑलिंपिकच्या प्रेक्षकांना, खेळाडूंना, संबंधितांना वेळच्या वेळी स्पर्धेच्या ठिकाणी कसे पोचता येईल, याचीही सोय बघणे. एवढ्या मोठ्या शहरात विशेषतः सार्वजनिक वाहतुकीने फिरताना नवख्या माणसांचा गोंधळ उडणे सहाजिक आहे. पण लंडन ऑलिंपिकसाठी लॉजिस्टिक्स इतके छान तयार केले आहे, की कोणीही सराईतासारखा फिरू शकेल. ऑलिंपिकचे साईन बोर्ड्स, नकाशे, स्क्रीन, मोबाईल अॅप्लिकेशन्स यांच्या जोडीला हजारो स्वयंसेवक उभे केल्याने पत्ता विचारण्याची वेळच येत नाही.

लंडनचा पसारा ८ झोनमध्ये विभागला आहे. वेस्टमिन्स्टर म्हणजेच सेंट्रल लंडनचा जुना भाग झोन १ मध्ये येतो. पूर्वेला आणि पश्चिमेला २, ३, ४ असे झोनचे परिघ वाढत जातात. आठव्या झोनमध्ये राहणारी व्यक्ती सेंट्रल लंडनपासून सर्वात दूर राहते. ऑलिंपिक पार्क पूर्वेकडच्या झोन ३ मध्ये येते. ऑलिंपिकच्या अनेक स्पर्धा स्टेडियमबाहेरही वेगवेगळ्या ठिकाणी होत असल्याने लंडनभर ऑलिंपिकची वाहतूक सुरू आहे. पश्चिमेच्या वेम्बलीपासून पूर्वेला ग्रीनीचपर्यंत अनेक ठिकाणे ऑलिंपिकमय आहेत. पण तरीही स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत पोचताना कोणतीही अडचण जाणवत नाही. कारण ऑलिंपिकचे व्हॉलेंटिअर्स जागोजागी मदतीसाठी उभे आहेत.

एखादा गावाकडचा माणूस पहिल्यांदा शहरात येतो मोठे रस्ते, गाड्या पाहून तेव्हा गांगरून जातो, तसे गांगरायला लावणारा ट्यूब- बस- ट्रेनचा पसारा लंडनमध्ये दिसतो. लंडनच्या रस्त्यांखाली रेल्वेचे खरोखर जाळे विणलेले आहे. आठ झोनना जोडणाऱ्या एकूण १० अंडरग्राऊंड ट्यूब लाईन्स, शिवाय ओव्हरग्राऊंड आणि नॅशनल रेल वेगळ्या. एवढा हा पसारा आहे. सुरुवातीला याचेच दडपण येऊ शकते. पण ज्या ट्यूब स्टेशनजवळ ऑलिंपिक इव्हेंट आहे, त्या स्टेशनवर मोठ्या अक्षरात तसे बोर्ड लागलेले आहेत. तिथपर्यंत जायचा नकाशाही आहे. शिवाय काही स्टेशनवर रस्त्याचा टच स्क्रीन इंटरअॅक्टिव्ह मॅप लावला आहे. हॉर्सगार्ड परेडसाठी येथे उतरा अशा अनाउन्समेंट ट्यूबमध्येही सतत होतच असतात. ट्यूब स्टेशनपासून स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत जागोजागी रस्ता दाखवणारे साईनबोर्ड्स लागले आहेत.

वॉटर्लू, व्हिक्टोरिया, पॅडिंग्टन, किंग्ज क्रॉस या लंडनच्या चारही मोठ्या ट्रेन स्टेशनच्या बाहेर मोठा इन्फॉर्मेशन डेस्क उभा केला आहे. तेथे ऑलिंपिकच्या इव्हेंटची माहिती, तिथपर्यंत पोचायचे कसे हे सांगणारे नकाशे शिवाय लंडनचा नकाशा, ट्यूब मॅप, बस रूट, सायकल रूट, वॉकवे असे अनेक नकाशे मोफत उपलब्ध आहेत. ट्रान्सपोर्ट फॉर लंडननेदेखील खास माणसे मार्गदर्शनसाठी तैनात केली आहेत. लंडनच्या चारही बड्या ट्रेन स्टेशनवर आणि स्टेशनबाहेर गुलाबी आणि जांभळे डगले घातलेले अनेक ऑलिंपिक व्हॉलेंटिअर उभे असलेले दिसतात. त्यांचा उत्साहसुद्धा वाखाणण्यासारखा आहे. तुम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन पत्ता विचारण्याआधीच मे आय हेल्प ची साद ते घालतात. या हजारो मार्गदर्शकांना ऑलिंपिकचे प्रेक्षक धन्यवाद देत आहेत. जगातील एका प्रचंड मोठ्या शहरातला वावर त्यांच्यामुळे फारच सोपा होऊन जातो. लंडन ऑलिंपिकच्या लॉजिस्टिक टीमला यासाठी सलाम.


Friday, August 10, 2012

शहरी गणिते बदलताना


ऑलिंपिकमुळे बदललेली लंडन ईस्टएंडची स्कायलाईन
शहर रचना कितीही काटेकोरपणे केली, तरी कोणत्याही मोठ्या शहराचे सगळे प्रभाग, उपनगरे सारखी विकसित होऊ शकत नाहीत. लंडनसारख्या अवाढव्य शहरात तर हे शक्यच नाही. आपल्याकडच्या कोणत्याही मोठ्या शहरात ही बाब अगदी प्रकर्षाने दिसते. शहराचा एखादा भाग चकाचक होतो तर एखादा बकाल राहतो. साहेबाच्या देशात कितीही शिस्तीचा कारभार असला, तरी असे बकाल भाग आहेतच. तिथल्या जागांचे भाव आणि हाय प्रोफाईल लंडनमधील भाव यात जमीन आस्मानाचा फरक आहे. ऑलिंपिकच्या निमित्ताने या शहरी आडाख्यांची गणिते मात्र बदलत आहेत.

