Tuesday, July 31, 2012

क्राऊड मॅनेजमेंटची ऐशी तैशी


सेंट्रल लंडनमध्ये कुठेही गेले तरी सध्या फक्त ऑलिंपिक माहौल आहे. उत्साही पर्यटकांची गर्दी, टीम जीबीचे (ग्रेट ब्रिटन) टीशर्ट घातलेले समर्थक, वेळेवर स्पर्धास्थळी पोचायची चिंता चेहऱ्यावर घेऊन वावरणारे स्वयंसेवक आणि त्या गर्दीत आपापल्या ऑफिसला पोचायची घाई करणारे नोकरदार, असे एकूण चित्र दिसतेय. लंडनच्या ट्यूब  पिक टाईमला (म्हणजे ऑफिस सुरू व्हायच्या आणि सुटण्याच्या वेळेला) कायम भरलेल्या असतात. आपल्या मुंबईच्या लोकलइतकी नाही तरी खचाखच गर्दी या वेळेला हमखास असते. या गर्दीत ऑलिंपिकने भर पडली आहे. त्यातच ब्रिटिश हवा आता चांगली तापली आहे. एरवी हवाहवासा उन्हाळा ट्यूबच्या गर्दीत मात्र घाम काढतोय. त्यामुळे एरवी इंग्लिश सौजन्यासाठी प्रसिद्ध असलेला साहेबही चांगलाच कावला आहे.
पिक टाईममध्ये प्रवास टाळणे शक्य असेल तर टाळा, असे आवाहन सर्वसामान्य जनतेला करण्यात येत आहे. ट्यूब आणि नॅशनल रेलचे तिकीट पिक टाईमपेक्षा ऑफपिकचे कमी असते. शनिवार- रविवार ऑफ-पिक मानला जातो, कारण कार्यालयांना सुट्टी असते. पण आता ऑलिंपिकमुळे वीक-एंडच्या दिवशीसुद्धा ट्यूब भरून धावत आहेत. ऑलिंपिक काळात गर्दीमुळे पर्यटकांची आणि लंडनकरांची गैरसोय होऊ नये यासाठी गेले कित्येक दिवस प्रयत्न सुरू होते. ट्यूब स्टेशनवरील गर्दी विभागण्यासाठी अधिक एक्झिट पॉइंट्स केले. बाहेर पडणाऱ्यांसाठी दिशादर्शक फलक नव्याने लावले. प्रेक्षकांचा गोंधळ होऊ नये म्हणून कुठली स्पर्धा बघायला कुठे उतरा, जवळचे ट्यूब स्टेशन हे सांगणारे फलकही अंडरग्राउंड स्टेशनवर लागले. पण माणसांच्या लोंढ्यांपुढे ही तयारी अपुरीच ठरत आहे.
आग लागल्यावर काय करावे यासाठी जसे मॉकड्रील घ्यायची पद्धत आहेतशी क्राऊड मॅनेजमेंटसाठी गेले काही दिवस वेगवेगळ्यास्टेशन्सवर मॉकड्रील घेणे सुरू होते. ऑलिंपिकमुळे अती गर्दी झाली तर चेंगराचेंगरी टाळण्यासाठी कसे बाहेर पडावे यासाठी ही पूर्वतयारी होती. ट्यूबस्टेशनवर रिहर्सलमुळेच गोंधळ उडाला होता. तो गोंधळ काही ट्यूब स्टेशनवर अजूनही सुरू असल्याचे जाणवले. इव्हिनिंग स्टँडर्ड या लंडन ट्यूबमधील लोकप्रिय सायंदैनिकातील ही आकडेवारी ट्यूबच्या गर्दीत उभ्या उभ्याच वाचली तेव्हा कपाळावर जमलेल्या घर्मबिंदूंचा बांधच फुटला.

ऑलिंपिकनिमित्त लंडनमध्ये प्रवास करणारे प्रेक्षक – ९० लाख
स्पर्धक, पदाधिकारी, स्वयंसेवक आण पत्रकार – ३ लाख
पब्लिक ट्रान्सपोर्टच्या फेऱ्या – १ कोटी ५० लाख
गेम्स लेनची शिस्त न पाळणाऱ्या कारना उचलणारे टोइंग ट्रक – ७२

Monday, July 30, 2012

...सुदिनम् तदेव |


एवढे दिवस सुरू असलेली यजमानघरातील लगबग आता टीपेला पोचली आहे. ऑलिंपिकची लगीनघाई सरून आता मुहूर्ताची घटिका आली आहे. ऐन मुहूर्ताच्या वेळेला जाणवणारी 
हुरहूर, थोडी धाकधूक मनात घेऊन लंडननगरी बोहल्यावर चढली आहे. मुख्य उद्घाटन सोहळ्याचा मुहूर्त संध्याकाळचा असला तरी सकाळपासूनच कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. अगदी शेवटच्या क्षणाच्या सूचना देण्यात लंडन प्रशासन सध्या मग्न आहे.
शुक्रवारची सकाळ लंडनकरांसाठी वेगळी असेल, कारण ठीक ८ वाजून १२ मिनिटांनी नागरिकांसाठी ऑलिंपिक गजर होईल. या मुहूर्तावर फक्त लंडनमधलीच नाही तर देशभरातील घड्याळे आणि घंटा निनादतील. सर्व चर्चमधून, शासकीय इमारतींमधून, टाऊन हॉलमधून आणि घरांघरांतून हा घंटानाद तीन मिनिटे सुरू राहणार आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर पॅलेसचे जगप्रसिद्ध बिग बेन या तीन मिनिटात ४० वेळा निनादेल. बिग बेनचे असे मध्येच निनादणे ब्रिटिश इतिहासात क्वचितच घडलेय. (यापूर्वी सहाव्या जॉर्जच्या अंत्यविधीच्या समयी बिग बेन असे निनादले होते.)
सर्व नागरिकांनी या घंटानादात सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. तशी पत्रके, बॅनर्स रस्त्यांवर, लायब्ररीमध्ये,टाऊन सेंटरला लागले आहेत. कोणतीही बेल अगदी सायकलची घंटी किंवा डोअर बेलसुद्धा वाजवली तरी हरकत नाही, पण तीन मिनिटे हा गजर करून ऑलिंपिकचे सूप वाजवण्याचा घाट घालण्यात आला आहे. ऑलिंपिक कमिटीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर तर यासाठी खास मोबाईल अॅप्लिकेशन दिले आहे. हे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यास केवळ आपला फोन हलवून तीन मिनिटे घंटेसारखी रिंग वाजवता येईल.
शुक्रवारची संध्याकाळ अविस्मरणीय ठरावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. उद्घाटनानंतरचे १६ दिवस सुरळीत पार पडोत,गर्दीमुळे फार त्रास सहन करावा लागू नये यासाठी लंडनवासीयांचीही फिंगर्स क्रॉस्ड आहेत. केवळ उद्घाटनाला तीन कोटी पाऊंडची उधळपट्टी करणार वगैरे नकारात्मक चर्चा सध्या तरी थांबल्या आहेत. उलट उद्घाटनाच्या डॅनी बॉयलच्या कार्यक्रमाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. उद्घाटन सोहळा भव्य असणार पण याची तुलना बीजिंग ऑलिंपिकशी होणार यात शंका नाही.
कार्यक्रमाबाबतची उत्सुकता कायम राहावी म्हणून बॉयलच्या टीमने खास काळजी घेतली आहे. रंगीत तालमींच्या वेळी पत्रकारांना जवळपास फिरकू दिले नाही. तसेच कार्यक्रमात सहभाग असणाऱ्या १२,००० कलाकारांकडून गुप्ततेबाबत बाँड लिहून घेतला होता. एवढेच नाही तर सेव्ह द सर्प्राईज’ नावाने फेसबुक आणि ट्विटरवर कँपेन सुरू करून स्वयंसेवक, स्टेडियमवरचे कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक यांनाही आवाहन करण्यात आले आहे. तरीही कार्यक्रमात डेव्हिड बेकहॅम आणि महंमद अलीचा सहभाग असल्याचे गॉसिप सुरूच आहे. आम्ही भारतीय मात्र रेहमानने बसवलेला पंजाबी ट्रॅक आणि इलिया राजाचे संगीत उद्घाटन सोहळ्यात ऐकायला सज्ज झालो आहोत.

