Thursday, August 16, 2012

सलाम लंडन ! अलविदा !

बँड –बाजा- बारात सगळे छान झाले आणि निरोपाची घडी जवळ आली तशी लंडन
नगरीला पुन्हा हुरहूर लागली. बिदाईच्या कार्यक्रमापर्यंत अगदी जोषात,
नाचत –गात उत्साहात सगळे पार पडले. सतरा दिवस धगधगणारी ऑलिंपिक ज्योत
विझली. लंडनच्या ‘या’ घरचा लाडका ऑलिंपिक ध्वज रिओच्या ‘त्या’ घराकडे
सोपवण्यात आला, तेव्हा यजमानांच्या वतीने ते कार्य करणाऱ्या लंडनच्या
मेयरच्या चेहऱ्यावर सोहळा यथासांग पार पडल्याचे अपूर्व समाधान दिसत होते.

कार्याची धामधूम संपली तशी, ‘सोहळा कसा बाकी झकास झाला’, अशी चर्चा इथे
सुरू आहे. उद्घाटन सोहळा अर्थवाही होता, समारोपाला त्याची सर नव्हती, अशा
प्रतिक्रियाही येत आहेत. एकूणच ब्रिटीश संस्कृतीला गोंजारणारा, इंग्लिश
विकासाचे टप्पे दाखवणारा डॅनी बॉयलचा कार्यक्रम साहेबाला एकदम पसंत पडला
होता. त्यातून इंग्रजी अभिमान (आणि किंचित अहंकारही) कुरवाळला गेला. तसे
किम गॅविनच्या आफ्टर शो पार्टीतून ब्रिटीशांचे संगीत प्रेम आणि
सेलिब्रेशनचे कल्चर दिसून आले. पण या सगळ्यापेक्षा अधिक कौतुक सध्या होत
आहे, ब्रिटीश अॅथलिट्सचे. तिसऱ्या क्रमांकावर येऊन गेल्या शंभर वर्षातली
सर्वोत्तम कामगिरी इथल्या खेळाडूंनी यंदाच्या ऑलिंपिकमध्ये केली आहे.

आपल्या परंपरा, संस्कृती, ज्ञान, समृद्धी याबाबत पराकोटीचा अभिमान असलेला
साहेब, गुणीजनांचे कौतुक करताना मात्र हातचे काही राखत नाही. या
ऑलिंपिकमधून तेही जाणवले. सुरुवातीला आपल्या रुटीनमध्ये थोडा बदल करावा
लागणार, गर्दी वाढणार असे चुकचुकणारा साहेब ऑलिंपिक सुरू झाल्यावर मात्र
रंगात आला. चांगली कामगिरी करणाऱ्या इतर देशांच्या खेळाडूंनाही इथे
भरभरून प्रतिसाद मिळाला. युसेन बोल्टला तर ब्रिटीशांनी डोक्यावरच घेतले.
त्यातून आपल्या देशाची उत्तम कामगिरी पाहून तर अख्खा ब्रिटन ऑलिंपिकच्या
रंगात रंगला. टीम जीबीचे खेळाडू ब्रिटीश नागरिक असले तरी त्यामध्ये
वेगवेगळ्या वंशाचे, रंगाचे, वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगळी संस्कृती
जपणारे अनेकजण होते. कॉस्मोपॉलिटन लंडन शहराचे स्वरूप अगदी तसेच आहे.
सगळ्या भाषा, धर्म, संस्कृतींना सामावून घेतानाही आपला सांस्कृतिक अभिमान
जपणारी ही आजची लंडननगरी आणि टीम जीबीची या वर्षीची कामगिरी खरोखर
‘इन्सपायर द जनरेशन’ या ऑलिंपिक थीमला साजेशी ठरणारी आहे.

१७ दिवसांच्या या सोहळ्याची धामधूम गेली सात वर्षे सुरू होती. त्याचे चीज
झाल्याच्या समाधानात आता सगळे थोडे थंडावले असले तरी शहर लगेचच आपल्या
रुटीनला जुंपले गेले आहे. लंडनचा ईस्टएंड मात्र पुढचे काही दिवस भकास
दिसणार. जत्रा उठून दुसऱ्या गावी जाते, तेव्हा माणसे, दुकाने उठतात पण
पालं काही दिवस तशीच राहतात. ऑलिंपिकची पालं आता ईस्टएंडमध्ये उरली आहेत.
पुढचे अनेक दिवस ही रिकामी पालं त्या सगळ्या धामधुमीची, जल्लोषाची आणि
आनंदाची आठवण देत राहणार.