पूर्व लंडनचा भाग शहरातला सगळ्यात गरीब लोकवस्तीचा म्हणून अगदी २ वर्षांपूर्वीपर्यंत ओळखला जायचा. पण ऑलिंपिक पार्क उभारायच्या हालचाली सुरू झाल्या आणि या भागाने जणू कातच टाकली. ऐतिहासिक काळापासूनच लंडनचे हे ईस्ट एंड तसे बकालच. लिआ नदीच्या बाजूचा हा परिसर स्थलांतरित गरीबांची वस्ती म्हणूनच ओळखला जायचा. लंडन शहराची वस्ती जशी वाढू लागली, तशा शहरातील सुविधा वाढवण्यात आल्या. वीसाव्या शतकाच्या सुरुवातीला नगररचनेत कालानुरूप असे बदल होताना जागा मोकळी करण्यासाठी सेंट्रल लंडनच्या आसपास असलेल्या गरिबांच्या वस्त्या हटवण्यात आल्या. या सगळ्यांनी गाशा गुंडाळून शहराबाहेरचा पूर्वेचा रस्ता धरला. असे शहरातून ढकलले गेलेले, तसेच परदेशातून आलेल्या लोकांनी ईस्ट एंडमध्ये संसार मांडले. या अर्धशिक्षित लोकांना सामावून घेणारे व्यवसायच इथे बहरले. जुनाबाजार, खाणकाम, डॉकयार्डमुळे जहाजबांधणी असे कष्टकऱ्यांचे व्यवसाय येथे होते. त्यातून दुसऱ्या महायुद्धात ईस्ट एंडचा हा भाग बॉम्ब हल्ल्यांच्या भक्ष्यस्थानी पडला. ईस्ट एंडची अपरिमित हानी झाली. नंतर तर हा भाग डंपिंग ग्राउंड म्हणूनच वापरला गेला.
ईस्ट एंडच्या डंपिंग ग्राऊंडवर असे चकाचक मॉल उभे राहिले आहेत.
युद्धसमाप्तीनंतर दशकभराने पूर्व लंडन सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले. सुरवातीला कॅनरी वॉर्फचा भाग बिझनेस डिस्ट्रीक्ट म्हणून विकसित केला गेला. तरीही वेस्टएंडच्या कला- शिस्त- परंपरेने नटलेल्या संस्कृतीपासून लंडनचे ईस्ट एंड तसे दूरच राहिले होते. आता ऑलिंपिकमुळे या सुधारणेच्या अध्यायाची सांगता झाली असे म्हणता येईल. डंपिंग ग्राउंडचे आधुनिक ऑलिंपिक व्हिलेजमध्ये रुपांतर झाले. स्ट्रॅटफर्ड इंटरनॅशनल स्टेशन बनले. ईस्टहॅम, वेस्टहॅम, लेटन ही कमी भाव असलेली बाजूची उपनगरेही एकदम प्रकाशझोतात आली आहेत. चकाचक इमारती, मॉल यामुळे स्ट्रॅटफर्डचा भाग तर एकदम हाय प्रोफाईल झाला आहे. वेस्टफिल्ड्स हा लंडनचा सर्वात मोठा शॉपिंग मॉल स्ट्रॅटफर्डला गेल्या वर्षीपासून सुरू झाला. आता ऑलिंपिकसाठी बाहेरून येणाऱ्या प्रेक्षकांना ईस्टएंडच्या या कुरूप इतिहासाची कल्पनाही येणार नाही. ऑलिंपिकचे निमित्त साधून शहराचा एक भाग जणू नव्याने वसवणाऱ्या साहेबाच्या या दूरदृष्टीला दाद द्यावी लागेल. 


Thursday, August 9, 2012

संभाव्य गर्दीची उलटी गंगा


लंडन ऑलिंपिक दरम्यान होणारी संभाव्य गर्दी या विषयावर ऑलिंपिक सुरू व्हायच्या आधीपासून इथल्या माध्यमांनी भरपूर चर्चा चर्विचरण केले होते. सेंट्रल लंडनमध्ये ट्रॅफिक जॅम होणार, तिथून गाडी बाहेर काढायला जागा राहणार नाही, ट्यूबमध्ये प्रचंड गर्दी होणार असे ठोकताळे बांधण्यात आले होते. लंडनच्या मेयरपासून ते सार्वजनिक वाहतूक सांभाळणाऱ्या ट्रान्सपोर्ट फॉर लंडन (टीएफएल)च्या पदाधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांनी म्हणूनच या काळात ऑलिंपकशी संबंधित नसाल तर येणे टाळा, अशा अर्थाचे आवाहनही केले होते. पण प्रत्यक्षात परिस्थिती फारच वेगळी दिसते आहे. ऑलिंपिक सुरू होऊन आठवडा उलटला तरी असे ओव्हरक्राऊडेड लंडनचे दृष्य अभावानेच दिसले आहे.

ऑलिंपिकच्या संभाव्य गर्दीचे माध्यमांनी फारच अवडंबर केल्याने ही उलटी गंगा (थेम्स म्हणू या हवे तर) वाहत असल्याचे (पुन्हा माध्यमांतूनच) म्हटले जात आहे. सुरवातीला दबक्या आवाजात असलेल्या या बातम्यांचा सूर आता टीपेला पोचला आहे. एखादा अपवाद वगळता लंडनची वाहतूक तशी सुरळीत सुरू आहे अशा पॉझिटिव्ह बातम्या देणारी वृत्तपत्रे आता सेंट्रल लंडनमधला पर्यटकांचा ओघ घटला आणि त्यामुळे दुकानदारांना तोटा होत असल्याच्या बातम्या देऊ लागली आहेत. ऑलिंपिक पार्क असणाऱ्या पूर्व लंडनमध्ये गर्दी आहे पण सेंट्रल लंडनमधल्या दुकानदारांना मात्र अपेक्षित लाभ झालेला नाही.

ऑलिंपिक पार्कजवळच फक्त ट्यूबला गर्दी होती.
कितपत गर्दी आहे हे चाचपण्यासाठी मी ऑफिस वर्किंग डेला अगदी पीक अवर साधून हिथ्रोपासून स्ट्रॅटफर्डपर्यंतचा प्रवास करून बघितला. नंतर वेगवेगळ्या ट्यूब लाईन्सने सेंट्रल लंडन भटकले तरी ती संभाव्य गर्दी लागलीच नाही. अगदी एक अपवाद वगळता सर्व ट्रेन आणि ट्यूबमध्ये बसायला जागा मिळाली. ऑगस्ट महिना खरे तर सुट्टीचा. शाळांना सुट्टी आणि ब्रिटीश समर एंजॉय करण्याचे दिवस. पण तरीही गेल्या ऑगस्टपेक्षा या वेळी गर्दी कमी झाल्याची सेंट्रल लंडनमधील हॉटेल व्यावसायिकांची तक्रार आहे. लंडनचे वेस्टएंड म्हणजे नाट्यरसिकांसाठी पंढरीच. पण वेस्टएंडलाही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी बुकिंग झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. लंडनच्या मेयरच्या आवाहनाचा हा परिणाम असल्याची तक्रार आता करण्यात येत आहे. मेयर बोरिस जॉन्सन यांनी लगेचच खुलासा केला आहे. लंडन शहरात सगळ्यांचे स्वागतच आहे. केवळ लोकांना पूर्वकल्पना देण्यासाठीच तसे म्हटले होते’, असे आता ते सांगत आहेत.