Sunday, July 29, 2012

बिझनेस पार्कला ऑलिंपिक स्ट्रेस


ऑलिंपिकचा महासोहळा सुरू व्हायला आता केवळ काही तास शिल्लक आहेत. गेली चार वर्षे सुरू असलेली तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यानिमित्त शहरात येणाऱ्या लाखो लोकांना सामावून घेण्यासाठी लंडन सज्ज झाले असले तरीही, या काळात वाहतुकीवर पडणारा ताण लक्षात घेता, कामाचे रूटीन ठीक राहील ना? बदललेल्या वाहतूक नियमांचा किती परिणाम जाणवेल?याची चिंता लंडनमधील बिझनेस पार्कमध्ये जाणवत आहे. गेले दोन दिवस कार्यालयांमधून होणाऱ्या मिटींगचा अजेंडा ऑलिंपिक काळात काम सुरळीत राहण्यासाठी काय उपाययोजना करता येईल हाच आहे.
कॅनरी वॉर्फ हा लंडनमधील भाग बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून ओळखला जातो. ऑलिंपिक पार्कपासून काही मैलांवर असल्यामुळे येथील कंपन्यांना ऑलिंपिकचा स्ट्रेस जाणवणार आहे. ऑलिंपिक रूट नेटवर्कमधील रस्त्यांवर ऑलिंपिक लेन सुरू झाली असल्याने उरलेल्या लेन्समध्ये वाहनांच्या रांगा आतापासूनच लागत आहेत. कॅनरी वॉर्फला कामासाठी येणारे कर्मचारी लंडनच्या विविध भागातून प्रवास करून पोचतात. ते वेळेवर पोचले नाहीत, तर काम कसे उरकायचे यांसंदर्भातील चर्चा ऑफिस मीटिंगमधून सूरू आहेत. सेंट्रल लंडनमधून ज्यांना यावे लागते, त्यांच्यासाठी तर हा काळ परीक्षेचा असणार आहे.
कामावर परिणाम होऊ नये, म्हणून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. काही कंपन्यांनी पिक टाईम टाळण्यासाठी कामाच्या वेळेत बदल करण्याचे सुचवले आहे. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार त्यांनी कामावर यावे, असे सांगत वेळेचे बंधन शिथील करण्यात आले आहे. कामावर येणे अगदीच शक्य होणार नाही अशांसाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला आहे.
ट्रान्सपोर्ट फॉर लंडन (टीएफएल) ही शहरातील सार्वजनिक वाहतून सांभाळणारी कंपनी गेले कित्येक महिने ऑलिंपिकसाठी तयारी करते आहे. कितीही प्लॅनिंग केले तरी ऑलिंपिक काळात काही ठिकाणी सेवेत विलंब होणार, वेळापत्रक कोलमडणार याची कल्पनाटीएफएललाही आहे. म्हणूनच ऑलिंपिकच्या काळात बऱ्याच अंडरग्राउंड ट्यूब स्टेशनवर मोफत इंटरनेट वायफाय उपलब्ध असणार आहे. जेणेकरून कर्मचाऱ्यांना तिथूनही काम करता येईल. थोडक्यात काय, तर या अवघड काळातही काम थांबवू नका, सबबी सांगू नका आणि कुठूनही करा पण काम सुरू ठेवा, असे आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे.

ऑलिंपिक स्ट्रेस टेस्ट
डेलॉईट या कंपनीच्या पुढाकाराने मे महिन्यातच कंपन्यांची ऑलिंपिक स्ट्रेस टेस्ट घेण्यात आली. ऑलिंपिक काळात काम सुरळीत चालावे यासाठी कंपनी किती तयार आहे याची चाचपणी करताना कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत हे पाहण्यात आले. यामध्ये २० टक्के कंपन्या ऑलिंपिकच्या स्ट्रेसखाली दबलेल्या दिसल्या.
ऑलिंपिक पार्कच्या पार्श्वभूमीवर दिसणाऱ्या कॅनरी वॉर्फच्या गगनचुंबी इमारती.

Saturday, July 28, 2012

ब्रँडेड ऑलिंपिक


सोमवारपासून वातावरणात छान बदल झाला असून लंडनकर आतुरतेने वाट पहात असणारे सनी डेज आले आहेत. ऑलिंपिकच्या आयोजकांचा जीव त्यामुळे नक्कीच भांड्यात पडला असेल. चांगल्या दिवसांचे स्वागत करायला वीकएंडलाच बाहेर पडून खास समर शॉपिंगसाठी बाजारात झुंबड उडालेली दिसली. सध्या लंडनच्या बाजारपेठाही ऑलिंपिकमय झाल्या आहेत. ब्रँडेड स्टोअर्सपासून रस्त्यावरच्या मार्केटपर्यंत सगळीकडे ऑलिंपिकच्या वस्तू विकायला ठेवलेल्या दिसताहेत. टीशर्ट, मग, पिशव्या, पर्स, सॅक एवढेच नाही तर चपला, घड्याळे, टॉवेल अगदी चादरीसुद्धा ऑलिंपिकच्या रंगात रंगलेल्या दिसत आहेत.
लंडन २०१२ या ऑलिंपिक आयोजकांच्या अधिकृत संकेतस्थळावरूनसुद्धा या ब्रँडेड ऑलिंपिक वस्तूंची विक्री होत आहे. अर्थातच या सर्व वस्तू नेहमीपेक्षा थोड्या जास्त दरानेच विकण्यात येत आहेत. टी-शर्टची कमीत कमी किंमत २० पाउंड तर स्वस्तातल्या टोपीसाठीही १० पाउंड मोजावे लागताहेत. या विक्रीतून जमणारा निधी चॅरिटीसाठी देण्याचा बेत आहे.

छायाचित्रे - सोनाली पटवर्धन भोसले
Add caption
ऑलिंपिक स्पर्धा या मेगा इव्हेंट म्हणून साजऱ्या होतातत्यामुळे त्याबरोबर मार्केटिंग आणि बिझनेस या गोष्टी येणारच. लंडनसारख्या जागतिक शहरात, कॉस्मोपॉलिटन वातावरणात यंदा ऑलिंपिक होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय ब्रँडिंगची जाहिरातबाजी शिगेला पोचली आहे. ऑलिंपिक नियोजन समितीने स्वतःच्या प्रत्येक प्रकाशनामध्ये स्पॉन्सरर्सचे भरभरून आभार मानत जमेल तिथे जाहिरात करू दिली आहे. 




