लंडन ही शेवटी यशस्वी बिझनेस सिटी आहे आणि सार्वजनिक वाहतुकीच्या मजबूत जाळ्यावर ही नगरी उभी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेय. गेल्या शुक्रवारी ऑलिंपिकचे जोशात उद्घाटन झाले आणि पुढचे दोन दिवस सुट्टीचे असल्याने सगळे शहरच ऑलिंपिकमय बनले. पण सोमवारपासून कामाचा आठवडा सुरू झाला. त्यातलेही पहिले दोन दिवस कितपत गर्दी आहे हे चाचपण्यात गेले आणि बहुतेकांचे सोमवार ‘वर्क फ्रॉम होम’मध्ये सरले. आता खऱ्या अर्थाने लंडनची परीक्षा सुरू झाली आहे.
या परीक्षेचा पहिलाच पेपर फार अवघड होता. कारण मंगळवारी सकाळीच लंडनची एक ट्यूबलाईन फायर अॅलर्टमुळे बंद पडली. एका ट्यूब ड्रायव्हरला आगीचा संशय आल्यामुळे तातडीने सेवा बंद करण्यात आली. ऑलिंपिक पार्कला जाणाऱ्या सेंट्रल लाईनवरच हा प्रकार घडला. अगदी ऑफिस पिक अवर्सना म्हणजे सकाळी ७ वाजल्यापासूनच लिव्हरपूल स्ट्रीटहून पुढे जाणाऱ्या सर्व अंडरग्राउंड ट्रेन अडकल्या. तर इतर काही मार्गांवरही याचा परिणाम जाणवला आणि त्या दिवशीचे सगळे ट्यूबचे टाईमटेबलच कोलमडले. त्यातून लंडनच्या लहरी हवामानाला जागून पावसाला सुरवात झाली. सकाळच्या घाईत कामावर निघालेल्या नोकरदारांना तर यामुळे फटका बसलाच पण ऑलिंपिक पार्ककडे निघालेल्या प्रेक्षकांचाही खोळंबा झाला.
ट्यूब किंवा ओव्हरग्राऊंड ट्रेन काही कारणाने बंद असली, तर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था तातडीने उपलब्ध करून दिली जाते. दुरुस्ती, देखभालीच्या कामासाठी रविवारी ट्रेन काही काळ बंद असते त्यावेळी ही पर्यायी बससेवा उपलब्ध असते आणि त्यासाठी वेगळे तिकीट काढावे लागत नाही. (आपल्याकडचा मेगा ब्लॉक आठवा...) मंगळवारीसुद्धा एकीकडे सेंट्रल लाईनवरील ट्यूब बंद असल्याची सूचना होत असतानाच स्टेशनबाहेर रेल रिप्लेसमेंट सर्व्हिसच्या बस उभ्या होत्या आणि प्रवासी रांगेने त्यात चढत होते.
आता सर्व आलबेल असल्याचे पाहून मंडळी ऑफिसला निघाली आहेत. रस्त्यावर ऑलिंपिक आणि ऑफिस अशी दोन्ही प्रकारची गर्दी दिसू लागली आहे. लोकांचा इथल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विश्वास आहे. म्हणूनच स्वतःच्या कार घरी ठेवून ट्यूबने प्रवास करणे ते पसंत करताहेत. परीक्षा कितीही अवघड असली, तरी चांगली तयारी झाली असल्याने लंडन पास होणार यात शंका नाही. बिझनेस सिटीतले काम थांबणार नाही आणि ऑलिंपिकची गर्दीही हटणार नाही.
गेम्स लेन मोकळ्या
ऑलिंपिकसाठी राखून ठेवलेल्या लेनमधून पहिले दोन दिवस फारशी वाहतुकच झाली नाही. ऑलिंपिकशी संबंधित पदाधिकारीही या गेम्स लेनमधून जाण्याऐवजी ट्रेनने जाणे पसंत करताहेत. त्यामुळे लंडन प्रशासनाने गेम्स लेनवरील बंधने शिथील करत काही भागात त्या सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या आहेत
No comments:
Post a Comment