संभाव्य गर्दीची बेगमी म्हणून सेंट्रल लंडनमधील अनेक दुकानांनी जादा माणसे कामावर घेतली होती. टॅक्सी ड्रायव्हरनी आपण अधिक कामात राहू, अशा अंदाजाने ऑलिंपिकची तिकीटे विकत घ्यायचे टाळले होते. या साऱ्यांचीच आता पंचाईत झाली आहे. सेंट्रल लंडनच्या कॅब असोसिएशनने आपली तक्रार थेट पर्यटन मंत्र्यांपर्यंत केल्याचे एका सायंदैनिकात वाचले. ऑलिंपिक संपल्यावर पर्यटकांचा ओघ सेंट्रल लंडनमधील पर्यटन स्थळांकडेच येणार आहे’, असा दिलासा मंत्री देत असले तरी संभाव्य गर्दीच्या उलट्या गंगेने दुकानदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, हे नक्की.



Wednesday, August 8, 2012

झलक फ्युचर टेलिव्हिजनची


ऑलिंपिकचा सोहळा केवळ खेळांच्या स्पर्धांमुळे लक्षात राहतो असे नाही. त्याबरोबरच यजमान देशाची संस्कृती, आदरातिथ्य आणि नवनवीन तंत्रज्ञानाची झलक त्यातून जगाला दिसते. भविष्यातील तंत्रज्ञान ऑलिंपिकच्या निमित्ताने सादर करण्याची संधी अनेक ठिकाणी साधली जाते. विशेषतः अशा जागतिक स्पर्धेच्या निमित्ताने प्रक्षेपणाचे नवे तंत्रज्ञान चाचपून जगासमोर ठेवल्याची तर अनेक उदाहरणे आहेत. यंदाचे ऑलिंपिकही त्याला अपवाद नाही. भविष्यातील टीव्ही कसा असेल, याची झलक सध्या लंडनवासी अनुभवत आहेत.

ऑलिंपिकसारखी जागतिक स्पर्धा आणि नवीन तंत्रज्ञान यांचे नाते नवीन नाही. १९४८ चे लंडन ऑलिंपिक लोकांना घरात टीव्हीवर बघायला मिळाले  होते. १९६४ मध्ये टोकियोत झालेल्या ऑलिंपिकचे प्रक्षेपण पहिल्यांदाच सॅटेलाईट स्ट्रीमने लाईव्ह केले गेले. १९८४ मध्ये लॉस एंजेलिसला झालेले ऑलिंपिक प्रथमच हाय डेफिनिशन टीव्हीवर दिसले. आपल्याकडेसुद्धा भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात दिल्लीत झालेल्या आशियायी स्पर्धांना महत्त्व आहे. १९८२ च्या या एशियाडने आपले टीव्ही रंगीत केले. त्यानंतर आता आपल्या टीव्हीमध्ये एलईडी, एलसीडी, प्लाझमा अशी क्रांती झाली. यापुढचे पाऊल काय असेल हे लंडन ऑलिंपिकमुळे पाहायला मिळते आहे.

फ्युचर जनरेशन टीव्ही अशी ओळख सांगणारे सुपर हाय-व्हिजन हे तंत्रज्ञान टेलिव्हिजनच्या क्षेत्रात विकसित झाले असून त्याचे प्रात्यक्षिक सध्या लंडनमधल्या बीबीसीच्या स्टुडिओमध्ये दाखवताहेत. सध्याच्या आधुनिक एचडी टीव्हीपेक्षा १६ पट चांगले चित्र आणि अगदी स्पष्ट ध्वनी यात असतो. बारिक सारिक आवाज टिपणारे सराउंड साऊंड टेक्निक आणि वाईड कॅमेरा अँगल शॉट असल्यामुळे आपण प्रत्यक्ष उपस्थित आहोत आणि आपल्या डोळ्यापुढे सगळे घडतेय असा भास सुपर हाय-व्हिजन टीव्हीमुळे होतो.

जपानच्या एनएचके या प्रसारण कंपनीने हे तंत्र विकसित केले आहे. ऑलिंपिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसतर्फे स्टेडियमवर काही सुपर हाय-व्हिजन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. आता बीबीसीच्या मदतीने हे सुपर हाय-व्हिजन प्रक्षेपण सामान्यांपर्यंत पोचत आहे. उद्घाटन सोहळा तसेच बास्केट बॉल अरेना, अॅक्वॅटिक सेंटरवर होणाऱ्या स्पर्धा चित्रित करून त्याचे प्रक्षेपण दाखवण्यात येत आहे. अर्थात भविष्यातील तंत्राची ही केवळ चाचपणी आहे. ऑलिंपिक सुरू झाल्यापासून या प्रक्षेपणाचे शो बीबीसीच्या स्टुडिओत आयोजित करण्यात येत आहेत. एक ऑनलाईन अर्ज भरून या शोचे तिकीट मिळवता येते. या फ्युचर टीव्हीवर ऑलिंपिक पाहायला बीबीसी स्टुडिओच्या बाहेर रांगा लागलेल्या दिसताहेत. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे असलेल्या आणखी एका बीबीसी स्टुडिओतही असे शो आयोजित केले जात आहेत. ऑलिंपिकच्या शेवटच्या दिवसापर्यंत दररोज असे ६ ते ८ शो आयोजित करण्यात येत आहेत. याशिवाय बीबीसीने ऑलिंपिकसाठी खास चॅनेल सुरू केले असून त्यावरून थ्रीडी ब्रॉडकास्टिंग होत आहे. हा तंत्रानातील आणखी एक प्रयोग असून ब्रिटनमधील ठराविक शहरांमध्ये असे थ्रीडी प्रक्षेपण सुरू आहे.

Tuesday, August 7, 2012

स्फूर्तीज्योत


लंडन ऑलिंपिकमधला भारत शोधताना फक्त मैदानावर उतरलेली भारतीय टीम बघून चालणार नाही, स्टेडियममध्ये उपस्थित असणारे उत्साही भारतीय समर्थक, तिकीटांसाठी रांगा लावणारे क्रीडाप्रेमी देशी बांधव, स्वयंसेवक म्हणून राबणारे भारतीय चेहरे आणि ऑलिंपिकच्या गेम स्पिरीटचा स्पर्धेपूर्वीपासून महत्त्वाचा भाग ठरलेले टॉर्च बेअरर यांना विसरता येत नाही.
ऑलिंपिक ज्योतीच्या प्रवासात शेवटच्या टप्प्यात बिग बी अवतीर्ण झाला आणि भारतीय प्रसारमाध्यमांनी ऑलिंपिक मशालीच्या प्रवासाची दखल घेतली. पण अमिताभच्याही आधी ऑलिंपिक मशाल मिरवण्याचा मान काही भारतीयांनी मिळवला होता. स्पर्धा सुरू व्हायच्या आधीपासूनच ऑलिंपिकचे स्पिरीट या ज्योतीच्या प्रवासातूनच खरे तर ब्रिटनभर पसरले. आपल्या वागण्यातून,कामातून आणि साहसातून इतरांना जगण्याची स्फूर्ती देणारे, समाजातील सामान्यांतून आलेले आठ हजार टॉर्चबेअरर पुढे बराच काळ स्मरणात राहणार यात शंका नाही.

देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळपास १००० गावांमधून फिरून ही ज्योत सध्या ऑलिंपिक स्टेडियममध्ये स्थिरावली आहे. ऑलिंपिकची ही मशाल ८००० स्फूर्तीदायी हातांमधून फिरली. हे टॉर्चबेअरर स्थानिक लोकांनीच निवडलेले होते. प्रत्येक शहरातील दुसऱ्यांना प्रेरणा देऊ शकतील अशा व्यक्तींची नावे ऑलिंपिक कमिटीने मागवली होती. आपापल्या भागात ऑलिंपिक ज्योत आल्यावर तिचे स्वागत करायला तशाच गेम स्पिरीटने आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीने पुढे यावे, ही त्या मागची कल्पना. प्रत्यक्ष खेळातीलच नाही तर आयुष्यात इतर आव्हाने यशस्वीपणे झेललेल्या व्यक्तींना यासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. या टॉर्चबेअररमध्ये भारतीय चेहरे लक्षणीय प्रमाणात होते हे विशेष.
हॅरो, ब्रेंट, इलिंग या लंडनच्या उपनगरांमधून ऑलिंपिक ज्योत जाताना काही भारतीय वंशाच्या नागरिकांना टॉर्च बेअरर होण्याचा मान मिळाला. उत्तर इंग्लंडचा लेस्टर परगणा आशियायी बहुल मानला जातो. तेथेही अनेक मूळच्या भारतीयांनी ऑलिंपिकची ज्योत नेली. 
भारतीय वंशाच्या शोभा त्रिवेदी यांनी ऑलिंपिकची ज्योत लेस्टर शहरात आणली.
लेस्टरला राहणाऱ्या ५५ वर्षीय शोभा त्रिवेदी त्यापैकीच एक. विशेष मुलांसाठी त्या काम करतात. याशिवाय अॅथलेटिक्स आणि ट्रेकिंग ही त्यांची आवड. वयाच्या ५४ व्या वर्षी किलीमांजारो हे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर करण्याचा पराक्रम त्यांनी केला. कोणत्याही वयात साहस करता येते. आव्हान पेलणे महत्त्वाचे. त्यामध्ये स्त्री-पुरुष, वय, पार्श्वभूमी आड येत नाही हेच त्यांनी दाखवून दिले आहे. एव्हरिथिंग इज पॉसिबल, हा माझा आशावाद आहे”, शोभाबेन म्हणतात. आसपासच्या एशियन कम्युनिटीमध्येही खेळाबद्दल, फिटनेसबद्दल प्रसार करणे हे त्यांचे ध्येय असल्याचे त्या सांगतात. ऑलिंपिक टॉर्च बेअररसाठीचे त्यांचे नॉमिनेशन त्यांच्या मुलीने भरले. त्यांना कल्पनाही नव्हती. "त्यामुळे ऑलिंपिक कमिटीकडून पत्र आले त्यावेळी आश्चर्याचा सुखद धक्का बसला", असे त्या म्हणाल्या.   

नॉर्दन आयर्लंडपासून दक्षिणेकडच्या ब्रिटीश बेटांपर्यंत घडलेल्या या ऑलिंपिक ज्योतीच्या प्रेरणादायी प्रवासाला शोभाबेनसारखे इतरही अनेक भारतीय हात लागले आहेत. त्यांच्या कथा, त्यांचे योगदान आणि त्यांच्यापासून मिळणारी स्फूर्ती पुढे कित्येक दिवस तशीच राहील आणि इथल्या भारतीयांचा ऊर त्या अभिमानाने भरून येईल.


Monday, August 6, 2012

मराठी कट्टा ऑलिंपिकमय


गर्दी, ट्रॅफिकमुळे डोकेदुखी, खर्च या सगळ्याचा विचार करून लंडन ऑलिंपिकमध्ये ब्रिटीश माणूस थोडे अंतर राखून सहभागी होत आहे. तर भारतीय माणूस मात्र या सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटतोय. ऑलिंपिक अनुभवणे ही आयुष्यात एकदाच येणारी संधी, हे जाणून या संधीचा पुरेपूर फायदा देशी माणूस घेत आहे. अर्थात मराठी जनताही यात मागे नाही. 
एकूणच ब्रिटनमध्ये भारतीय टक्का फारच मोठा आहे. जवळपास १५ लाखांच्या आसपास भारतीय जनता या देशात नांदते. एकट्या लंडनमध्येच साधारण ५ लाखांवर भारतीय आहेत.

ऑलिंपिकच्या आधी इथल्या भारतीय वंशाच्या  नागरिकांना काही ठिकाणी ऑलिंपिक ज्योत मिरवण्याचा मानही मिळाला. लेस्टरच्या शोभना त्रिवेदी या त्यापैकी एक. आता ब्रिटनच्या वेगवेगळ्या भागातील भारतीयांना त्यांच्यामुळे ही मशाल जवळून बघायला मिळते आहे. इथले भारतीयही चांगले क्रीडारसिक म्हणायला हवेत. भारत – इंग्लंडचा क्रिकेटचा सामना असो वा टी ट्वेंटी विश्व करंडक, स्टेडियमवर सर्वाधिक गर्दी भारतीयांची होती. आता ऑलिंपिकच्या प्रेक्षकांमध्येही अनेक भारतीय चेहरे दिसत आहेत.