आयोजनासाठी लागलेला कित्येक कोटींचा निधी या जाहिरातींतून, प्रायोजकांकडून आला आहे. कोकाकोला, आदिदास, मॅकडोनल्ड यांसारखे जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेले ब्रँड यंदाच्या ऑलिंपिकचे प्रमुख प्रायोजक आहेत. ऑलिंपिक नियोजन समितीने या प्रायोजकांना खुष ठेवण्यासाठी या ब्रँडखेरीज इतर वस्तू (विशेषतः प्रतिस्पर्धी ब्रँडच्या) ऑलिंपिक व्हेन्यूच्या आसपास विक्रीसाठी ठेवण्यास बंदी घातली आहे.
यासंदर्भात परवा बीबीसीवर दाखवलेली व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्याची मुलाखत खूपच गाजली. प्रेक्षकांपैकी कुणी पेप्सी असे लिहिलेला टी- शर्ट घालून आले तर ऑलिंपिक स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगताच उलट- सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या. नायकीचे शूज घालून जाणाऱ्यांना अडवणार का? प्रायोजकांखेरीज वेगळ्या ब्रँडचे वेफर्स नेले तर पाकिटासह ते आत नेले जाऊ देणार नाही, प्रायोजकांखेरीज इतर ब्रँडची बिअर किंवा सॉफ्ट ड्रिंक्स पिण्यास मनाई वगैरे चर्चा रंगली शेवटी ऑलिंपिक आयोजकांना याविषयी जाहीर खुलासा करावा लागला. जमावाने येणाऱ्या प्रेक्षकांनी दिसून येईल अशा प्रमाणात प्रतिस्पर्धी ब्रँडचा वापर केला तर त्यावर बंदी घालण्यात येईल. सर्वसामान्य प्रेक्षकांच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ दिली जाणार नाही, असे शेवटी उघड करण्यात आले.

Friday, July 27, 2012

खोली देता का खोली?


लंडन हे जगातील एक महागडे शहर म्हणून ओळखले जाते. त्यातच आता ऑलिंपिकमुळे तर महागाईला ऊत आला आहे.वेलकम टू लंडन अशा पाट्या लागल्या असल्या तरी ऑलिंपिकदरम्यान लंडनमध्ये येणाऱ्यांना चांगला मोठा खिसा रिकामा करावा लागणार आहे. आयत्या वेळेचे बेत आखणाऱ्यांना तर विमानभाडे, टॅक्सीभाडे जवळपास दुपटीने द्यावे लागत आहे. मुख्य कसरत आहे राहण्याची सोय. ऑलिंपिक पार्कच्या आसपासची हॉटेल्स कधीच आरक्षित झाली आहेत. लंडनमध्ये सगळीकडेच भाड्याच्या खोलीचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. पूर्व लंडनमध्ये गेस्ट हाऊसमधील एका सामान्य खोलीचा दररोजचा दर कमीत कमी १५० पाउंडपर्यंत पोचला आहे. हॉटेल्ससाठी (तारांकित नव्हे) तर गेल्या वर्षी १०० पाऊंड दिलेल्या खोलीला आता ३०० पाउंड मोजावे लागत आहेत.

ऑलिंपिक दरम्यान खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांखेरीज इतर प्रेक्षक म्हणून येणाऱ्यांची संख्या काही लाखांवर जाण्याची शक्यता आहे. खेळाडूंची व्यवस्था ऑलिंपिक व्यवस्थापनाने केली असली तरी प्रेक्षकांना लंडनमधील हॉटेल, गेस्ट हाऊसमध्येच सोय करावी लागणार आहे. पूर्व लंडनमध्ये खरे तर सर्वसाधारणपणे जागेचा दर कमी असतो. सेंट्रल लंडन सर्वाधिक महागडे असून पश्चिमेकडील उपनगरेही तुलनेने अधिक महाग आहेत. मात्र ऑलिंपिकचा मुख्य सोहळा जिथे होणार ते ऑलिंपिक पार्क स्ट्रॅटफर्ड या पूर्व उपनगरात आहे. तिथल्या जागांचे दर कधी नव्हे इतके वाढले आहेत. विशेषतः कमी कालावधीसाठी घेत असलेल्या खोलीसाठी अधिक पाउंड मोजावे लागत आहेत.
लंडन २०१२ च्या अधिकृत संकेतस्थळावर काही हॉटेल्सबाबत माहिती देण्यात आली आहे. पण त्यातील बहुतेक जागा एव्हाना फुल्ल झाल्या आहेत. ही सर्व हॉ़टेल्स आधीच आरक्षित झाली आणि आता घरगुती पद्धतीने चालवली जाणारी गेस्ट हाऊसही मिळेनाशी झाली आहेत. या काळात लंडनमध्ये ऑलिंपिकखेरीज इतर कामानिमित्त येणाऱ्या नोकरदारांना आणि व्यावसायिकांना त्यामुळे भुर्दंड सोसावा लागतोय. लंडनमध्ये उपलब्ध असणाऱ्या खोल्यांसाठी किमान ३०० टक्के भाडेवाढ झाली आहे.

वाहत्या थेम्समध्ये हात धुवून घ्या
ऑलिंपिकच्या निमित्ताने अनेकांनी आपल्या घरातील स्पेअर बेडरूम भाड्याने देऊन वाहत्या थेम्समध्ये हात धुवून घेण्याचा प्रकार चालवला आहे. स्पेअर रूम, गमट्री या ब्रिटनमधील लोकप्रिय वेबसाईट्वर अशा छोट्या जाहिराती झळकत आहेत. स्ट्रॅटफ्रर्ड,ईस्टहॅम, वेस्टहॅम या पूर्व लंडनच्या झोन ३ मधील उपनगरांत जागांना मागणी आहे. तिथल्या घरमालकांनी अशी खोली तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे ईस्टहॅमध्ये बहुतांश वस्ती आशियायी नागरिकांची आहे. भारतीय वंशाचे नागरिक येथे मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले आहेत.

Thursday, July 26, 2012

लहरी हवा आणि चिंतेचे ढग


जुलै महिना अर्धा सरला तरी अजून संपूर्ण ब्रिटनमध्ये ढगाळ वातावरण आहे. सूर्यदर्शन नियमित होत नसल्यामुळे आता ऑलिंपिक आयोजकांच्या मनातही चिंतेचे ढग जमा होत आहेत. या वेळी इथला हिवाळा लांबला आणि एप्रिलपासून सारखा पाऊसच पडतोय. हा आत्तापर्यंतचा वेटेस्ट ब्रिटीश समर असल्याचेही बोलले जात आहे. ऑलिंपिकच्या आनंदावर पावसाचे विरजण नको म्हणून एकीकडे धावा सुरू आहे तर वाईट हवामानातही शक्यतो खेळ थांबवावा लागू नये म्हणून मैदानात जय्यत तयारीही सुरू आहे.
इंग्लिश हवामान ही एक गोष्ट सोडता साहेबांना इतर सगळ्या इंग्लिश गोष्टींचा अभिमान आहे. बहुतांश ढगाळ, थंड आणि अत्यंत लहरी हवामान हे इथले वैशिष्ट्य. त्यातच देश सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला असल्याने थंड वारेही वहात असतात. घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज वाचून मगच प्लॅन ठरवावे लागतात. त्यातल्या त्यात उन्हाळ्याचे तीन महिने ब्रिटिशांना बरे वाटतात. पण त्यातल्याही जवळपास दोन महिन्यांची पावसाने वाट लावली आहे. पण महिना अखेरीला हवामान सुधारेल, असा अंदाज ब्रिटीश हवामान खात्याने नुकताच वर्तवला आहे. किमान उद्घाटन समारंभ तरी निर्विघ्न पार पडण्याची शक्यता आहे.

इथल्या हवामानाची अनिश्चितता लक्षात घेऊन आयोजकांनी मात्र सर्व तयारी चोख ठेवली आहे. ब्रिटीश हवामान खात्याने पाच जणांचा खास चमू फक्त ऑलिंपिकसाठी दिला आहे. हवामानाच्या अंदाजातील ताजे बदल ही टीम सतत आयोजकांना देत असते. खुल्या मैदानातील खेळांवर पावसाचा परिणाम होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे. ग्रीनीच रॉयल पार्क हा सखल भाग आहे. या पार्कमध्ये होणाऱ्या अश्वारोहणासंबंधित स्पर्धेसाठी मैदानात पाणी साठू नये म्हणून अत्याधुनिक तंत्र वापरले आहे त्यामुळे पाण्याचा निचरा लवकर व्हायला मदत होईल.
ऑलिंपिकच्या आधी दोन महिने विविध ठिकाणी टेस्ट इव्हेंट घेण्यात आले. मे मध्ये झालेल्या या बहुतेक स्पर्धा पावसात धुवून निघाल्या होत्या. पावसामुळे हवाही थंड होती. पावसात आणि थंड वाऱ्यामध्ये काकडून हात- पाय बधीर झाले होते. आता मुख्य स्पर्धेची तिकीटे मिळाली तरी आऊटडोअर गेम्सना जाणार नाही’, असे हॉकीच्या एका टेस्ट इव्हेंटला गेलेल्या एकाने सांगितले.

