Thursday, August 9, 2012

संभाव्य गर्दीची उलटी गंगा


लंडन ऑलिंपिक दरम्यान होणारी संभाव्य गर्दी या विषयावर ऑलिंपिक सुरू व्हायच्या आधीपासून इथल्या माध्यमांनी भरपूर चर्चा चर्विचरण केले होते. सेंट्रल लंडनमध्ये ट्रॅफिक जॅम होणार, तिथून गाडी बाहेर काढायला जागा राहणार नाही, ट्यूबमध्ये प्रचंड गर्दी होणार असे ठोकताळे बांधण्यात आले होते. लंडनच्या मेयरपासून ते सार्वजनिक वाहतूक सांभाळणाऱ्या ट्रान्सपोर्ट फॉर लंडन (टीएफएल)च्या पदाधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांनी म्हणूनच या काळात ऑलिंपकशी संबंधित नसाल तर येणे टाळा, अशा अर्थाचे आवाहनही केले होते. पण प्रत्यक्षात परिस्थिती फारच वेगळी दिसते आहे. ऑलिंपिक सुरू होऊन आठवडा उलटला तरी असे ओव्हरक्राऊडेड लंडनचे दृष्य अभावानेच दिसले आहे.

ऑलिंपिकच्या संभाव्य गर्दीचे माध्यमांनी फारच अवडंबर केल्याने ही उलटी गंगा (थेम्स म्हणू या हवे तर) वाहत असल्याचे (पुन्हा माध्यमांतूनच) म्हटले जात आहे. सुरवातीला दबक्या आवाजात असलेल्या या बातम्यांचा सूर आता टीपेला पोचला आहे. एखादा अपवाद वगळता लंडनची वाहतूक तशी सुरळीत सुरू आहे अशा पॉझिटिव्ह बातम्या देणारी वृत्तपत्रे आता सेंट्रल लंडनमधला पर्यटकांचा ओघ घटला आणि त्यामुळे दुकानदारांना तोटा होत असल्याच्या बातम्या देऊ लागली आहेत. ऑलिंपिक पार्क असणाऱ्या पूर्व लंडनमध्ये गर्दी आहे पण सेंट्रल लंडनमधल्या दुकानदारांना मात्र अपेक्षित लाभ झालेला नाही.

ऑलिंपिक पार्कजवळच फक्त ट्यूबला गर्दी होती.
कितपत गर्दी आहे हे चाचपण्यासाठी मी ऑफिस वर्किंग डेला अगदी पीक अवर साधून हिथ्रोपासून स्ट्रॅटफर्डपर्यंतचा प्रवास करून बघितला. नंतर वेगवेगळ्या ट्यूब लाईन्सने सेंट्रल लंडन भटकले तरी ती संभाव्य गर्दी लागलीच नाही. अगदी एक अपवाद वगळता सर्व ट्रेन आणि ट्यूबमध्ये बसायला जागा मिळाली. ऑगस्ट महिना खरे तर सुट्टीचा. शाळांना सुट्टी आणि ब्रिटीश समर एंजॉय करण्याचे दिवस. पण तरीही गेल्या ऑगस्टपेक्षा या वेळी गर्दी कमी झाल्याची सेंट्रल लंडनमधील हॉटेल व्यावसायिकांची तक्रार आहे. लंडनचे वेस्टएंड म्हणजे नाट्यरसिकांसाठी पंढरीच. पण वेस्टएंडलाही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी बुकिंग झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. लंडनच्या मेयरच्या आवाहनाचा हा परिणाम असल्याची तक्रार आता करण्यात येत आहे. मेयर बोरिस जॉन्सन यांनी लगेचच खुलासा केला आहे. लंडन शहरात सगळ्यांचे स्वागतच आहे. केवळ लोकांना पूर्वकल्पना देण्यासाठीच तसे म्हटले होते’, असे आता ते सांगत आहेत.

संभाव्य गर्दीची बेगमी म्हणून सेंट्रल लंडनमधील अनेक दुकानांनी जादा माणसे कामावर घेतली होती. टॅक्सी ड्रायव्हरनी आपण अधिक कामात राहू, अशा अंदाजाने ऑलिंपिकची तिकीटे विकत घ्यायचे टाळले होते. या साऱ्यांचीच आता पंचाईत झाली आहे. सेंट्रल लंडनच्या कॅब असोसिएशनने आपली तक्रार थेट पर्यटन मंत्र्यांपर्यंत केल्याचे एका सायंदैनिकात वाचले. ऑलिंपिक संपल्यावर पर्यटकांचा ओघ सेंट्रल लंडनमधील पर्यटन स्थळांकडेच येणार आहे’, असा दिलासा मंत्री देत असले तरी संभाव्य गर्दीच्या उलट्या गंगेने दुकानदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, हे नक्की.



No comments:

Post a Comment