या भारतीय गर्दीतील काही मराठी चेहरे गाठले. ऑलिंपिकचा महासोहळा याची देही याची डोळा बघण्यासाठी लंडनमधील मराठी माणूस उत्सुक आहे. अमेरिकेपाठोपाठ मराठी मंडळींची संख्या याच देशात अधिक आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना इथला मराठी माणूस वर्षभर आधीपासूनच कसा ऑलिंपिकसाठी सज्ज झाला होता, हे उमजले. काहींनी आधीपासूनच तिकीटांसाठी लकी ड्रॉमध्ये नाव नोंदवले होते. काहींनी ऑलिंपिकमध्ये स्वयंसेवक होण्यासाठीही गेल्या वर्षीपासूनच मोर्चेबांधणी केली होती. सचिन लोहोकरे म्हणाले, लंडनचे नाव होस्ट म्हणून जाहीर झाल्यापासूनच मनात होते, ऑलिंपिक बघायला जायचेच. गेल्या वर्षी सुरुवातीला सुरू झालेल्या तिकीटविक्रीसाठी लगेच नंबर लावला. पहिल्या फेरीत तिकीट मिळण्यात अयशस्वी झालेल्यांसाठी एक्स्क्लुझिव्ह विंडो सुरू केल्याचे कळल्यावर तिथेही अर्ज केला आणि हातात दोन महत्त्वाची तिकिटे पडली. आता त्यांना रविवारच्या १०० मीटर रेस फायनलची तिकीटे मिळाली आहेत. उसेन बोल्टला पाहण्याची संधी असल्याने सुपर एक्सायटेड आहे”, असे ते म्हणतात. नितीन रेडकर, मंजिरी कुलकर्णी, आमोद देशमुख, नितीन रेडकर असे आणखी कितीतरी भेटले. हातात ऑलिंपिकची तिकीटे पडल्यामुळे ते प्रचंड उत्साहात होते. भारतीय संघाला चिअर अप करायला सगळे तयार आहेत. भारताला पदकाची आशा असल्याने नेमबाजी आणि कुस्तीच्या स्पर्धेचे तिकीट मिळवले, असे किशोर महिंड सांगतात.
 ऑलिंपिक मशालीबरोबरब स्लावचे छोटे रहिवासी लव आणि कुश अजय मुरुडकर.
केवळ लंडनमधीलच नाही, तर ब्रिटनच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या मराठी मंडळी लांबलांबून ऑलिंपिकसाठी जाताहेत. लंडनच्या नैऋत्येला बर्कशायर परगण्यातील रीडिंगमध्ये राहणाऱ्या उदय भोसले यांनी थेट देशाच्या उत्तरेकडे मँचेस्टरला होणाऱ्या एका फूटबॉल सामन्याचे तिकीट काढले आहे. ब्रिटनमधला मराठी कट्टा सध्या पूर्णपणे ऑलिंपिकमय झाला आहे.


Sunday, August 5, 2012

लंडनच्या परीक्षेचा अवघड पेपर


लंडन ही शेवटी यशस्वी बिझनेस सिटी आहे आणि सार्वजनिक वाहतुकीच्या मजबूत जाळ्यावर ही नगरी उभी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेय. गेल्या शुक्रवारी ऑलिंपिकचे जोशात उद्घाटन झाले आणि पुढचे दोन दिवस सुट्टीचे असल्याने सगळे शहरच ऑलिंपिकमय बनले. पण सोमवारपासून कामाचा आठवडा सुरू झाला. त्यातलेही पहिले दोन दिवस कितपत गर्दी आहे हे चाचपण्यात गेले आणि बहुतेकांचे सोमवार वर्क फ्रॉम होममध्ये सरले. आता खऱ्या अर्थाने लंडनची परीक्षा सुरू झाली आहे.
या परीक्षेचा पहिलाच पेपर फार अवघड होता. कारण मंगळवारी सकाळीच लंडनची एक ट्यूबलाईन फायर अॅलर्टमुळे बंद पडली. एका ट्यूब ड्रायव्हरला आगीचा संशय आल्यामुळे तातडीने सेवा बंद करण्यात आली. ऑलिंपिक पार्कला जाणाऱ्या सेंट्रल लाईनवरच हा प्रकार घडला. अगदी ऑफिस पिक अवर्सना म्हणजे सकाळी ७ वाजल्यापासूनच लिव्हरपूल स्ट्रीटहून पुढे जाणाऱ्या सर्व अंडरग्राउंड ट्रेन अडकल्या. तर इतर काही मार्गांवरही याचा परिणाम जाणवला आणि त्या दिवशीचे सगळे ट्यूबचे टाईमटेबलच कोलमडले. त्यातून लंडनच्या लहरी हवामानाला जागून पावसाला सुरवात झाली. सकाळच्या घाईत कामावर निघालेल्या नोकरदारांना तर यामुळे फटका बसलाच पण ऑलिंपिक पार्ककडे निघालेल्या प्रेक्षकांचाही खोळंबा झाला.
ट्यूब किंवा ओव्हरग्राऊंड ट्रेन काही कारणाने बंद असली, तर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था तातडीने उपलब्ध करून दिली जाते. दुरुस्ती, देखभालीच्या कामासाठी रविवारी ट्रेन काही काळ बंद असते त्यावेळी ही पर्यायी बससेवा उपलब्ध असते आणि त्यासाठी वेगळे तिकीट काढावे लागत नाही. (आपल्याकडचा मेगा ब्लॉक आठवा...) मंगळवारीसुद्धा एकीकडे सेंट्रल लाईनवरील ट्यूब बंद असल्याची सूचना होत असतानाच स्टेशनबाहेर रेल रिप्लेसमेंट सर्व्हिसच्या बस उभ्या होत्या आणि प्रवासी रांगेने त्यात चढत होते.
आता सर्व आलबेल असल्याचे पाहून मंडळी ऑफिसला निघाली आहेत. रस्त्यावर ऑलिंपिक आणि ऑफिस अशी दोन्ही प्रकारची गर्दी दिसू लागली आहे. लोकांचा इथल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विश्वास आहे. म्हणूनच स्वतःच्या कार घरी ठेवून ट्यूबने प्रवास करणे ते पसंत करताहेत. परीक्षा कितीही अवघड असली, तरी चांगली तयारी झाली असल्याने लंडन पास होणार यात शंका नाही. बिझनेस सिटीतले काम थांबणार नाही आणि ऑलिंपिकची गर्दीही हटणार नाही.

गेम्स लेन मोकळ्या
ऑलिंपिकसाठी राखून ठेवलेल्या लेनमधून पहिले दोन दिवस फारशी वाहतुकच झाली नाही. ऑलिंपिकशी संबंधित पदाधिकारीही या गेम्स लेनमधून जाण्याऐवजी ट्रेनने जाणे पसंत करताहेत. त्यामुळे लंडन प्रशासनाने गेम्स लेनवरील बंधने शिथील करत काही भागात त्या सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या आहेत

Friday, August 3, 2012

आहे मनोहर तरी...


ऑलिंपिकचे चैतन्य लंडनच्या रोमारोमात भिनले असल्यासारखे वाटतेय. खऱ्या अर्थाने कॉस्मोपोलिटन सिटी असणाऱ्या लंडनमध्ये टीम जीबीचे समर्थक युनियन जॅक फडकवताहेत तसे आपापल्या देशाला समर्थन करणारे इतरही चाहते दिसताहेत. लंडन ट्यूबमधून फिरताना वेगवेगळ्या वंशाचे असंख्य व्हॉलेंटिअर्सही भेटतात. कोणताही मोबदला न घेता प्रसंगी पदरमोड करून या महासोहळ्यात ते सहभागी होत आहेत. हा सोहळा 'आपल्या' शहरात यशस्वी व्हावा, यासाठी ते झटत आहेत. पण दुसरीकडे एक वेगळे चित्रही दिसतेय. सामान्य ब्रिटीश माणूस या डामडौलापासून काहीसा दूरच आहे. अलिप्त आहे.