दुकानदारांना फायदा
ऑलिंपिकदरम्यान पाऊस झाला तर प्रेक्षक मॉलचीच वाट धरतील, या आशेने दुकानदारांनी जादा नोकरांना कामावर ठेवले आहे. ऑलिंपिक पार्कबाहेरही छत्र्या – रेनकोट विकत घ्यायची सोय असणार आहे. ऑलिंपिकच्या आयोजकांनी स्वयंसेवकांसाठी सव्वा दोन लाख पोंचू (रेनगिअर) दिल्याची बातमी नुकतीच वाचली.

Tuesday, July 24, 2012

ऑलिंपिकमय वीकएंड

सदासर्वदा थंड हवा आणि पाऊस असल्यामुळे ब्रिटीश मंडळी निरभ्र आकाश आणि उबदार उन्हाळी दिवसांची वाट बघत असतात. लंडनमध्ये जुलै- ऑगस्टमध्ये दिसणारे सर्वसाधारण दृष्य - वॉर्म समर वीकएंड असला की, कुटुंबासहित बाहेर जायचे आणि नदीकिनारी किंवा पार्कमध्ये उन्हात बसून थंडगार बिअरचा आस्वाद घेत हिरवळीवर पडून रहायचे किंवा पार्कमध्ये बार्बेक्यूचा घाट घालायचा. पण या वेळचा ब्रिटीश समर ऑलिंपिकमुळे वेगळा आहे. त्यानिमित्त लंडन फेस्टिवलची मेजवानी मिळणार आहे. कलाप्रेमी लंडनकरांना आता वीकएंडला थेम्सकाठच्या पार्कमध्ये जाऊन लाईव्ह म्युझिक एंजॉय करायचे छान निमित्त मिळाले आहे.
एलिझाबेथ स्ट्रेब यांच्या टीमने सादर केलेला थरारक नृत्याविष्कार
कल्चरल ऑलिंपियाड अंतर्गत शहरभर सध्या लंडन फेस्टिवल साजरा होतोय. जूनमध्ये सुरू झालेल्या या १२ आठवड्यांच्या फेस्टिवलमध्ये जगभरातील कलाकार एकत्र येऊन संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट, चित्र, शिल्प, फॅशन, खाद्य अशा अनेक कलांचे प्रदर्शन करीत आहेत. ऑलिंपिक सुरू होण्यापूर्वीचा हा शेवटचा वीकएंड स्पेशल आहे तो रिव्हर ऑफ म्युझिक या कार्यक्रमामुळे. एकेका खंडांचे प्रतिनिधीत्त्व करणारी युरोप स्टेज, अमेरिकाज स्टेज, आफ्रिका स्टेज, ओशनिया स्टेज आणि एशिया स्टेज अशी व्यासपीठे थेम्सकाठी उभी केली आहेत. सॉमरसेट हाऊस, टॉवर ऑफ लंडन, ट्रॅफलगार स्क्वेअर, ग्रीनीच रॉयल नेव्हल कॉलेज,लंडन प्लेजर गार्डन, बॅटरसी पार्क या सहा वेगवेगळ्या ठिकाणी शनिवार - रविवारी संगीताचा जल्लोष सुरू आहे. युरोप स्टेजवर होणारा सेक्साफोन मॅसिव्ह हा कार्यक्रम गाजण्याची चिन्हे आहेत. एकाच वेळी २०० हून अधिक सेक्साफोनचा आवाज लंडनमध्ये निनादणार आहे. यामध्ये शालेय मुलांचा सहभाग हेच आकर्षण आहे.

थेम्सकाठी घुमतोय झाकीरचा तबला
रिव्हर ऑफ म्युझिक अंतर्गत बॅटरसी पार्कमध्ये एशिया स्टेज उभारले आहे आणि या स्टेजचे प्रमुख आकर्षण आहे तालवाद्याचे उस्ताद झाकीर हुसेन. पल्स ऑफ द वर्ल्ड या नावाने होणाऱ्या कार्यक्रमात झाकीरने भारतीय आणि स्कॉटिश संगीताचा मिलाप साधला आहे. व्हायोलिनवादक गणेश राजगोपालन आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांच्यासह स्कॉटिश फिडल वादक, गिटार वादक, बॅगपायपर आणि उझबेकी ड्रमर यांचाही समावेश आहे.  

याशिवाय गेला महिनाभर लंडन फेस्टिवल अंतर्गत विविध कार्यक्रम सुरू आहेत. बस टॉप आर्टचा एक इव्हेंट घेतला गेला. लंडन बस स्टॉपच्या छतावर सामान्यांमधल्या कलाकारांनीच डिजीटल कॅनव्हास चितारले आहेत. गेला रविवार अमेरिकन कलाकारांनी नृत्यमय केला. वेस्टमिन्स्टर, लंडन आय, मिलॅनियम ब्रिज अशा लंडनमधील प्रसिद्ध स्थळांवर एलिझाबेथ स्ट्रेब यांचा थरारक नृत्याविष्कार झाला. स्ट्रेब या प्रसिद्ध अमेरिकन कोरिओग्राफरसह ३२ कलाकारांनी हा शो केला. बंजी जंपिंग आणि चित्तथरारक अॅथलेटिक्सच्या माध्यमातून संगीताच्या तालावर थिरकणारी पावले पाहण्यासाठी लंडनवासीयांबरोबरच पर्यटकांनीही गर्दी केली होती. आताचा रविवार संगीतमय आहे.
--

ता.क.
फिडल आणि बॅगपाईपशी संवाद करणारी बासरी आणि तबला....अजूनही कानात रुंजी घालतोय. झाकीर हुसेन ..वाह उस्ताद वाह .. रविवार की शाम आप के नाम.... क्या बात है... लाजवाब कार्यक्रम. थेम्सकाठच्या बॅटरसी पार्कमध्ये हिरवळीवर ऊन खात बसून हा कार्यक्रम ऐकणे... शब्दातीत अनुभव.

