जगभरातील खेळाडूंना सामावून घेणाऱ्या ऑलिंपिक व्हिलेजचे लंडनमध्ये सोमवारी
उद्घाटन झाले. ऑलिंपिकनिमित्त शहरात येणाऱ्या हजारो प्रेक्षक आणि शेकडो खेळाडूंना
कोणत्याही त्रासाशिवाय ऑलिंपिक व्हिलेजपर्यंत जाता यावे आणि शहराची घडीही या संभाव्य
गर्दीमुळे विस्कटू नये यासाठी लंडन विशेष तयारी करत आहे. या तयारीचा महत्त्वाचा
भाग म्हणजे ऑलिंपिक स्पेशल लेन. केवळ खेळाडू, कोच आणि संबंधितांची
ने- आण करणाऱ्या वाहनांसाठी ही लेन राखीव आहे.
ऑलिंपिकची पाच वर्तुळे रंगवलेल्या लेन गेले काही दिवस नुसत्याच दिसत असल्या
तरी या लेनची शिस्त सोमवारपासून सुरू झाली. सुरवातीला एम ४ या मुख्य मोटर वेच्या ठराविक
भागातील लेन राखून ठेवली आहे. हिथ्रो विमानतळ ते ऑलिंपिक व्हिलेज दरम्यानच्या
रस्त्यावर फिरताना आज त्यामुळे थोडा गोंधळच जाणवत होता. लंडनकडे जाणाऱ्या
तीनपैकी एक लेन राखीव झाल्यामुळे मोटारींच्या रांगा लागल्या होत्या. ऑलिंपिकच्या आधी दोन
दिवसापर्यंत ३० मैलांच्या सर्व गेमलेन्स सुरू होतील.
ऑलिंपिक व्हिलेज ‘स्ट्रॅटफर्ड’ या लंडनच्या पूर्व भागात आहे आणि लंडनचे प्रमुख विमानतळ - हिथ्रो –पश्चिम
भागात. त्यामुळे खेळाडूंना, प्रेक्षकांना संपूर्ण लंडन
दर्शन घडवतच ऑलिंपिक व्हिलेज गाठावे लागणार आहे. प्रचंड रहदारीचा सेंट्रल लंडनच्या
भाग ओलांडताना कमीत कमी वेळ कसा लागेल, यासाठी ऑलिंपिक कमिटीने
प्रचंड काथ्याकूट केला आणि त्यातून ही स्पेशल लेनची संकल्पना आली. सोमवारपासून
आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे लंडनमध्ये आगमन सुरू झाले आहे. हिथ्रो विमानतळाजवळ टर्मिनल
४ ला उत्साही स्वयंसेवक दाखल झालेले दिसले. (भारतातून येणारी सर्व विमाने याच
टर्मिनलला येतात) सुरक्षायंत्रणा वाढलेली जाणवली. प्रसारमाध्यमांच्या गाड्यांची
गर्दीही तेथे वाढते आहे. बीबीसीच्या बातमीदाराने तर आपल्या ब्लॉगमधून खास टिप्स
देताना एक फुकटचा सल्ला पर्यटकांना दिलाय. ‘तुम्ही जर गेम्सशी
संबंधित नसाल आणि पुढच्या काही दिवसात हिथ्रो विमानतळावर येणार असाल तर चुकूनही
ट्रॅकसूट घालून येऊ नका. विमानतळावरच तुम्हाला पकडून, हाऊ डू यू फील इन लंडन वगैरे प्रश्न
विचारण्यात येतील.’
जाता जाता...
हिथ्रोवरून येणाऱ्यांच्या स्वागताची जशी जोरदार तयारी सुरू आहे, तशीच किंग्ज क्रॉस रेल्वे स्थानकावर सुद्धा सुरू आहे. किंग्ज क्रॉसवरून युरोस्टार
ही प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय सेवा सुरू असते. इंग्लिश खाडीच्या पाण्याखालून भुयारी
मार्गाने जाणारी ही ट्रेन युरोपातील काही महत्त्वाच्या शहरांना जोडते. मुख्यतः
फ्रेंच पर्यटक यातून प्रवास करतात कारण लंडन- पॅरिस अंतर ही ट्रेन फक्त अडीच तासात
कापते. या दोन शेजाऱ्यांमधील ‘सख्य’ जगजाहीर आहे.
फ्रेंच आणि ब्रिटीश एकमेकांबद्दल बोलताना कशा खोचक आणि तिरकस (पुणेरी जोडे माहित
असणाऱ्यांना हे चटकन समजेल) टपल्या हाणतात, हे ऐकण्यासारखे
असते. तर हे शेजारी देश २०१२ चे ऑलिंपिक होस्ट बनण्यासाठी सारखेच उत्सुक होते आणि
अगदी शेवटच्या फेरीतील बिडिंगमध्ये पॅरिसला थोडक्या मतांनी लंडनविरोधात हरावे
लागले होते. याची आठवण करून देत किंग्ज क्रॉस ट्रेन स्टेशनवर प्रचंड मोठ्या
आकाराच्या ऑलिंपिक रिंग लावण्यात आल्या आहेत, त्या
युरोस्टारने येणाऱ्या फ्रेंचांना खिजवण्यासाठीच लावण्यात आल्या नाहीत ना, याची खुमासदार चर्चा लंडनमधील प्रसिद्ध वृत्तपत्राच्या ब्लॉगवरून झडत
आहे.

No comments:
Post a Comment