Wednesday, August 15, 2012

आफ्टरशो पार्टी मूड

दोन आठवडे सुरू असलेला क्रीडा जल्लोष आता अंतिम टप्प्यात आला आहे. हा लेख
वाचत असताना स्पर्धेचे सगळे निकालही लागलेले असतील. पदकतक्ता, त्यात
भारताचे स्थान, कामगिरी याची पूर्ण कल्पना आलेली असेल. आता वेळ आहे
समारोपाची. सतरा दिवस तेवत असलेल्या ऑलिंपिक ज्योतीला लंडन संगीतमय
वातावरणात अलविदा म्हणणार आहे. समारोपाचा कार्यक्रम कसा असेल, सिक्रेट
सेलिब्रिटी कोण असणार याची चर्चा सध्या रंगली आहे. उद्घाटन सोहळ्याइतका
गंभीर आणि अर्थवाही कार्यक्रम नसून ती एक रंगतदार आफ्टर शो पार्टी असेल,
असे ऑलिंपकचे संयोजकच सांगत आहेत.

ऑलिंपिकचा उद्घाटन सोहळ्याबाबत जेवढी उत्सुकता होती, तितकी नसली तरी आता
इथे क्लोजिंग सेरिमनीचे वेध लागले आहेत. साहेब आता सेलिब्रेशनच्या
मूडमध्ये आहे हे नक्की. ब्रिटनने गेल्या १०० वर्षातली सर्वोत्तम कामगिरी
या वर्षी ऑलिंपिकमध्ये केली आहे. एवढी पदके कमावल्याच्या आनंदात आता
रविवारची संध्याकाळ म्युझिकल पार्टीत रंगणार. डॅनी बॉयलने रंगवलेला
उद्घाटन सोहळा इंग्लिश आदरातिथ्य, कलाप्रेम, उज्ज्वल इतिहास, औद्योगिक
क्रांती, इंग्लिश कंट्री लाईफ अशा अनेक अंगांनी ब्रिटीश संस्कृतीचे दर्शन
घडवणारा होता. बॉयलने प्रत्येक प्रसंगामधून ब्रिटनबद्दल सांगण्याचा
प्रयत्न केला होता. त्यातले गर्भित अर्थ अनेकांना कळले नाहीत आणि तो
कार्यक्रम अनेकांच्या डोक्यावरून गेला. त्याबद्दल जगभरातून संमिश्र
प्रतिक्रिया आल्या. पण खऱ्या ब्रिटीश माणसाला मात्र कार्यक्रम आवडला.
साहेबाचा अभिमान आणि थोडा अहंकार कुरवाळला जाईल, असाच तो कार्यक्रम होता.
डॅनी बॉयलचे त्यामुळे वारेमाप कौतुकही झाले. आता किम गॅविन यांचा
समारोपाचा समारंभ मात्र एवढा अर्थगर्भी असणार नाही, अशी चर्चा आहे.
उद्घाटनाच्या कार्यक्रमासारखीच समारोप सोहळ्याबाबतही शेवटपर्यंत गुप्तता
पाळण्यात येणार आहे.

किम गॅविन हे नाव ब्रिटनमध्ये यशस्वी इव्हेंट मेकर म्हणून परिचित आहे.
सिम्फनी ऑफ ब्रिटीश म्युझिक या नावाने गॅविन प्रामुख्याने संगीत-
नृत्यप्रधान कार्यक्रम देणार आहे. स्पाईस गर्ल्स हा बँड या कार्यक्रमाचे
‘स्पाईस’ असल्याचे बोलले जात आहे. जगभरात लंडनची ऑलिंपिकची प्रतिमा कायम
कोरलेली राहावी यासाठी पुन्हा एकदा लंडन नगरीची वैशिष्ट्य असणाऱ्या
इमारती, पूल अगदी लंडनची ब्लॅक टॅक्सीसुद्धा कार्यक्रमात दिसेल. हा सोहळा
आयोजित करताना गॅविनपुढे सगळ्यात मोठे आव्हान आहे ते या शेवटच्या
पार्टीसाठी तयार होण्याचे. ऑलिंपिक स्टेडियमवरची शेवटची स्पर्धा
संपल्यानंतर केवळ १६ तासात सगळे स्टेज तयार करणे, टॉवर ब्रिज सारखे
लंडनचे लँडमार्क प्रतिकृतींच्या स्वरूपात साकारणे हे नक्कीच जिकीरीचे काम
आहे.

