लंडन हे जगातील एक महागडे शहर म्हणून ओळखले जाते. त्यातच आता ऑलिंपिकमुळे तर महागाईला ऊत आला आहे.‘वेलकम टू लंडन’ अशा पाट्या लागल्या असल्या तरी ऑलिंपिकदरम्यान लंडनमध्ये येणाऱ्यांना चांगला मोठा खिसा रिकामा करावा लागणार आहे. आयत्या वेळेचे बेत आखणाऱ्यांना तर विमानभाडे, टॅक्सीभाडे जवळपास दुपटीने द्यावे लागत आहे. मुख्य कसरत आहे राहण्याची सोय. ऑलिंपिक पार्कच्या आसपासची हॉटेल्स कधीच आरक्षित झाली आहेत. लंडनमध्ये सगळीकडेच भाड्याच्या खोलीचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. पूर्व लंडनमध्ये गेस्ट हाऊसमधील एका सामान्य खोलीचा दररोजचा दर कमीत कमी १५० पाउंडपर्यंत पोचला आहे. हॉटेल्ससाठी (तारांकित नव्हे) तर गेल्या वर्षी १०० पाऊंड दिलेल्या खोलीला आता ३०० पाउंड मोजावे लागत आहेत.
ऑलिंपिक दरम्यान खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांखेरीज इतर प्रेक्षक म्हणून येणाऱ्यांची संख्या काही लाखांवर जाण्याची शक्यता आहे. खेळाडूंची व्यवस्था ऑलिंपिक व्यवस्थापनाने केली असली तरी प्रेक्षकांना लंडनमधील हॉटेल, गेस्ट हाऊसमध्येच सोय करावी लागणार आहे. पूर्व लंडनमध्ये खरे तर सर्वसाधारणपणे जागेचा दर कमी असतो. सेंट्रल लंडन सर्वाधिक महागडे असून पश्चिमेकडील उपनगरेही तुलनेने अधिक महाग आहेत. मात्र ऑलिंपिकचा मुख्य सोहळा जिथे होणार ते ऑलिंपिक पार्क स्ट्रॅटफर्ड या पूर्व उपनगरात आहे. तिथल्या जागांचे दर कधी नव्हे इतके वाढले आहेत. विशेषतः कमी कालावधीसाठी घेत असलेल्या खोलीसाठी अधिक पाउंड मोजावे लागत आहेत.
लंडन २०१२ च्या अधिकृत संकेतस्थळावर काही हॉटेल्सबाबत माहिती देण्यात आली आहे. पण त्यातील बहुतेक जागा एव्हाना फुल्ल झाल्या आहेत. ही सर्व हॉ़टेल्स आधीच आरक्षित झाली आणि आता घरगुती पद्धतीने चालवली जाणारी गेस्ट हाऊसही मिळेनाशी झाली आहेत. या काळात लंडनमध्ये ऑलिंपिकखेरीज इतर कामानिमित्त येणाऱ्या नोकरदारांना आणि व्यावसायिकांना त्यामुळे भुर्दंड सोसावा लागतोय. लंडनमध्ये उपलब्ध असणाऱ्या खोल्यांसाठी किमान ३०० टक्के भाडेवाढ झाली आहे.
वाहत्या थेम्समध्ये हात धुवून घ्या
ऑलिंपिकच्या निमित्ताने अनेकांनी आपल्या घरातील स्पेअर बेडरूम भाड्याने देऊन ‘वाहत्या थेम्स’मध्ये हात धुवून घेण्याचा प्रकार चालवला आहे. स्पेअर रूम, गमट्री या ब्रिटनमधील लोकप्रिय वेबसाईट्वर अशा छोट्या जाहिराती झळकत आहेत. स्ट्रॅटफ्रर्ड,ईस्टहॅम, वेस्टहॅम या पूर्व लंडनच्या झोन ३ मधील उपनगरांत जागांना मागणी आहे. तिथल्या घरमालकांनी अशी खोली तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे ईस्टहॅमध्ये बहुतांश वस्ती आशियायी नागरिकांची आहे. भारतीय वंशाचे नागरिक येथे मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले आहेत.

No comments:
Post a Comment