गर्दी, ट्रॅफिकमुळे डोकेदुखी, खर्च या सगळ्याचा विचार करून लंडन ऑलिंपिकमध्ये ब्रिटीश माणूस थोडे अंतर राखून सहभागी होत आहे. तर भारतीय माणूस मात्र या सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटतोय. ऑलिंपिक अनुभवणे ही आयुष्यात एकदाच येणारी संधी, हे जाणून या संधीचा पुरेपूर फायदा देशी माणूस घेत आहे. अर्थात मराठी जनताही यात मागे नाही.
एकूणच ब्रिटनमध्ये भारतीय टक्का फारच मोठा आहे. जवळपास १५ लाखांच्या आसपास भारतीय जनता या देशात नांदते. एकट्या लंडनमध्येच साधारण ५ लाखांवर भारतीय आहेत.
ऑलिंपिकच्या आधी इथल्या भारतीय वंशाच्या नागरिकांना काही ठिकाणी ऑलिंपिक ज्योत मिरवण्याचा मानही मिळाला. लेस्टरच्या शोभना त्रिवेदी या त्यापैकी एक. आता ब्रिटनच्या वेगवेगळ्या भागातील भारतीयांना त्यांच्यामुळे ही मशाल जवळून बघायला मिळते आहे. इथले भारतीयही चांगले क्रीडारसिक म्हणायला हवेत. भारत – इंग्लंडचा क्रिकेटचा सामना असो वा टी ट्वेंटी विश्व करंडक, स्टेडियमवर सर्वाधिक गर्दी भारतीयांची होती. आता ऑलिंपिकच्या प्रेक्षकांमध्येही अनेक भारतीय चेहरे दिसत आहेत.
या भारतीय गर्दीतील काही मराठी चेहरे गाठले. ऑलिंपिकचा महासोहळा याची देही याची डोळा बघण्यासाठी लंडनमधील मराठी माणूस उत्सुक आहे. अमेरिकेपाठोपाठ मराठी मंडळींची संख्या याच देशात अधिक आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना इथला मराठी माणूस वर्षभर आधीपासूनच कसा ऑलिंपिकसाठी सज्ज झाला होता, हे उमजले. काहींनी आधीपासूनच तिकीटांसाठी लकी ड्रॉमध्ये नाव नोंदवले होते. काहींनी ऑलिंपिकमध्ये स्वयंसेवक होण्यासाठीही गेल्या वर्षीपासूनच मोर्चेबांधणी केली होती. सचिन लोहोकरे म्हणाले, “लंडनचे नाव होस्ट म्हणून जाहीर झाल्यापासूनच मनात होते, ऑलिंपिक बघायला जायचेच. गेल्या वर्षी सुरुवातीला सुरू झालेल्या तिकीटविक्रीसाठी लगेच नंबर लावला. पहिल्या फेरीत तिकीट मिळण्यात अयशस्वी झालेल्यांसाठी एक्स्क्लुझिव्ह विंडो सुरू केल्याचे कळल्यावर तिथेही अर्ज केला आणि हातात दोन महत्त्वाची तिकिटे पडली.” आता त्यांना रविवारच्या १०० मीटर रेस फायनलची तिकीटे मिळाली आहेत. “उसेन बोल्टला पाहण्याची संधी असल्याने सुपर एक्सायटेड आहे”, असे ते म्हणतात. नितीन रेडकर, मंजिरी कुलकर्णी, आमोद देशमुख, नितीन रेडकर असे आणखी कितीतरी भेटले. हातात ऑलिंपिकची तिकीटे पडल्यामुळे ते प्रचंड उत्साहात होते. भारतीय संघाला चिअर अप करायला सगळे तयार आहेत. भारताला पदकाची आशा असल्याने नेमबाजी आणि कुस्तीच्या स्पर्धेचे तिकीट मिळवले, असे किशोर महिंड सांगतात.
![]() |
ऑलिंपिक मशालीबरोबरब स्लावचे छोटे रहिवासी लव आणि कुश अजय मुरुडकर.
|
केवळ लंडनमधीलच नाही, तर ब्रिटनच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या मराठी मंडळी लांबलांबून ऑलिंपिकसाठी जाताहेत. लंडनच्या नैऋत्येला बर्कशायर परगण्यातील रीडिंगमध्ये राहणाऱ्या उदय भोसले यांनी थेट देशाच्या उत्तरेकडे मँचेस्टरला होणाऱ्या एका फूटबॉल सामन्याचे तिकीट काढले आहे. ब्रिटनमधला मराठी कट्टा सध्या पूर्णपणे ऑलिंपिकमय झाला आहे.

No comments:
Post a Comment