या ब्रिटीश पार्टीमध्ये लॅटिन अमेरिकन कसा आणि किती भाव खाऊन जातात हेही
पाहण्यासारखे असेल. क्लोजिंग सेरिमनीमध्ये २०१६ चे यजमान रिओ दी जानिरो
आठ मिनिटांत सांबा डान्स म्युझिकचे कौशल्य दाखवणार आहेत. पुढच्या
ब्राझिलियन ऑलिंपिकची ही नांदी म्हणायला हरकत नाही.

Tuesday, August 14, 2012

एकाक्ष वेनलॉकची क(व्य)था


ऑलिंपिक स्पर्धेचा चेहरा म्हणजे ऑलिंपिकचा शुभंकर - मॅस्कॉट. आजपर्यंतच्या इतिहासात ऑलिंपिक मॅस्कॉटस तुफान लोकप्रिय झालेले दिसतात. यजमान देशाची ओळख सांगणारा मॅस्कॉट स्पर्धेच्या प्रत्येक ठिकाणी सतत दिसत
राहतो.  लंडन ऑलिंपिकचा मॅसकॉट - वेनलॉक हा सुरुवातीला त्याच्या वेगळेपणामुळे गाजला. जागोजागी हा वेनलॉक दिसतोय खरा पण त्याची आत्तापर्यंत फारच कमी दखल घेतली गेली आहे. लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्याचे भाग्य वेनलॉकच्या वाटेला येईल की नाही याची शंका आहे.

स्टीलपासून बनलेला, मोठे डोके असलेला, हातात फ्रेंडशिप बँड घातलेला हा एकाक्ष वेनलॉक प्रथमदर्शनी विचित्र असा प्राणी वाटतो. हा कुठल्या परग्रहावरील जीव आहे का, अशा प्रतिक्रिया याच्या पहिल्या दर्शनानंतर सामान्यांकडून आल्या होत्या त्या यामुळेच. खरे तर संयोजकांना वेनलॉकच्या या असल्या रुपामधून बराच आशय सांगायचा आहे. औद्योगिक क्रांतीची जननी असलेल्या लंडन नगरीने आता जागतिक डिजिटल युगाचा ध्यास घेतला आहे हे सांगायला त्याची निर्मिती स्टीलच्या एका थेंबातून झालेली त्यांनी दाखवली
आहे आणि डोळा म्हणून कॅमेरा लेन्स लावली आहे. पुन्हा मॅस्कॉटमधून जागतिक बंधुभाव व्यक्त करण्याचाही संधी सोडलेली नाही. त्यासाठी त्याच्या हातात ऑलिंपिक रिंगच्या पाच रंगातले फ्रेंडशिप बँड घालण्यात आलेत. लंडनची ओळख असणाऱ्या पारंपरिक ब्लॅक टॅक्सीची आठवण करून देणारा पिवळा हेडलाईट
डोक्यावर लावलेला आहे. हा एवढा सारा गर्भित अर्थ किती लोकांपर्यंत पोचतोय माहित नाही. प्रथमदर्शनी तरी याची ओळख ‘वनआईड क्रीचर’ अशीच बनली गेली आहे एवढे खरे.