Monday, July 23, 2012

विम्बल्डनची डेडलाईन


ऑलिंपिकमध्ये होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांसाठी मैदानकोर्टट्रॅक तयार करण्याचे काम गेले वर्षभर सुरू आहे. अपवाद फक्त टेनिस स्पर्धेचा. टेनिसची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विम्बल्डनवर यंदा ऑलिंपिकचे सामने रंगणार आहेत. पण जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत - साहेबाच्या जिव्हाळ्याची विम्बल्डन संपेपर्यंत तिथे ऑलिंपिकची काहीच हालचाल दिसली नाही. आता केवळ २० दिवसात कोर्टचा,  स्टेडियमचा चेहरामोहरा बदलण्याचे आव्हान विम्बल्डनपुढे आहे.
ऑलिंपिक स्पर्धा ब्रिटनमध्ये विविध ठिकाणी होणार आहेत. मुख्य स्टेडियम लंडनमधील स्ट्रॅटफर्डला असले तरीही ग्रीनीच अरेना,वेम्बली अरेनाहॉर्सगार्ड्स परेड अशा अनेक ठिकाणी स्पर्धा होत आहेत. प्रत्येक ठिकाणी ऑलिंपिकची तयारी जोरदार सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी वेम्बलीला गेले तेव्हाच वातावरण ऑलिंपिकमय वाटले. ग्रीनीचला तर चार महिन्यांपासून ऑलिंपिकचे झेंडे लागले आहेत. नुकतीच विम्बल्डनलाही हजेरी लावली तिथे मात्र ऑलिंपिक तयारीचा मागमूसही नव्हता. ऑल इंग्लंड क्लबची ही प्रतिष्ठेची ग्रँडस्लॅम स्पर्धा विंबल्डनला नेहमीच्या इंग्लिश इतमामात पार पडल्यावर मगच आता ऑलिंपिकची गडबड सुरू झाली आहे.
वर्षातून एकदा होणाऱ्या विम्बल्डनसाठी ऑल इंग्लंड क्लबचे कर्मचारी वर्षभर राबत असतात. या वेळी ऑलिंपिकचा टेनिस इव्हेंट२८ जुलैपासून याच कोर्टवर होणार आहे. तेव्हा हे विम्बल्डनचे नसून ऑलिंपिकचे कोर्ट वाटले पाहिजेयासाठी तयारी सुरू आहे. मुख्य आव्हान आहे ते तीन आठवड्यात रेखीव हिरवळ उगवण्याचे.
वरकरणी दिसत नसली तरीहे आव्हान पेलण्याची तयारी गेली दोन वर्ष सुरू आहे. विम्बल्डनच्या पहिल्या दिवशी दिसते तशी हिरवळ ऑलिंपिकसाठी तीन आठवड्यात उगवली पाहिजे यासाठी दोन वर्ष प्रयोग सुरू होते. प्री-जर्मिनेशन पद्धतीने ही जादू साधणार आहे. गवताच्या बियांना एका भांड्यामध्ये मोड आणून मग त्या बिया मातीत पेरल्या जातात. चार दिवस मैदान आच्छादून ठेवले जाते आणि आच्छादन काढल्यावर १० मिमी उंचीची हवी तशी हिरवळ उगवलेली असते. स्पर्धेच्या दोन दिवस आधी मग पुन्हा ती मोजून बरोबर ८ मिमी उंचीचे गवत ठेवले जाईल.

विम्बल्डन रंगणार
विम्बल्डन प्रसिद्ध आहे,  ती तिथल्या परंपरेमुळे. तीच जुन्या इंग्रती शिष्टाचारात, शिस्तीत ती आजही  होत असते. खेळाडूंना हवे तसे रंगीत फॅशनेबल कपडे वापरण्यास इथे बंदी असते. फक्त पांढऱ्या कपड्यांचा आग्रह धरला जातो. यंदाच्या स्पर्धेतसुद्धा व्हिक्टोरिया अझारेंका रंगीत टी-शर्ट घालून कोर्टवर उतरली तेव्हा तिला कपडे बदलून यायला सांगितले होते. आता याच विम्बल्डनच्या हिरवळीवर आपल्या पसंतीचे रंगीत कपडे घालून खेळता येणार आहे. कारण ऑलिंपिकसाठी हे पांढऱ्या रंगाचे बंधन नाही. कोण खेळाडू कुठलेकुणी डिझाईन केलेले टी शर्ट घालून येणार याची चर्चा आतापासूनच रंगली आहे. बहुतेक खेळाडू त्यांच्या राष्ट्रध्वजाच्या रंगांना प्राधान्य देतीलअसा अंदाज व्यक्त होत आहे.

Sunday, July 22, 2012

ज्योत से ज्योत जगाते चलो


ऑलिंपिक सोहळा केवळ लंडनमधील स्टेडियमपुरता मर्यादित न राहता ब्रिटनमधील सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोचतोय ते सध्या सुरू असणाऱ्या टॉर्च रीलेमधून. गावा- गावांमधून या ऑलिंपिक ज्योतीचे स्वागत होत आहे. स्थानिक लोकांनीच सुचवलेल्या सर्वसामान्यांच्या हीरोच्या हाती ही मशाल फिरते आहे. ऑलिंपिक ज्योत ज्या गावात येणार तेथील स्थानिक कौन्सिल स्वागताची जंगी तयारी करते आणि आधी ठरवून दिलेल्या मार्गाने आणि ठराविक वेळेला ज्योत मिरवत आणली जाते. ऑलिंपिकची ही ज्योत बघण्यासाठी ब्रिटीश नागरिक उत्साहाने मुला-बाळांसह रस्त्यांवर उतरलेले दिसत आहेत. हातात युनियन जॅक घेतलेली लहान मुले, तरुण मंडळी आतापासूनच आपल्या देशाच्या टीमला जोरदार पाठिंबा देत आहेत. नॉर्दन आयर्लंड, स्कॉटलंड, वेल्स, ब्रिटिश आईल आणि इंग्लंडचा प्रवास करत ज्योत आता शेवटच्या टप्प्यात आहे.
ग्रीसमध्ये पारंपरिक पद्धतीने ज्योत पेटवून यजमान देशात पोचवली जाते आणि मग यजमान देशांतील गावांगावांतून ज्योतीचा प्रवास सुरू होतो. लंडन २०१२ ऑलिंपिक ज्योतीचे देशभ्रमण १९ मे पासून सुरू आहे. ब्रिटनमधील ९५ टक्के जनतेपर्यंत पोचता येईल असा हा प्रवासमार्ग आखण्यात आला आहे. जवळपास १००० गावांमधून फिरून येत्या शुक्रवारी ही ज्योत लंडनमध्ये पोचेल आणि पुढच्या पाच दिवसात लंडनभर फिरेल. ऑलिंपिकची मशाल देशभरातील ८००० लोकांच्या हातून प्रवास करत आहे. शेवटी टॉवर ऑफ लंडनध्ये हेलिकॉप्टरने ती आणण्यात येईल आणि या रक्तरंजित इतिहास असणाऱ्या भुईकोटात एक दिवस कुलूपबंद राहील.


रीडिंग शहरातील टॉर्च रिले (छायाचित्र – सोनाली पटवर्धन भोसले)
 बीजिंग ऑलिंपिकच्या आधी चीनमध्ये झालेल्या टॉर्च रिलेमध्ये गावेच्या गावे लोटली होती. पण आपल्या रुटीनमध्ये बदल करून, थोडी वाट वाकडी करून अशा प्रसंगी सामूहिकपणे रस्त्यावर उतरून सामील होण्यास ब्रिटीश नागरिक फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे या टॉर्च रिलेला कितपत प्रतिसाद मिळेल याची आयोजकांना चिंता होती. मात्र इंग्लिश जनता टॉर्च रिलेमध्ये उत्साहात सहभाग होत आहे. गेल्या पंधरवड्यात ब्रिटनच्या काही भागात प्रचंड पाऊस झाला. पूरस्थिती निर्माण झाली होती. तरीही स्कॉटलंड आणि साऊथ इंग्लंडच्या नागरिकांनी वाऱ्या-पावसातही रिले ला चांगला प्रतिसाद दिला. एके ठिकाणी तर वीजांमुळे मिरवणूक थांबवायला लागली. अशाही परिस्थितीत उडणाऱ्या छत्र्या सांभाळत साहेब स्वागताला उभे होते.


ऑलिंपिकज्योतीची बिकट वाट
ब्रिटीशांकडून स्वागत होत असले तरी ऑलिंपिक ज्योतीला काही ठिकाणी स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. टॉर्च रिलेच्या सुरुवातीच्या दिवसातच नॉर्दन आयर्लंडमधील सीमावर्ती भागांत आयरिश नागरिकांनी उग्र निदर्शने करून मिरवणूक थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ही रिपब्लिकन असंतुष्टांची निदर्शने असल्याचे सांगत लगेच निदर्शकांना अटकही केली. रिलेच्या ५३ व्या दिवशी तर एका नग्नावस्थेतील निदर्शकाने उपस्थितांना चक्रावून टाकले. फ्री तिबेट असे त्याने पाठीवर चितारले होते. त्याला ब्लँकेटने गुंडाळताना आयोजकांची आणि पोलिसांची तारांबळ उडाली.

