सेंट्रल लंडनमध्ये कुठेही गेले तरी सध्या फक्त ऑलिंपिक माहौल आहे. उत्साही पर्यटकांची गर्दी, टीम जीबीचे (ग्रेट ब्रिटन) टीशर्ट घातलेले समर्थक, वेळेवर स्पर्धास्थळी पोचायची चिंता चेहऱ्यावर घेऊन वावरणारे स्वयंसेवक आणि त्या गर्दीत आपापल्या ऑफिसला पोचायची घाई करणारे नोकरदार, असे एकूण चित्र दिसतेय. लंडनच्या ट्यूब ‘पिक टाईम’ला (म्हणजे ऑफिस सुरू व्हायच्या आणि सुटण्याच्या वेळेला) कायम भरलेल्या असतात. आपल्या मुंबईच्या लोकलइतकी नाही तरी खचाखच गर्दी या वेळेला हमखास असते. या गर्दीत ऑलिंपिकने भर पडली आहे. त्यातच ब्रिटिश हवा आता चांगली तापली आहे. एरवी हवाहवासा उन्हाळा ट्यूबच्या गर्दीत मात्र घाम काढतोय. त्यामुळे एरवी इंग्लिश सौजन्यासाठी प्रसिद्ध असलेला ‘साहेब’ही चांगलाच कावला आहे.
पिक टाईममध्ये प्रवास टाळणे शक्य असेल तर टाळा, असे आवाहन सर्वसामान्य जनतेला करण्यात येत आहे. ट्यूब आणि नॅशनल रेलचे तिकीट पिक टाईमपेक्षा ऑफपिकचे कमी असते. शनिवार- रविवार ऑफ-पिक मानला जातो, कारण कार्यालयांना सुट्टी असते. पण आता ऑलिंपिकमुळे वीक-एंडच्या दिवशीसुद्धा ट्यूब भरून धावत आहेत. ऑलिंपिक काळात गर्दीमुळे पर्यटकांची आणि लंडनकरांची गैरसोय होऊ नये यासाठी गेले कित्येक दिवस प्रयत्न सुरू होते. ट्यूब स्टेशनवरील गर्दी विभागण्यासाठी अधिक एक्झिट पॉइंट्स केले. बाहेर पडणाऱ्यांसाठी दिशादर्शक फलक नव्याने लावले. प्रेक्षकांचा गोंधळ होऊ नये म्हणून कुठली स्पर्धा बघायला कुठे उतरा, जवळचे ट्यूब स्टेशन हे सांगणारे फलकही अंडरग्राउंड स्टेशनवर लागले. पण माणसांच्या लोंढ्यांपुढे ही तयारी अपुरीच ठरत आहे.
आग लागल्यावर काय करावे यासाठी जसे मॉकड्रील घ्यायची पद्धत आहे, तशी क्राऊड मॅनेजमेंटसाठी गेले काही दिवस वेगवेगळ्यास्टेशन्सवर मॉकड्रील घेणे सुरू होते. ऑलिंपिकमुळे अती गर्दी झाली तर चेंगराचेंगरी टाळण्यासाठी कसे बाहेर पडावे यासाठी ही पूर्वतयारी होती. ट्यूबस्टेशनवर रिहर्सलमुळेच गोंधळ उडाला होता. तो गोंधळ काही ट्यूब स्टेशनवर अजूनही सुरू असल्याचे जाणवले. इव्हिनिंग स्टँडर्ड या लंडन ट्यूबमधील लोकप्रिय सायंदैनिकातील ही आकडेवारी ट्यूबच्या गर्दीत उभ्या उभ्याच वाचली तेव्हा कपाळावर जमलेल्या घर्मबिंदूंचा बांधच फुटला.
ऑलिंपिकनिमित्त लंडनमध्ये प्रवास करणारे प्रेक्षक – ९० लाख
स्पर्धक, पदाधिकारी, स्वयंसेवक आण पत्रकार – ३ लाख
पब्लिक ट्रान्सपोर्टच्या फेऱ्या – १ कोटी ५० लाख
गेम्स लेनची शिस्त न पाळणाऱ्या कारना उचलणारे टोइंग ट्रक – ७२
No comments:
Post a Comment