ऑलिंपिक मॅस्कॉट छान असावा, लहान मुलांना आवडेल, गोड वाटेल असा असावा, अशी आत्तापर्यंतची पद्धत होती. सर्वसाधारणपणे ऑलिंपिकच्या यजमान देशात सापडणारा प्राणी किंवा यजमान देशाची ओळख ठरू शकेल असे कॅरॅक्टर मॅस्कॉट म्हणून वापरले गेले. यजमान देशातील जनतेने यातील अनेक मॅस्कॉटना अगदी
डोक्यावर घेतले. अस्वलाचे पिल्लू, वाघांचे बछडे, गरुड यांची कॅरॅक्टर्स ऑलिंपिकचे मॅस्कॉट म्हणून येऊन गेली आहेत. आपल्याकडे एशियाडचा अप्पू आणि नॅशनल गेम्सचा राजू अजूनही अनेकांच्या लक्षात असेल. यंदाच्या वेनलॉकला लोकांनी तेवढे आपलेसे केलेले नाही. १९९६ ला अमेरिकेत झालेल्या अटलांटा ऑलिंपिकच्या वेळी व्हॉट्जिट किंवा इज्झी असे विचित्र नाव ठेवलेला मॅस्कॉट असाच लोकांना झेपला नव्हता. पहिले कॉम्प्युटर जनरेटेड कॅरॅक्टर असे कौतुक झाले तरी तो लोकांना फारसा रुचला नव्हता. आता इंग्लिश वेनलॉकची तुलना अमेरिकन इज्झीशी होत आहे.

नाव आले कुठून?

इंग्लंमधील श्रोपशायर परगण्यात असलेल्या ‘मच वेनलॉक’ या गावाच्या नावावरून ऑलिंपिक मॅस्कॉटला तसे नाव देण्यात आले. या गावाला आधुनिक ऑलिंपिकच्या इतिहासात आद्य स्थान आहे. मच वेनलॉक येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धांपासून प्रेरणा घेऊनच प्राचीन ग्रीक ऑलिंपिक परंपरेचे १९ व्या शतकात पुनरुज्जीवन करण्यात आले. पॅरालंपिकचा मॅस्कॉट मँडेव्हिलचे नाव एका इंग्लिश हॉस्पिटलवरून ठेवण्यात आले आहे. बकिंगहॅमशायर परगण्यातील स्टोक मँडेव्हिल हॉस्पिटलच्या डॉ लुडविग गटमन यांनी १९४० च्या दशकात स्टोक मँडेव्हिल गेम्स सुरू केले. पॅरालंपिक गेम्सची ती मुहूर्तमेढ होती, असे मानले जाते.

ब्रिटीश ब्रिटीश परंपरेला जागून काहीतरी खूप वेगळे करण्याच्या नादात लंडन ऑलिंपिकमध्ये हे वेनलॉक आणि मँडेविल सादर केले पण लोकांच्या मनाला ते भिडले नाहीत, हे खरे.

चोख सुरक्षा आणि लंडनचे भामटे


स्पर्धेदरम्यानची सुरक्षा व्यवस्था हा ऑलिंपिककाळात लंडनसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. जागतिक दहशतवादाचा तडाखा २००५ मध्ये लंडनला बसला असल्याने प्रशासनाने सुरक्षेत कोणतीही कसर ठेवलेली नाही. जागोजागी पोलिस तैनात आहेत. या चोख व्यवस्थेमुळे स्पर्धेच्या काळात गुन्हागारीचे प्रमाण कमी असेल, अशी आशा लंडन प्रशासन व्यक्त करीत आहे. कारण या आधीच्या विशेषतः सिडने ऑलिंपिकच्या वेळेला यजमान शहरातील क्राईम रेट एकदम कमी झाला होता. लंडनमध्ये मात्र अद्याप तसा ट्रेंड दिसलेला नाही. उलट पोलिसांचा आव आणून लोकांना लुबाडण्याचा नवा फंडा लंडनच्या भामट्यांनी शोधून काढला आहे.

चार दिवसांपूर्वी लंडन प्रशासन आणि पोलिस खात्याकडून सर्व मोठ्या कंपन्या आणि ऑफिसमध्ये एक विशेष अॅलर्ट जारी करण्यात आले. वृत्तपत्रांमधूनही सावधगिरीची सूचना देण्यात आली. आपण साध्या वेशातील पोलिस असल्याची बतावणी करत प्रेक्षकांना, पर्यटकांना लुबाडण्याच्या काही घटना घडल्याने सावध राहावे, अशी सूचना खुद्द पोलिसांनीच दिली आहे. गेल्या आठवड्यात लंडनच्या भामट्यांनी चोरीची ही वेगळीच शक्कल चालविल्याचे उघड झाले. हे साध्या वेशातील खोटे पोलिस लोकांकडे पैसे मागतात आणि जवळ कॅश नसेल तर एटीएममधन ती काढून द्यायलाही लावतात. सेंट्रल लंडनमध्ये अशी चलाखी करणाऱ्या दोघांना शेवटी अटक झाल्याचे कळले. पण तरीही हे प्रकार थांबलेले नाहीत.