Saturday, July 21, 2012

ऑलिंपिक रुट नेटवर्क


ऑलिंपिक दरम्यानची वाहतूक हा लंडनसाठी कळीचा मुद्दा आहे. ऑलिंपिक यजमानपदाच्या स्पर्धेत उत्तम सार्वजनिक वाहतुकीच्या मुद्यावर लंडनने बाजी मारली होती. या अवाढव्य शहरात ऑलिंपिकच्या स्पर्धांची ठिकाणेही विखुरली आहेत. या प्रत्येक स्थळापर्यंत जायला सोयीचा पर्याय देण्यासाठी ऑलिंपिक रुट नेटवर्क तयार करण्यात आले आहे. यामध्ये रस्ता, रेल्वे आणि थेम्समधून होणारी जलवाहतूक या सर्वांचा वापर केला आहे. वॉक वे आणि सायकल रूटही त्यात आहेत. लोकांना ऑलिंपिक रूटची माहिती देण्यासाठी टीव्ही, वृत्तपत्र, रेडिओ, इंटरनेट, होर्डिंग, माहितीपत्रके, बुकलेट, नकाशे अशा अनेक माध्यमांचा वापर होत आहे. ऑलिंपक दरम्यान वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यासाठी ट्रान्स्पोर्ट फॉर लंडनच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत.
लंडनची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इतकी चोख असते की नवख्या माणसालादेखील लंडनमध्ये फिरताना कसलीही अडचण जाणवत नाही. अंडरग्राउंड रेल्वेचे जाळे (याला इथे ट्यूब म्हणतात), ओव्हरग्राउंड ट्रेन, बस याची माहिती असणारा नकाशा खिशात असेल तर लंडन सहज फिरता येते. (कोणत्याही ट्यूब स्टेशनवर हा रंगीत नकाशा फुकट मिळतो.) आता तर बाहेरून येणाऱ्या हजारो प्रेक्षकांच्या सोयीसाठी कोणत्या ऑलिंपिक व्हेन्यूसाठी कुठल्या स्टेशनला उतरा हे सांगणारा स्वतंत्र ट्यूब मॅप तयार करण्यात आला आहे. ऑलिंपिक तिकिटाबरोबर लंडन ट्रॅव्हल कार्ड देण्यात येते आहे. याचा वापर करून थेट स्पर्धेच्या ठिकाणी जायची सोय होऊ शकते. त्यासाठी वेगळे ट्रेन तिकीट काढावे लागणार नाही. हॉर्स गार्ड्स परेड, ग्रीनीच अरेना यासारखे काही ऑलिंपिक व्हेन्यू अगदी नदीकिनारी आहेत. तेथे थेम्समधून पोचण्यासाठी बोट सुरू असतील.
एवढी सगळी सोय करूनसुद्धा लंडनच्या ट्यूबला ऑलिंपिकची अतिरिक्त गर्दी सोसणार नाही, असाच सर्वसामान्य इंग्लिश सूर आहे. शक्य असेल तर ऑलिंपिकदरम्यान ट्यूबने प्रवास टाळा, असे आवाहन लंडनच्या महापौरांनीच लंडनवासीयांना केले आहे. गर्दीची स्टेशन कोणती, ती टाळण्यासाठी पर्यायी मार्ग कोणता, कोणत्या स्टेशनवरची वाहतून तात्पुरती मंदावली आहे याचे लाईव्ह अपडेट्स देण्यासाठी ट्रान्सपोर्ट फॉर लंडन (टीएफएल)च्या वेबसाईटवर खास सेवा सुरू करण्यात आली आहे. टीएफएलने इंटरॅक्टिव्ह मॅपच्या साहाय्याने ही माहिती देण्याची तयारी केली आहे. शिवाय ऑलिंपिक हॉटस्पॉट म्हणजे गर्दीची ठिकाणे आधीच जाहीर करण्यात आली आहेत. या स्टेशनवर ऑलिंपिक व्यतिरिक्त इतर कारणांनी यायचे असल्यास पर्यायी स्टेशनचा मार्ग सुचवला जात आहे.
पूर्व लंडनमध्ये ऑलिंपिक व्हिलेजजवळ राहणाऱ्यांची काळजीही प्रशासनाला आहे. त्यांच्यासाठी खास सूचना, गैरसोय टाळण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. या संपूर्ण भागात रस्त्यावर पार्किंगला बंदी घातल्याने थोडी-फार अडचण होणे सहाजिकच आहे. त्यामुळे सेंट्रल लंडन, पूर्व लंडन भागात कामाला जाणाऱ्या स्थानिकांच्या कुरबुरी हळूहळू प्रसारमाध्यमांमधून येऊ लागल्या आहेत.

पाऊले चालती वीजेसाठी
ऑलिंपिक पार्कला जाण्यासाठी तीन ट्यूब स्टेशन सोयीची आहेत, त्यापैकी एक वेस्टहॅम स्टेशनवरून थेट ऑलिंपिक पार्कला जायलातात्पुरता पादचारी पूल केला आहे. पादचाऱ्यांच्या चालण्यातून वीज निर्माण करणाऱ्या अभिनव अशा  १२ एनर्जी हारवेस्टिंग टाईल्स पुलावर बसवल्या आहेत. ऑलिंपिकच्या काळात यावरून साधारण १ कोटी २० लाख लोकांची ये-जा होईल. त्यांच्या पावलांच्या हालचालींतून वीजनिर्मिती करण्याचे तंत्र येथे वापरले आहे. यातून १० हजार मोबाईल फोन एक तासात चार्ज होतील एवढी वीज निर्माण होऊ शकते. वेस्टहॅम वॉकवे प्रकाशित करण्यासाठी या वीजेचा वापर ऑलिंपिक दरम्यान करण्यात येईल. 

