स्पर्धेदरम्यानची सुरक्षा व्यवस्था हा ऑलिंपिककाळात लंडनसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. जागतिक दहशतवादाचा तडाखा २००५ मध्ये लंडनला बसला असल्याने प्रशासनाने सुरक्षेत कोणतीही कसर ठेवलेली नाही. जागोजागी पोलिस तैनात आहेत. या चोख व्यवस्थेमुळे स्पर्धेच्या काळात गुन्हागारीचे प्रमाण कमी असेल, अशी आशा लंडन प्रशासन व्यक्त करीत आहे. कारण या आधीच्या विशेषतः सिडने ऑलिंपिकच्या वेळेला यजमान शहरातील क्राईम रेट एकदम कमी झाला होता. लंडनमध्ये मात्र अद्याप तसा ट्रेंड दिसलेला नाही. उलट पोलिसांचा आव आणून लोकांना लुबाडण्याचा नवा फंडा लंडनच्या भामट्यांनी शोधून काढला आहे.
चार दिवसांपूर्वी लंडन प्रशासन आणि पोलिस खात्याकडून सर्व मोठ्या कंपन्या आणि ऑफिसमध्ये एक विशेष अॅलर्ट जारी करण्यात आले. वृत्तपत्रांमधूनही सावधगिरीची सूचना देण्यात आली. आपण साध्या वेशातील पोलिस असल्याची बतावणी करत प्रेक्षकांना, पर्यटकांना लुबाडण्याच्या काही घटना घडल्याने सावध राहावे, अशी सूचना खुद्द पोलिसांनीच दिली आहे. गेल्या आठवड्यात लंडनच्या भामट्यांनी चोरीची ही वेगळीच शक्कल चालविल्याचे उघड झाले. हे साध्या वेशातील खोटे पोलिस लोकांकडे पैसे मागतात आणि जवळ कॅश नसेल तर एटीएममधन ती काढून द्यायलाही लावतात. सेंट्रल लंडनमध्ये अशी चलाखी करणाऱ्या दोघांना शेवटी अटक झाल्याचे कळले. पण तरीही हे प्रकार थांबलेले नाहीत.
शहरात गर्दी वाढली की, त्याचा फायदा भुरटे चोर, पाकिटमार घेतातच. पण जगभरात नावाजलेल्या स्कॉटलंड यार्ड किंवा बॉबीच्या नावाखालीच अशी लूटमार केली जात आहे, हे विशेष. खरे तर ऑलिंपिकच्या काळात कोणताही धोका उद्भवू नये म्हणून युद्धपातळीवर सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली आहे. ऑलिंपिक पार्कच्या जवळच्या उंच इमारतींवर जमिनीवरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्र सज्ज ठेवण्याची तयारीही होती. त्यावरून इथे थोडा गदारोळ माजला होता. लिटनमधील एका टॉवरमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी याला आक्षेप घेतला. ग्रीनीचजवळच्या नदीपात्रात ब्रिटनमधील सर्वात मोठी युद्धनौका तैनात करण्यात आली आहे. यावरून टेहळणी करणारी हेलिकॉप्टर झेपावत असतात. १० हजारांवर पोलिसांखेरीज आणखी तेवढेच खासगी सुरक्षारक्षक आणि १३,५०० लष्करी जवान ऑलिंपिक स्पर्धेसाठी सज्ज आहेत.
सुदैवाने ऑलिंपिकदरम्यान किरकोळ गुन्ह्यांखेरीज अद्याप तरी मोठा पेच उभा राहिलेला नाही. बहुतेक गुन्ह्यांचे स्वरूप चिथावणीखोर भाषण, रेशियल अब्युज, शिवीगाळ, दारू पिऊन धिंगाणा घालणे असे आहे. प्रेक्षक, स्पर्धक आणि ऑलिंपिक अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणारे गुन्हेगार अधिक. अशा ‘ऑलिंपिक ऑफेन्स’साठी अटक झालेल्या कोणालाही २४ तासांच्या आत न्यायालयात हजर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहेत. स्ट्रॅटफर्डला सुरू केलेल्या फास्ट ट्रॅक कोर्टात या केस चालतात. ऑलिंपिक दरम्यान न्यायव्यवस्थेवर कामाचे दडपण येऊ नये म्हणून आधीच सुट्टीचे विशेष कोर्ट बसवून प्रलंबित प्रकरणे निकालात काढली गेली होती. विशेषतः वर्षभरापूर्वी लंडनमध्ये उसळलेल्या दंगलीच्या केस संपवण्यासाठी त्याचा उपयोग झाला.