ऑलिंपिक काळात होणारी वाहतुकीची कोंडी, बंद असणारे रस्ते, ट्यूबला होणारी गर्दी यांच्या बातम्या सतत येत आहेत. खासगी वाहनाने सेंट्रल लंडनमधील प्रवास शक्यतो टाळा, असे आवाहन होत आहे, तरी लंडनवारी करणाऱ्या पर्यटकांवर याचा परिणाम फारसा झालेला दिसत नाही. उलट ऑलिंपिकनिमित्त सजलेली लंडन नगरी बघण्यासाठी येथे येणाऱ्या पर्यटकांच्यात वाढच झालेली दिसते. हे ऑलिंपिक टुरिझम ‘कॅश’ करायला अनेक व्यावसायिक सरसावले आहेत.
![]() |
| छायाचित्र सोनाली पटवर्धन भोसले |
वीकएंडला सेंट्रल लंडनमधील काही गजबजलेल्या पर्यटन स्थळांवर चक्कर मारली, तेव्हा लंडन आय, वेस्टमिन्स्टर, ट्रॅफलगार स्क्वेअर ही ठिकाणे नेहमीपेक्षा जास्त गजबजलेली दिसली. एका परदेशी पर्यटकाला विचारले असता तो म्हणाला, ‘ही काही लंडनची पहिली भेट नाही. पण ऑलिंपिक काळात लंडन कसे दिसते हे बघायला मुद्दाम आलो आहे.’ युरोपातील अनेक देशांमध्ये जुलै- ऑगस्ट हा शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा काळ असतो. सुट्ट्यांची संधी साधून अनेक जण लंडनवारी करीत आहेत. ब्रिटनच्या इतर भागातून लंडनला येणाऱ्या स्थानिक पर्यटकांमध्येही वाढ झालेली दिसतेय. ब्रिटनमध्येही शाळांना सुट्टी असल्याने बच्चेकंपनीबरोबर टीम जीबीला प्रोत्साहन देणाऱ्यांची गर्दी रस्त्यांवर दिसत आहे. लंडनच्या रस्त्यांवर विक्री करणाऱ्या छोट्या स्टॉलवाल्यांपासून महागड्या ब्रँडेड दुकानांपर्यंत सगळ्यांना जणू ऑलिंपिक सोव्हेनियर शॉपचे रूप आले आहे. पर्यटकही या दुकानांमध्ये गर्दी करून ऑलिंपिक सॉव्हेनियर खरेदी करताना दिसताहेत.
ऑलिंपिकवर एवढे पैसे उधळले, १५ दिवसांसाठी ९३ कोटी पाउंडचा चक्काचूर होणार, अशी हळहळ व्यक्त होत असली, तरीही ब्रिटनला ऑलिंपिकमुळे व्यावसायिक फायदा होण्याचीही चिन्ह आहेत. जागतिक मंदीच्या लाटेनंतर ब्रिटन अजूनही सावरलेलेच नाही. उलट युरो क्रायसिसमुळे यांची हालत आणखी खालावली आहे. देशाची आर्थिक परिस्थिती वाईट असताना ऑलिंपिकसारखा महासोहळा आयोजित करण्याचे ठरल्याने आणि त्यावर वारेमाप पैसा खर्च केल्याने अनेक ठिकाणहून टीका होत होती. मात्र याच ऑलिंपिकचा बिझनेस अपॉर्च्युनिटी म्हणून वापर करण्याचे ब्रिटीशांनी योजले आहे.
ऑलिंपिकच्या निमित्ताने एक मोठी व्यापारविषयक परिषद सध्या लंडनमध्ये सुरू आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे प्रमुख, युरोपियन सेंट्रल बँकेचे पदाधिकारी तसेच गुगल, याहू सारख्या कंपन्यांचे सर्वेसर्वा अशी बडी मंडळी या परिषदेत उपस्थित आहेत. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी स्वतः या परिषदेत आमच्या देशात गुंतवणूक करा असे आवाहन जगभरातील गुंतवणुकदारांना केले. ऑलिंपिकनिमित्त गुंतवणुकदारांचे घबाड हाती लागावे, अशी आशा ब्रिटनला आहे.

No comments:
Post a Comment