ऑलिंपिक सुरू होण्याच्या आधीपासूनच वेगवेगळ्या स्तरांवर थोड्याफार नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. ऑफिसमध्ये लंच टाईमला होणाऱ्या चर्चेमध्ये जेवढे युरो कप फुटबॉ़लचे किंवा लाडक्या विम्बल्डनचे विषय चघळले गेले, तेवढे प्रेम ऑलिंपिकला मिळत नाहीय. ऑलिंपिकसाठी होणारा वारेमाप खर्च सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीत परवडणारा आहे का, ही यामागची खरी काळजी. ब्रिटीश नोकरदारांना ऑलिंपिकची गर्दी गैरसोयीची वाटतेय. रस्ते बंदट्यूबला गर्दी आणि वाहतुकीवरील ताण यामुळे रूटीन बिघडायला लागले आहे. काही ब्लॉगवरून, वर्तमानपत्रांतून येणाऱ्या खास ब्रिटीश शैलीतील प्रतिक्रिया याबाबतीतबोलक्या आहेत. आमच्यासारख्या करदात्यांचा पैसा उधळून (सध्याच्या परिस्थितीत) न परवडणारा सोहळा करणे म्हणजे पैशाचा अपव्यय - ऑबसीन वेस्ट ऑफ मनी आहे’, ज्या खेळांबद्दल एवढ्या उत्साहात बोलले जात आहे, ते खेळ आपल्याबरोबर अनावश्यक गर्दी, अव्यवस्था आणि गैरसोय घेऊन येताहेत’, अशा तिखट प्रतिक्रिया काही वैतागलेले इंग्रज देऊ लागले आहेत.

मूळात असे एकत्र येऊन, गर्दी करून सार्वजनिकपणे सोहळा साजरा करणे ब्रिटीशांच्या शिस्तीच्या संस्कृतीत फारसे बसत नाही. त्यामुळे ऑलिंपिकच्या धामधुमीपासून काही जण दूरच राहणे पसंत करतात. ऑलिंपिकच्या उत्साहाबाबत आसपासच्या काही ब्रिटीशजनांना विचारले असता काहीशा सौम्य आणि थंड प्रतिक्रियाच व्यक्त झाल्या. वाहतुकीवर ताण येणार त्यामुळे ऑफिसला वेळेवर पोचणे याचे टेन्शन आहे. पण ऑलिंपिकसारखा सोहळा आयुष्यात एकदाच अनुभवायला मिळतो. सध्याच्या परिस्थितीत खर्च न परवडणारा आहे, मान्य. पण पैशाच्या अपव्ययाची इथे इतर उदाहरणे आहेत. ऑलिंपिकवर खर्च झाला तर अपव्यय ठरणार नाही’, एका ब्रिटीश कंपनीत काम करणारा अधिकारी सांगतो. आमच्या शहरात ऑलिंपिक पुन्हा एकदा होतंय हे चांगलं आहे’, एवढ्यावरच इतर अनेकांचा उत्तर देण्याचा उत्साह मावळतो.  

ऑलिंपिक बिझनेस

ऑलिंपिक काळात होणारी वाहतुकीची कोंडी, बंद असणारे रस्ते, ट्यूबला होणारी गर्दी यांच्या बातम्या सतत येत आहेत. खासगी वाहनाने सेंट्रल लंडनमधील प्रवास शक्यतो टाळा, असे आवाहन होत आहे, तरी लंडनवारी करणाऱ्या पर्यटकांवर याचा परिणाम फारसा झालेला दिसत नाही. उलट ऑलिंपिकनिमित्त सजलेली लंडन नगरी बघण्यासाठी येथे येणाऱ्या पर्यटकांच्यात वाढच झालेली दिसते. हे ऑलिंपिक टुरिझम कॅश करायला अनेक व्यावसायिक सरसावले आहेत.
छायाचित्र सोनाली पटवर्धन भोसले
वीकएंडला सेंट्रल लंडनमधील काही गजबजलेल्या पर्यटन स्थळांवर चक्कर मारली, तेव्हा लंडन आय, वेस्टमिन्स्टर, ट्रॅफलगार स्क्वेअर ही ठिकाणे नेहमीपेक्षा जास्त गजबजलेली दिसली. एका परदेशी पर्यटकाला विचारले असता तो म्हणाला, ही काही लंडनची पहिली भेट नाही. पण ऑलिंपिक काळात लंडन कसे दिसते हे बघायला मुद्दाम आलो आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये जुलै- ऑगस्ट हा शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा काळ असतो. सुट्ट्यांची संधी साधून अनेक जण लंडनवारी करीत आहेत. ब्रिटनच्या इतर भागातून लंडनला येणाऱ्या स्थानिक पर्यटकांमध्येही वाढ झालेली दिसतेय. ब्रिटनमध्येही शाळांना सुट्टी असल्याने बच्चेकंपनीबरोबर टीम जीबीला प्रोत्साहन देणाऱ्यांची गर्दी रस्त्यांवर दिसत आहे. लंडनच्या रस्त्यांवर विक्री करणाऱ्या छोट्या स्टॉलवाल्यांपासून महागड्या ब्रँडेड दुकानांपर्यंत सगळ्यांना जणू ऑलिंपिक सोव्हेनियर शॉपचे रूप आले आहे. पर्यटकही या दुकानांमध्ये गर्दी करून ऑलिंपिक सॉव्हेनियर खरेदी करताना दिसताहेत.
ऑलिंपिकवर एवढे पैसे उधळले, १५ दिवसांसाठी ९३ कोटी पाउंडचा चक्काचूर होणार, अशी हळहळ व्यक्त होत असली, तरीही ब्रिटनला ऑलिंपिकमुळे व्यावसायिक फायदा होण्याचीही चिन्ह आहेत. जागतिक मंदीच्या लाटेनंतर ब्रिटन अजूनही सावरलेलेच नाही. उलट युरो क्रायसिसमुळे यांची हालत आणखी खालावली आहे. देशाची आर्थिक परिस्थिती वाईट असताना ऑलिंपिकसारखा महासोहळा आयोजित करण्याचे ठरल्याने आणि त्यावर वारेमाप पैसा खर्च केल्याने अनेक ठिकाणहून टीका होत होती. मात्र याच ऑलिंपिकचा बिझनेस अपॉर्च्युनिटी म्हणून वापर करण्याचे ब्रिटीशांनी योजले आहे.
ऑलिंपिकच्या निमित्ताने एक मोठी व्यापारविषयक परिषद सध्या लंडनमध्ये सुरू आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे प्रमुख, युरोपियन सेंट्रल बँकेचे पदाधिकारी तसेच गुगल, याहू सारख्या कंपन्यांचे सर्वेसर्वा अशी बडी मंडळी या परिषदेत उपस्थित आहेत. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी स्वतः या परिषदेत आमच्या देशात गुंतवणूक करा असे आवाहन जगभरातील गुंतवणुकदारांना केले. ऑलिंपिकनिमित्त गुंतवणुकदारांचे घबाड हाती लागावे, अशी आशा ब्रिटनला आहे.