शहरात गर्दी वाढली की, त्याचा फायदा भुरटे चोर, पाकिटमार घेतातच. पण जगभरात नावाजलेल्या स्कॉटलंड यार्ड किंवा बॉबीच्या नावाखालीच अशी लूटमार केली जात आहे, हे विशेष. खरे तर ऑलिंपिकच्या काळात कोणताही धोका उद्भवू नये म्हणून युद्धपातळीवर सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली आहे. ऑलिंपिक पार्कच्या जवळच्या उंच इमारतींवर जमिनीवरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्र सज्ज ठेवण्याची तयारीही होती. त्यावरून इथे थोडा गदारोळ माजला होता. लिटनमधील एका टॉवरमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी याला आक्षेप घेतला. ग्रीनीचजवळच्या नदीपात्रात ब्रिटनमधील सर्वात मोठी युद्धनौका तैनात करण्यात आली आहे. यावरून टेहळणी करणारी हेलिकॉप्टर झेपावत असतात. १० हजारांवर पोलिसांखेरीज आणखी तेवढेच खासगी सुरक्षारक्षक आणि १३,५०० लष्करी जवान ऑलिंपिक स्पर्धेसाठी सज्ज आहेत.  

सुदैवाने ऑलिंपिकदरम्यान किरकोळ गुन्ह्यांखेरीज अद्याप तरी मोठा पेच उभा राहिलेला नाही. बहुतेक गुन्ह्यांचे स्वरूप चिथावणीखोर भाषण, रेशियल अब्युज, शिवीगाळ, दारू पिऊन धिंगाणा घालणे असे आहे. प्रेक्षक, स्पर्धक आणि ऑलिंपिक अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणारे गुन्हेगार अधिक. अशा ऑलिंपिक ऑफेन्ससाठी अटक झालेल्या कोणालाही २४ तासांच्या आत न्यायालयात हजर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहेत. स्ट्रॅटफर्डला सुरू केलेल्या फास्ट ट्रॅक कोर्टात या केस चालतात. ऑलिंपिक दरम्यान न्यायव्यवस्थेवर कामाचे दडपण येऊ नये म्हणून आधीच सुट्टीचे विशेष कोर्ट बसवून प्रलंबित प्रकरणे निकालात काढली गेली होती. विशेषतः वर्षभरापूर्वी लंडनमध्ये उसळलेल्या दंगलीच्या केस संपवण्यासाठी त्याचा उपयोग झाला.

Monday, August 13, 2012

ऑलिंपिकमधले उत्साही 'नारायण'


कोणताही सोहळा यशस्वी करण्यासाठी आपुलकीने राबणारे हात हवे असतात. लग्नकार्यात एखादा तरी नारायण लागतोच. ऑलिंपिकसारख्या महासोहळ्यासाठी तर असे अनेकजण लागतात. कोणत्याही मोबदल्याशिवाय आपुलकीने आणि पडेल ते काम करणारे असे ७० हजारांवर नारायण ऑलिंपिकसाठी राबत आहेत. या व्हॉलेंटिअर्सशिवाय एवढा मोठा सोहळा पार पडूच शकला नसता याची ऑलिंपिक संयोजन समितीलाही जाणीव आहे आणि म्हणूनच त्यांना गेम मेकर्स असे म्हटले जात आहे.

हे स्वयंसेवक निवडण्याची प्रक्रिया गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीतच सुरू झाली. ऑलिंपिकसाठी काम करायला २ लाख ४० हजार अर्ज आले होते. त्यापैकी लाखभर जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि ७० हजार जणांना निवडण्यात आले. सध्या ट्रेन स्टेशनपासून ऑलिंपिक पार्कपर्यंत सगळीकडे प्रेक्षकांना मार्गदर्शन करणारे हे हजारो व्हॉलेंटिअर लंडनभर दिसत आहेत. जांभळ्या गणवेशातील हे मदतनीस अगदी उत्साहाने, हसतमुखाने आपणहून तुमची चौकशी करतात, तेव्हा खरच आपण एखाद्या कार्याला आलो आहोत आणि यजमानांचे प्रतिनिधी विचारपूस करीत असल्याचा भास होतो. या गेम मेकर्समध्ये काही मराठी नावेही आहेत हे विशेष.