Friday, July 20, 2012

ऑलिंपिक लेनची इंग्लिश शिस्त


जगभरातील खेळाडूंना सामावून घेणाऱ्या ऑलिंपिक व्हिलेजचे लंडनमध्ये सोमवारी उद्घाटन झाले. ऑलिंपिकनिमित्त शहरात येणाऱ्या हजारो प्रेक्षक आणि शेकडो खेळाडूंना कोणत्याही त्रासाशिवाय ऑलिंपिक व्हिलेजपर्यंत जाता यावे आणि शहराची घडीही या संभाव्य गर्दीमुळे विस्कटू नये यासाठी लंडन विशेष तयारी करत आहे. या तयारीचा महत्त्वाचा भाग म्हणजे ऑलिंपिक स्पेशल लेन. केवळ खेळाडू, कोच आणि संबंधितांची ने- आण करणाऱ्या वाहनांसाठी ही लेन राखीव आहे.
ऑलिंपिकची पाच वर्तुळे रंगवलेल्या लेन गेले काही दिवस नुसत्याच दिसत असल्या तरी या लेनची शिस्त सोमवारपासून सुरू झाली. सुरवातीला एम ४ या मुख्य मोटर वेच्या ठराविक भागातील लेन राखून ठेवली आहे. हिथ्रो विमानतळ ते ऑलिंपिक व्हिलेज दरम्यानच्या रस्त्यावर फिरताना आज त्यामुळे थोडा गोंधळच जाणवत होता. लंडनकडे जाणाऱ्या तीनपैकी एक लेन राखीव झाल्यामुळे मोटारींच्या रांगा लागल्या होत्या. ऑलिंपिकच्या आधी दोन दिवसापर्यंत ३० मैलांच्या सर्व गेमलेन्स सुरू होतील.
ऑलिंपिक व्हिलेज स्ट्रॅटफर्ड या लंडनच्या पूर्व भागात आहे आणि लंडनचे प्रमुख विमानतळ - हिथ्रो –पश्चिम भागात. त्यामुळे खेळाडूंना, प्रेक्षकांना संपूर्ण लंडन दर्शन घडवतच ऑलिंपिक व्हिलेज गाठावे लागणार आहे. प्रचंड रहदारीचा सेंट्रल लंडनच्या भाग ओलांडताना कमीत कमी वेळ कसा लागेल, यासाठी ऑलिंपिक कमिटीने प्रचंड काथ्याकूट केला आणि त्यातून ही स्पेशल लेनची संकल्पना आली. सोमवारपासून आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे लंडनमध्ये आगमन सुरू झाले आहे. हिथ्रो विमानतळाजवळ टर्मिनल ४ ला उत्साही स्वयंसेवक दाखल झालेले दिसले. (भारतातून येणारी सर्व विमाने याच टर्मिनलला येतात) सुरक्षायंत्रणा वाढलेली जाणवली. प्रसारमाध्यमांच्या गाड्यांची गर्दीही तेथे वाढते आहे. बीबीसीच्या बातमीदाराने तर आपल्या ब्लॉगमधून खास टिप्स देताना एक फुकटचा सल्ला पर्यटकांना दिलाय.  ‘तुम्ही जर गेम्सशी संबंधित नसाल आणि पुढच्या काही दिवसात हिथ्रो विमानतळावर येणार असाल तर चुकूनही ट्रॅकसूट घालून येऊ नका. विमानतळावरच तुम्हाला पकडून, हाऊ डू यू फील इन लंडन वगैरे प्रश्न विचारण्यात येतील.  
जाता जाता...
हिथ्रोवरून येणाऱ्यांच्या स्वागताची जशी जोरदार तयारी सुरू आहे, तशीच किंग्ज क्रॉस रेल्वे स्थानकावर सुद्धा सुरू आहे. किंग्ज क्रॉसवरून युरोस्टार ही प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय सेवा सुरू असते. इंग्लिश खाडीच्या पाण्याखालून भुयारी मार्गाने जाणारी ही ट्रेन युरोपातील काही महत्त्वाच्या शहरांना जोडते. मुख्यतः फ्रेंच पर्यटक यातून प्रवास करतात कारण लंडन- पॅरिस अंतर ही ट्रेन फक्त अडीच तासात कापते. या दोन शेजाऱ्यांमधील सख्य जगजाहीर आहे. फ्रेंच आणि ब्रिटीश एकमेकांबद्दल बोलताना कशा खोचक आणि तिरकस (पुणेरी जोडे माहित असणाऱ्यांना हे चटकन समजेल) टपल्या हाणतात, हे ऐकण्यासारखे असते. तर हे शेजारी देश २०१२ चे ऑलिंपिक होस्ट बनण्यासाठी सारखेच उत्सुक होते आणि अगदी शेवटच्या फेरीतील बिडिंगमध्ये पॅरिसला थोडक्या मतांनी लंडनविरोधात हरावे लागले होते. याची आठवण करून देत किंग्ज क्रॉस ट्रेन स्टेशनवर प्रचंड मोठ्या आकाराच्या ऑलिंपिक रिंग लावण्यात आल्या आहेत, त्या युरोस्टारने येणाऱ्या फ्रेंचांना खिजवण्यासाठीच लावण्यात आल्या नाहीत ना, याची खुमासदार चर्चा लंडनमधील प्रसिद्ध वृत्तपत्राच्या ब्लॉगवरून झडत आहे. 

Wednesday, July 18, 2012

मुहूर्त साधण्याची गडबड

ऑलिंपिक ज्या शहरात असते त्या शहराने केलेल्या उद्घाटन सोहळ्याची भव्यता,
वैशिष्ट्यपूर्ण सजावट पुढे चार वर्ष जगभर चर्चेचा विषय असतो. या वेळी
लंडनने देखील ऑलिंपिकवर स्वतःची छाप उमटवण्यासाठी काही वेगळ्या कल्पना
आणल्या आहेत. शहरातल्या ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळांवर ऑलिंपिक रिंग
लावणे ही त्यापैकी एक. भव्यदिव्य ऑलिंपिक रिंग नियॉनच्या प्रकाशात रात्री
न्हाऊन निघतात तेव्हा ती जागा वेगळीच भासते. किंग्ज क्रॉस रेल्वे स्टेशन,
टॉवर ब्रिज, हीथ्रो विमानतळ अशा लंडनच्या आयकॉनिक जागांवर या रिंग
लागल्या आहेत.
ऑलिंपिकच्या बरोबर एक महिना आधी या रिंग बसवल्या गेल्या पाहिजेत, असा
प्लॅन होता. हा मुहूर्त साधण्यासाठी आयोजकांची आणि लंडन प्रशासनाची धावपळ
सुरू होती आणि त्यासंदर्भातल्या रंजक बातम्या तीन महिन्यांपासून
वृत्तपत्रांतून येत होत्या. ऑलिंपिकच्या पार्श्वभूमीवर तोच मुहूर्त साधून
इतरही काही मोठे प्रकल्प मार्गी लागत आहेत. ‘ऑलिंपक फीवर’ देशभर पसरला
आहे आणि पुढची अनेक वर्षे याचा परिणाम दिसेल हे या प्रकल्पांमुळे लक्षात
येते. पुन्हा एकदा यावरून दिल्लीतल्या १९८२ च्या एशियाडची आठवण येते. या
एशियाडचा अप्पू अजूनही अप्पूघरच्या नावाने स्मरणात आहे आणि आजही
महाराष्ट्रभरात ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ ‘एशियाड’ धावते आहे.
लंडन टॉवरब्रिजच्या मागे आता असेच एक नवीन आकर्षण उदयाला आले आहे. ‘द
शार्ड’ नावाच्या स्कायलाईन व्यापून टाकणाऱ्या उंच इमारतीचे उद्घघाटन
ऑलिम्पिकच्या निमित्ताने करण्यात आले. या प्रकल्पाचे काम गेली काही वर्षे
सुरू आहे. पण जुलै महिन्यातच आणि तेही ऑलिंपिकच्या उद्घाटन सोहळ्याआधी या
इमारतीचा उद्घाटन सोहळा उरकण्याचे आव्हान प्रकल्पातील टीमपुढे ठेवले
होते. ठरल्याप्रमाणे जुलैच्या पहिल्या आठवड्यात शार्डचे उद्घाटन झाले. ही
आता युरोपातील सर्वात उंच इमारत आहे आणि न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट
बिल्डिंगसारखी ब्रिटिशांच्या लेखी ‘द शार्ड’ ही लंडनची शान ठरते आहे.
गंमत म्हणजे, लंडनच्या दृष्य वैभवात भर घालणारी ही इमारत उभी राहिली
आहे... मिडलइस्टमधील कतार बँकेच्या सहकार्याने.



जाता जाता...
लंडनमध्ये विमानाने येणाऱ्यांना ऑलिंपिकचा सिंबॉल चितारण्याची अनोखी
पद्धत दिेसणार आहे. रिचमंड रॉयल पार्कमधली हिरवळ पाच रिंगच्या आकारांत
कापून हे ऑलिंपिक चिन्ह साकारले आहे. अशआ ऐतिहासिक स्थळांवर साकारलेल्या
अभिनव कल्पनांचा लंडनकरांना फार अभिमान आहे (अगदी पुणेकरांना असतो तसाच
जाज्वल्य!)  लंडनच्या रिचमंड या उपनगरात असलेली रॉयल पार्क खरे तर
तिथल्या हरणांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्वी राजाला म्हणे जवळच्या जवळ शिकार
करता यावी, म्हणून हरणे या उद्यानात आणली गेली. (तरीही बरीच हरणे अजून
उरली आहेत). तर ही रिचमंड डियर पार्क हिथ्रो विमानतळावर येणाऱ्या
विमानांच्या हवाई मार्गावर आहे. त्यामुळे विमानातून येणाऱ्या ऑलिंपिक
यात्रेकरूंना या भव्य रिंग वरून छान दिसू शकतात. खास शाही तबेल्यातील
शायर जातीच्या घोड्यांच्या मदतीने छाटणी करून हिरवळीवर या रिंग आकाराला
आणल्या आहेत. हिरवळ राखण्यासाठी जिम आणि मरडॉक या नावांचे घोडे कसे
दिमतीला ठेवले आहेत, शाही इतमामात हिरवळीची कशी निगा राखली जातेय याच्या
सुरस कहाण्या प्रसारमाध्यमांतून येत आहेत.