Thursday, August 2, 2012

ऑलिंपिकला जायचेय पण...


ऑलिंपिकला हजेरी लावणे ही वन्स इन लाईफटाईम म्हणतात, तशी संधी. आपल्या शहरात ही संधी चालून आली म्हटल्यावर लंडनवासी त्यावर तुटून पडतील अशी आशा होती. मात्र अजूनही काही स्पर्धांची  तिकीटे खपली नसल्याच्या बातम्या येत आहेत. दुसरीकडे आमची ऑलिंपिकला जायची इच्छा आहे, पण तिकीटच नाहीत, असे म्हणणारेही अनेकजण दिसताहेत. खरे तर ऑलिंपिकची तिकीटे मिळण्याच्या प्रक्रियेमुळेच हा गोंधळ होत आहे.
वर्षभरापूर्वीच ऑलिंपिक तिकीटांची विक्री अधिकृतपणे सुरू झाली. सुरवातीलाच ज्यांनी ती आरक्षित केली, त्यांना फारसा त्रास झालेला नाही. मात्र ऑलिंपिकच्या आधी २- ३ महिने ज्यांना जाग आली, त्यांची मात्र पंचाईत झाली. कारण सर्वसामान्यांच्याआवाक्यातील तिकीटे तोपर्यंत संपली होती. तिकीटांची न परवडणारी किंमत हेच खुर्च्या रिकाम्या राहण्यामागचे कारण असावे. किंमतीनुसार तिकीटे चार श्रेणीत विकली जात आहे आणि ए श्रेणीची सर्वात महागडी तिकीटेच शिल्लक राहिली आहेत. जगभर गाजलेल्या लंडन ऑलिंपिक उद्घाटन सोहळ्याची काही तिकीटे शेवटपर्यंत विकली गेली नव्हती. एए श्रेणीतील एका श्रेणीतील तिकीटाची किंमत २०१२ पाउंड (एक लाख साठ हजार रुपयांहून अधिक) तर ए श्रेणीतील तिकीटांची प्रत्येकी १६०० पाउंड एवढी किंमत होती.
रिसेलच्या तिकीटांमधून भाग्यवान असाल तर तिकीटे मिळवण्याची संधी हाती राहिली आहे. लंडन ऑलिंपिक २०१२ च्या अधिकृत संकेतस्थळावरून परत आलेली तिकीटे विकण्याची सोय केली आहे. ही रिसेलची तिकीटे उपलब्ध झाल्याचे कळल्यानंतर वेबसाईट उघडून बघेपर्यंत त्यातील निम्म्याहून अधिक तिकीटे संपलेली असतात. आयत्या वेळी रांगा लावून तिकीट खरेदीची सोय काही खेळांसाठी आहे, तर काही ठिकाणी तसे नाही.
ऑलिंपिकची सर्वाधिक तिकीटविक्री ऑनलाईनच झाली. तिकीटांसाठी अधिकृत संकेतस्थळावरूनच व्यवहार करा असे ऑलिंपिक संयोजक सतत सांगत असले तरी बोगस संकेतस्थळांवरून ऑलिंपिक तिकीटविक्रीची लिंक देण्याचे प्रकार अजून सुरू आहेत. त्यासंदर्भात चेकलिस्ट दिली असली, तरी रोज अशा प्रकारे बनवाबनवी करणाऱ्यांवर कारवाई होत असल्याच्या बातम्या येत आहेत.
ऑलिंपिकची ७० टक्के तिकीटे ब्रिटनवासीयांनी विकत घेतली आहेत. युरोपीयन युनियनमधून येणाऱ्या प्रेक्षकांना तिकीटे मिळणे सोयीचे जावे यासाठी संयोजकांनी तिकीटांचा ठराविक कोटा या देशांच्या ऑलिंपिक डेलिगेशनकडे दिला होता. आज चेक रिपब्लिकच्या डेलिगेशनकडे तिकीटे शिल्लक आहेत, उद्या दुसऱ्या कुठल्या, अशा बातम्यांना ऊत येत आहे. त्यामुळे तिकीटांसाठी धावपळ करणाऱ्यांसाठी एखादे दार किलकिले होते खरे पण रांगा लावण्याआधी कुठलीच शाश्वती देता येत नाही.

Wednesday, August 1, 2012

सायकल चालवा


शुक्रवारचा उद्घाटन सोहळा झोकात पार पडल्यानंतर आता सेंट्रल लंडनमध्ये फिरताना ऑलिंपिक फीवर चांगलाच पसरलेला जाणवतोय. वीकएंडला गर्दीने फुललेल्या रस्त्यांवर चालत ऑलिंपिकच्या रंगात सजलेली लंडन नगरी बघायला शेकडो पावले सेंट्रल लंडनकडे वळत आहेत. पर्यटक म्हणून हा वेगळा अनुभव असला तरी लंडनकरांना ट्रॅफिक जॅममधून गाडी काढणे अगदी जीवावर येत आहे. मग या वर उपाय म्हणून शक्यतो या दिवसात गाडी बाहेर न काढणेच फायदेशीर ठरणारे आहे.
लंडन, पॅरिस या युरोपीय शहरांच्या मध्यवर्ती भागात फिरताना आपल्या मुंबईसारखीच ट्रॅफिक जॅम ही नेहमीचीच समस्या आहे. त्यातूनच आता लंडनमध्ये ऑलिंपिकची गर्दी. हे लक्षात घेऊन खुद्द लंडनच्या मेयरनेच ऑलिंपिक काळात कार चालवू नका, असे आवाहन केले होते. ट्यूब आणि बसही खच्चून भरलेल्या. अशा वेळी एकच पर्याय सर्वात फायदेशीर ठरणारा आहे. – सायकल.
हा पर्याय ऑलिंपिक आयोजकांनीही लावून धरलेला आहे. ऑलिंपकला येणाऱ्या प्रेक्षकांनी शक्यतो चालत किंवा सायकलवर यावे यासाठी खास प्रबोधन करण्यात येत आहे. शक्य नसेल तर ट्यूब किंवा बसने या, पण कार आणूच नका, असे आवाहन करण्यात येत आहे. लंडन ऑलिंपिकच्या ग्रीन गेम्स थीमचा हा भाग आहे. सेंट्रल लंडनमध्ये ठिकठिकाणी भाड्याने सायकल घेण्याची सोय आहे. सायकलसाठी खास रूट तयार केले आहेत. सायकलवरून येणाऱ्यांसाठी मोफत पार्किंगची सोय ऑलिंपिक पार्कजवळ करण्यात आली आहे. सायलिस्ट ब्लॉगवरून याविषयी लोकांना सतत माहिती देण्यात येत आहे. याउलट कारपार्किंगसाठी कमीत कमी ५ पाउंड मोजावे लागताहेत आणि कार पार्किंगची जागाही सायकल पार्किंगपेक्षा दूर आहे.