जयेश रेवाटकर
या जागतिक महासोहळ्याचा प्रत्यक्ष भाग होणं म्हणजे लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी. आता पुढच्या पिढीलाही मी अभिमानाने सांगू शकेन, एवढा छान अनुभव मिळाला. देशाविदेशातील सपोर्टर्सचा जोश पाहून चार्ज झालो आहे,” जयेश रेवातकर सांगत होते. एका पेट्रोलियम कंपनीसाठी मॅनेजर म्हणून काम करणारे ४४ वर्षीय रेवातकर थेट ऑलिंपक स्टेडियममध्ये सिक्युरीटी टीमचा भाग म्हणून काम करीत आहेत. मुलाखतीमध्ये खेळाबद्दलची पॅशन, काम करण्याचा उत्साह बघून निवड करण्यात आली, असे ते सांगतात. त्यानंतर प्रत्येकी ३ ते ४ तासांची तीन ट्रेनिंग सेशन्सही झाली. वेम्बली स्टेडियम आणि ऑलिंपिक पार्क अशा दोन ठिकाणी काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

रंगनाथ ऊर्फ जयंत देशपांडे अशाच काही उत्साही गेममेकर्सपैकी एक मराठी नाव. मूळचे नांदेडचे, पेशाने इंजिनअर आणि जनरल इलेक्ट्रिकलसारख्या बड्या कंपनीत नोकरी. पण केवळ खेळाविषयी पॅशन असल्याने सात दिवस सुट्टी घेऊन ऑलिंपिकसाठी स्वयंसेवक म्हणून रुजू झाले. रीडिंग शहरातून दररोज सकाळी उत्साहाने ते लॉर्ड्स गाठत होते. तेथे होणाऱ्या आर्चरीच्या स्पर्धेसाठी देशपांडे यांची नेमणूक झाली होती. "लहानपणापासूनच खेळाची आवड होती. क्रिकेट आणि फूटबॉल तर जिव्हाळ्याचा विषय. ऑलिंपिकचा प्रत्यक्ष भाग होण्याचा अनुभवच विलक्षण होता. त्यात क्रिकेटची पंढरी असणाऱ्या लॉर्ड्सवर एवढा वेळ घालवायला मिळाला ते सुख वेगळंच",  ते सांगतात. देशपांडे अजूनही पूर्णपणे ऑलिंपिकमय आहेत. २८ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान दररोजचे सात ते नऊ तास व्हॉलेंटिअर म्हणून घालवल्यानंतर आता इतर स्पर्धा बघायलाही सहकुटुंब जाताहेत. 

Saturday, August 11, 2012

लॉजिस्टिक्सला सलाम


लंडनसारख्या प्रचंड मोठ्या शहरात ऑलिंपिक आयोजित करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. शहराचे इतर व्यवहार सुरळीत चालतील याची काळजी घेणे आणि त्याचवेळी ऑलिंपिकच्या प्रेक्षकांना, खेळाडूंना, संबंधितांना वेळच्या वेळी स्पर्धेच्या ठिकाणी कसे पोचता येईल, याचीही सोय बघणे. एवढ्या मोठ्या शहरात विशेषतः सार्वजनिक वाहतुकीने फिरताना नवख्या माणसांचा गोंधळ उडणे सहाजिक आहे. पण लंडन ऑलिंपिकसाठी लॉजिस्टिक्स इतके छान तयार केले आहे, की कोणीही सराईतासारखा फिरू शकेल. ऑलिंपिकचे साईन बोर्ड्स, नकाशे, स्क्रीन, मोबाईल अॅप्लिकेशन्स यांच्या जोडीला हजारो स्वयंसेवक उभे केल्याने पत्ता विचारण्याची वेळच येत नाही.