फायनल ड्रेस अप

थेम्सवरच्या ब्रिजवर झळकणाऱ्या ऑलिंपिक रिंग (छायाचित्र - सोनाली पटवर्धन-भोसले)
हजारो वर्षांची परंपरा असणारा, चार वर्षांतून एकदाच होणारा आणि तीनशेहून
अधिक देशांचा सहभाग असणारा खराखुरा जागतिक क्रीडा सोहळा आता फक्त ११
दिवसांवर येऊन ठेपला आहे. लंडन ऑलिंपिक २०१२ ची पोस्टर सगळीकडे लागली
आहेत आणि सेंट्रल लंडनमध्ये फिरताना आता या काउंटडाऊनकडे दुर्लक्ष करणे
केवळ अशक्य बनले आहे. जागतिक व्यापार केंद्र असलेल्या, राजकीय- सामाजिक –
सांस्कृतिक – ऐतिहासिक अशा सगळ्याच आघाड्यांवर मक्तेदारी सांगणाऱ्या
लंडनसारख्या शहरात जेव्हा हा असा भव्य क्रीडा सोहळा करण्याचे ठरले
तेव्हापासूनच हे जगप्रसिद्ध शहर आता ऑलिंपिकसाठी कसे सज्ज होते, याची
उत्सुकता साऱ्या जगालाच लागली होती.

पुण्यात गेल्याच वर्षी झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धांच्या वेळी जशी
लगबग सुरू होती त्याच्या कित्येक पट जास्त तयारी अर्थातच लंडनमध्ये सुरू
आहे. जगभरातून येणाऱ्या हजारो क्रीडाप्रेमींचे स्वागत करायला शहर सजते
आहे. आपल्या लकडी पुलाच्या सुरुवातीला जसा इलेक्ट्रॉनिक काउंटर बसवला
होता, तसाच काउंट डाउनचा फलक ट्रॅफलगार स्क्वेअरमध्ये गेल्या वर्षीपासूनच
लागला आहे. सदा गजबजलेल्या पिकॅडली सर्कस, ऑक्सफर्ड स्ट्रीट, रीजंट
स्ट्रीटच्या दुतर्फा (हा लंडनचा लक्ष्मी रोड किंवा मुंबईकरांसाठी रानडे
रोडसारखा भाग !) लंडन २०१२ चे झेंडे फडकत आहेत. वेनलॉक आणि मँडव्हील हे
ऑलिंपिक मॅस्कॉट दुकानांतल्या वेगवेगळ्या वस्तूंवर उमटलेले दिसताहेत.
टीशर्ट, मग, पडदे, पर्स, टॉवेल, स्कार्फ, स्वेटर कशाकशावर ऑलिंपिंकची ५
वर्तुळे दिसू लागली आहेत. या वातावरणनिर्मितीमुळे कोपऱ्याकोपऱ्यावर
ऑलिंपिकबाबत, त्याच्या तयारीबाबत, सजावटीबाबत आणि त्यामुळे अडणाऱ्या
वाहतुकीसंदर्भात चर्चा सुरू आहे. (आपल्याकडच्या कॉमनवेल्थ गेम्सची चर्चा
स्पर्धा संपल्यावरच जास्त आणि भलत्याच कारणांसाठी रंगली हे विसरता येत
नाहीय.)

हा सोहळा भव्य- दिव्य करण्यासाठी वारेमाप कष्ट आणि खर्चही होत आहे.
लंडनच्या मुख्य अॅट्रॅक्शन्सवर ऑलिंपिंकच्या रिंग लागल्या आहेत. एक महिना
आधीपासून हे सुशोभीकरण सुरू आहे. लंडनचा ‘फायनल ड्रेस –अप’ व्हायला खरी
सुरवात झाली ऑलिंपिकच्या बरोबर एक महिना अगोदर. २७ जूनलाच लंडनचे मेयर
बोरिस जॉन्सन यांनी टॉवर ब्रिजवर लावलेल्या ऑलिंपिंक २०१२च्या  सिंबॉलचे
उद्धाटन केले. त्यानंतर आता शहरातील सगळ्या महत्त्वाच्या इमारती, ट्रेन
स्टेशन्स, विमानतळ आणि इतर आकर्षणस्थळांवर ऑलिंपिकची छाप दिसत आहे.
ऑलिंपिकची ही छाप केवळ लंडन शहरावरच नाही, तर साऱ्या ब्रिटनभर पडली आहे,
हे विशेष. दिल्लीत झालेल्या १९८२ च्या एशियाडचे लोण जसे देशभर पसरले
होते, तसे लंडन ऑलिंपिकने देशभरात ‘फेस्टिव्हिटी’ निर्माण केली आहे.

जाता जाता...

टॉवर ब्रीजवर लावलेल्या भल्यामोठ्या ऑलिंपिक रिंगचे चिन्ह ८२ फूट रुंद
आणि ३८ फूट उंच आहे. या पुलाखालून उंच जहाज जाते तेव्हा हा पूल मध्यावरून
दोन बाजूला उचलला जातो. त्यावेळी या रिंग्जना धक्का लागू नये म्हणून या
रिंगसुद्धा पुलाबरोबवर फोल्ड करण्याची सोय केली आहे. तीन टनांच्या या
ऑलिंपिक रिंग्ज थेम्स नदीवर शोभून दिसताहेत. पण याच्यावर झालेल्या
खर्चाचीच चर्चा अधिक रंगली आहे. या रिंग बनवण्यासाठी २,५९,८१७ ब्रिटीश
पाउंड फक्त (सव्वा दोन कोटी रुपये) एवढा खर्च आला आहे. त्या पुलावर
टांगण्यासाठी आलेला ५३,००० पाउंडचा खर्च वेगळा. अशा रिंग आणखी काही
ठिकाणी लावण्यात येत आहेत.

वेलकम टू लंडन..इट्स ऑलिंपिक टाईम

नमस्कार मंडळी,

जागतिक महासोहळा, हजारो वर्षांची परंपरा लाभलेला सांस्कृतिक उत्सव, अतिभव्य क्रीडा सोहळा असं कित्येक विशेषणांनी कौतुक करता येईल, असा ऑलिंपिक सोहळा अगदी १० दिवसांवर ठेपलाय. या सोहळ्याच्यावेळी यजमान शहरात राहणं आणि तयारीची लगबग पाहणं हा विलक्षण अनुभव वाटतोय. लंडन ऑलिंपिक २०१२ चा औपचारिक उद्धाटन सोहळा २७ जुलैला होणार आहे. पण सोहळ्याची लगबग कधीच सुरू झाली आहे. हे सगळं जवळून बघताना खूप मजा येतेय. त्याबद्दल लिहिण्यासाठी ही जागा.
या ब्लॉगमधील लेख महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे आवृत्तीत लंडन ब्रीजवरून या सदराच्या रूपाने छापून आले आहेत. ई-पेपर नसल्याने पुण्याबाहेरच्या माझ्या दोस्तांना ते वाचता येत नाहीत. त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठीचे हे माध्यम. 

Being in the Olympic city is wonderful. Festivity is already in air and I'm enjoying it. Here I attempt to write about the city of London during Olympic. Its about London 2012 outside the main stadium. The articles are published in Maharashtra Times Pune edition. Thanks MaTa Pune for giving wonderful coverage to my articles. Those who don't have access to MaTa Pune... here are the posts from London Bridge.