सायकलला सुवर्ण पदक
ऑलिंपिक सुरू झाल्यानंतर द इंडिपेंडंट या वृत्तपत्राने एक छान टेस्ट राईडची बातमी केली. स्ट्रॅटफर्डला (ऑलिंपिक पार्क येथे आहे) पोचण्यास कमीत कमी वेळ कुणाला लागतो - बस, ट्यूब, कार की सायकल ? हे ठरवण्यासाठी त्यांचे चार बातमीदार एकाच वेळी या वेगवेगळ्या वाहतूक साधनांसह स्ट्रॅटफर्डकडे निघाले. साडेआठ ते ९ मैलांचे हे अंतर पार करायला सायकलवरच्या बातमीदाराला सर्वात कमी वेळ म्हणजे ३३ मिनिटे लागली. ट्यूबने प्रवास करणाऱ्याला रौप्यपदक मिळाले तर कारने स्ट्रॅटफर्डला पोचलेला बातमीदार तिसरा आला. ट्रॅफिक मधून वाट काढत पोचायला त्याला जवळपास तास लागला. लंडन बस आणि थेम्समधून जाणाऱ्या रिव्हर बसचा वापर करून जाणारा चौथा बातमीदार सर्वात शेवटी पोचला आणि स्पर्धेतून बादच झाला. पण त्याचा अनुभव सर्वात सुखावह होता. कारण बाहेरच्या रहदारीचा, उन्हाचा, गर्दीचा जराही गंध नसणाऱ्या शांत निवांत थेम्समधून, डेकवर बसून बिअर किंवा कॉफीचे घुटके घेत आरामात ऑलिंपिक पार्कपर्यंत पोचता आले.  




Tuesday, July 31, 2012

क्राऊड मॅनेजमेंटची ऐशी तैशी


सेंट्रल लंडनमध्ये कुठेही गेले तरी सध्या फक्त ऑलिंपिक माहौल आहे. उत्साही पर्यटकांची गर्दी, टीम जीबीचे (ग्रेट ब्रिटन) टीशर्ट घातलेले समर्थक, वेळेवर स्पर्धास्थळी पोचायची चिंता चेहऱ्यावर घेऊन वावरणारे स्वयंसेवक आणि त्या गर्दीत आपापल्या ऑफिसला पोचायची घाई करणारे नोकरदार, असे एकूण चित्र दिसतेय. लंडनच्या ट्यूब  पिक टाईमला (म्हणजे ऑफिस सुरू व्हायच्या आणि सुटण्याच्या वेळेला) कायम भरलेल्या असतात. आपल्या मुंबईच्या लोकलइतकी नाही तरी खचाखच गर्दी या वेळेला हमखास असते. या गर्दीत ऑलिंपिकने भर पडली आहे. त्यातच ब्रिटिश हवा आता चांगली तापली आहे. एरवी हवाहवासा उन्हाळा ट्यूबच्या गर्दीत मात्र घाम काढतोय. त्यामुळे एरवी इंग्लिश सौजन्यासाठी प्रसिद्ध असलेला साहेबही चांगलाच कावला आहे.
पिक टाईममध्ये प्रवास टाळणे शक्य असेल तर टाळा, असे आवाहन सर्वसामान्य जनतेला करण्यात येत आहे. ट्यूब आणि नॅशनल रेलचे तिकीट पिक टाईमपेक्षा ऑफपिकचे कमी असते. शनिवार- रविवार ऑफ-पिक मानला जातो, कारण कार्यालयांना सुट्टी असते. पण आता ऑलिंपिकमुळे वीक-एंडच्या दिवशीसुद्धा ट्यूब भरून धावत आहेत. ऑलिंपिक काळात गर्दीमुळे पर्यटकांची आणि लंडनकरांची गैरसोय होऊ नये यासाठी गेले कित्येक दिवस प्रयत्न सुरू होते. ट्यूब स्टेशनवरील गर्दी विभागण्यासाठी अधिक एक्झिट पॉइंट्स केले. बाहेर पडणाऱ्यांसाठी दिशादर्शक फलक नव्याने लावले. प्रेक्षकांचा गोंधळ होऊ नये म्हणून कुठली स्पर्धा बघायला कुठे उतरा, जवळचे ट्यूब स्टेशन हे सांगणारे फलकही अंडरग्राउंड स्टेशनवर लागले. पण माणसांच्या लोंढ्यांपुढे ही तयारी अपुरीच ठरत आहे.
आग लागल्यावर काय करावे यासाठी जसे मॉकड्रील घ्यायची पद्धत आहेतशी क्राऊड मॅनेजमेंटसाठी गेले काही दिवस वेगवेगळ्यास्टेशन्सवर मॉकड्रील घेणे सुरू होते. ऑलिंपिकमुळे अती गर्दी झाली तर चेंगराचेंगरी टाळण्यासाठी कसे बाहेर पडावे यासाठी ही पूर्वतयारी होती. ट्यूबस्टेशनवर रिहर्सलमुळेच गोंधळ उडाला होता. तो गोंधळ काही ट्यूब स्टेशनवर अजूनही सुरू असल्याचे जाणवले. इव्हिनिंग स्टँडर्ड या लंडन ट्यूबमधील लोकप्रिय सायंदैनिकातील ही आकडेवारी ट्यूबच्या गर्दीत उभ्या उभ्याच वाचली तेव्हा कपाळावर जमलेल्या घर्मबिंदूंचा बांधच फुटला.

ऑलिंपिकनिमित्त लंडनमध्ये प्रवास करणारे प्रेक्षक – ९० लाख
स्पर्धक, पदाधिकारी, स्वयंसेवक आण पत्रकार – ३ लाख
पब्लिक ट्रान्सपोर्टच्या फेऱ्या – १ कोटी ५० लाख
गेम्स लेनची शिस्त न पाळणाऱ्या कारना उचलणारे टोइंग ट्रक – ७२