लंडनचा पसारा ८ झोनमध्ये विभागला आहे. वेस्टमिन्स्टर म्हणजेच सेंट्रल लंडनचा जुना भाग झोन १ मध्ये येतो. पूर्वेला आणि पश्चिमेला २, ३, ४ असे झोनचे परिघ वाढत जातात. आठव्या झोनमध्ये राहणारी व्यक्ती सेंट्रल लंडनपासून सर्वात दूर राहते. ऑलिंपिक पार्क पूर्वेकडच्या झोन ३ मध्ये येते. ऑलिंपिकच्या अनेक स्पर्धा स्टेडियमबाहेरही वेगवेगळ्या ठिकाणी होत असल्याने लंडनभर ऑलिंपिकची वाहतूक सुरू आहे. पश्चिमेच्या वेम्बलीपासून पूर्वेला ग्रीनीचपर्यंत अनेक ठिकाणे ऑलिंपिकमय आहेत. पण तरीही स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत पोचताना कोणतीही अडचण जाणवत नाही. कारण ऑलिंपिकचे व्हॉलेंटिअर्स जागोजागी मदतीसाठी उभे आहेत.

एखादा गावाकडचा माणूस पहिल्यांदा शहरात येतो मोठे रस्ते, गाड्या पाहून तेव्हा गांगरून जातो, तसे गांगरायला लावणारा ट्यूब- बस- ट्रेनचा पसारा लंडनमध्ये दिसतो. लंडनच्या रस्त्यांखाली रेल्वेचे खरोखर जाळे विणलेले आहे. आठ झोनना जोडणाऱ्या एकूण १० अंडरग्राऊंड ट्यूब लाईन्स, शिवाय ओव्हरग्राऊंड आणि नॅशनल रेल वेगळ्या. एवढा हा पसारा आहे. सुरुवातीला याचेच दडपण येऊ शकते. पण ज्या ट्यूब स्टेशनजवळ ऑलिंपिक इव्हेंट आहे, त्या स्टेशनवर मोठ्या अक्षरात तसे बोर्ड लागलेले आहेत. तिथपर्यंत जायचा नकाशाही आहे. शिवाय काही स्टेशनवर रस्त्याचा टच स्क्रीन इंटरअॅक्टिव्ह मॅप लावला आहे. हॉर्सगार्ड परेडसाठी येथे उतरा अशा अनाउन्समेंट ट्यूबमध्येही सतत होतच असतात. ट्यूब स्टेशनपासून स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत जागोजागी रस्ता दाखवणारे साईनबोर्ड्स लागले आहेत.

वॉटर्लू, व्हिक्टोरिया, पॅडिंग्टन, किंग्ज क्रॉस या लंडनच्या चारही मोठ्या ट्रेन स्टेशनच्या बाहेर मोठा इन्फॉर्मेशन डेस्क उभा केला आहे. तेथे ऑलिंपिकच्या इव्हेंटची माहिती, तिथपर्यंत पोचायचे कसे हे सांगणारे नकाशे शिवाय लंडनचा नकाशा, ट्यूब मॅप, बस रूट, सायकल रूट, वॉकवे असे अनेक नकाशे मोफत उपलब्ध आहेत. ट्रान्सपोर्ट फॉर लंडननेदेखील खास माणसे मार्गदर्शनसाठी तैनात केली आहेत. लंडनच्या चारही बड्या ट्रेन स्टेशनवर आणि स्टेशनबाहेर गुलाबी आणि जांभळे डगले घातलेले अनेक ऑलिंपिक व्हॉलेंटिअर उभे असलेले दिसतात. त्यांचा उत्साहसुद्धा वाखाणण्यासारखा आहे. तुम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन पत्ता विचारण्याआधीच मे आय हेल्प ची साद ते घालतात. या हजारो मार्गदर्शकांना ऑलिंपिकचे प्रेक्षक धन्यवाद देत आहेत. जगातील एका प्रचंड मोठ्या शहरातला वावर त्यांच्यामुळे फारच सोपा होऊन जातो. लंडन ऑलिंपिकच्या लॉजिस्टिक टीमला यासाठी सलाम.


Friday, August 10, 2012

शहरी गणिते बदलताना


ऑलिंपिकमुळे बदललेली लंडन ईस्टएंडची स्कायलाईन
शहर रचना कितीही काटेकोरपणे केली, तरी कोणत्याही मोठ्या शहराचे सगळे प्रभाग, उपनगरे सारखी विकसित होऊ शकत नाहीत. लंडनसारख्या अवाढव्य शहरात तर हे शक्यच नाही. आपल्याकडच्या कोणत्याही मोठ्या शहरात ही बाब अगदी प्रकर्षाने दिसते. शहराचा एखादा भाग चकाचक होतो तर एखादा बकाल राहतो. साहेबाच्या देशात कितीही शिस्तीचा कारभार असला, तरी असे बकाल भाग आहेतच. तिथल्या जागांचे भाव आणि हाय प्रोफाईल लंडनमधील भाव यात जमीन आस्मानाचा फरक आहे. ऑलिंपिकच्या निमित्ताने या शहरी आडाख्यांची गणिते मात्र बदलत आहेत.

पूर्व लंडनचा भाग शहरातला सगळ्यात गरीब लोकवस्तीचा म्हणून अगदी २ वर्षांपूर्वीपर्यंत ओळखला जायचा. पण ऑलिंपिक पार्क उभारायच्या हालचाली सुरू झाल्या आणि या भागाने जणू कातच टाकली. ऐतिहासिक काळापासूनच लंडनचे हे ईस्ट एंड तसे बकालच. लिआ नदीच्या बाजूचा हा परिसर स्थलांतरित गरीबांची वस्ती म्हणूनच ओळखला जायचा. लंडन शहराची वस्ती जशी वाढू लागली, तशा शहरातील सुविधा वाढवण्यात आल्या. वीसाव्या शतकाच्या सुरुवातीला नगररचनेत कालानुरूप असे बदल होताना जागा मोकळी करण्यासाठी सेंट्रल लंडनच्या आसपास असलेल्या गरिबांच्या वस्त्या हटवण्यात आल्या. या सगळ्यांनी गाशा गुंडाळून शहराबाहेरचा पूर्वेचा रस्ता धरला. असे शहरातून ढकलले गेलेले, तसेच परदेशातून आलेल्या लोकांनी ईस्ट एंडमध्ये संसार मांडले. या अर्धशिक्षित लोकांना सामावून घेणारे व्यवसायच इथे बहरले. जुनाबाजार, खाणकाम, डॉकयार्डमुळे जहाजबांधणी असे कष्टकऱ्यांचे व्यवसाय येथे होते. त्यातून दुसऱ्या महायुद्धात ईस्ट एंडचा हा भाग बॉम्ब हल्ल्यांच्या भक्ष्यस्थानी पडला. ईस्ट एंडची अपरिमित हानी झाली. नंतर तर हा भाग डंपिंग ग्राउंड म्हणूनच वापरला गेला.
ईस्ट एंडच्या डंपिंग ग्राऊंडवर असे चकाचक मॉल उभे राहिले आहेत.
युद्धसमाप्तीनंतर दशकभराने पूर्व लंडन सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले. सुरवातीला कॅनरी वॉर्फचा भाग बिझनेस डिस्ट्रीक्ट म्हणून विकसित केला गेला. तरीही वेस्टएंडच्या कला- शिस्त- परंपरेने नटलेल्या संस्कृतीपासून लंडनचे ईस्ट एंड तसे दूरच राहिले होते. आता ऑलिंपिकमुळे या सुधारणेच्या अध्यायाची सांगता झाली असे म्हणता येईल. डंपिंग ग्राउंडचे आधुनिक ऑलिंपिक व्हिलेजमध्ये रुपांतर झाले. स्ट्रॅटफर्ड इंटरनॅशनल स्टेशन बनले. ईस्टहॅम, वेस्टहॅम, लेटन ही कमी भाव असलेली बाजूची उपनगरेही एकदम प्रकाशझोतात आली आहेत. चकाचक इमारती, मॉल यामुळे स्ट्रॅटफर्डचा भाग तर एकदम हाय प्रोफाईल झाला आहे. वेस्टफिल्ड्स हा लंडनचा सर्वात मोठा शॉपिंग मॉल स्ट्रॅटफर्डला गेल्या वर्षीपासून सुरू झाला. आता ऑलिंपिकसाठी बाहेरून येणाऱ्या प्रेक्षकांना ईस्टएंडच्या या कुरूप इतिहासाची कल्पनाही येणार नाही. ऑलिंपिकचे निमित्त साधून शहराचा एक भाग जणू नव्याने वसवणाऱ्या साहेबाच्या या दूरदृष्टीला दाद द्यावी लागेल.