ऑलिंपिक सोहळा केवळ लंडनमधील स्टेडियमपुरता मर्यादित न राहता ब्रिटनमधील सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोचतोय ते सध्या सुरू असणाऱ्या टॉर्च रीलेमधून. गावा- गावांमधून या ऑलिंपिक ज्योतीचे स्वागत होत आहे. स्थानिक लोकांनीच सुचवलेल्या सर्वसामान्यांच्या ‘हीरो’च्या हाती ही मशाल फिरते आहे. ऑलिंपिक ज्योत ज्या गावात येणार तेथील स्थानिक कौन्सिल स्वागताची जंगी तयारी करते आणि आधी ठरवून दिलेल्या मार्गाने आणि ठराविक वेळेला ज्योत मिरवत आणली जाते. ऑलिंपिकची ही ज्योत बघण्यासाठी ब्रिटीश नागरिक उत्साहाने मुला-बाळांसह रस्त्यांवर उतरलेले दिसत आहेत. हातात युनियन जॅक घेतलेली लहान मुले, तरुण मंडळी आतापासूनच आपल्या देशाच्या टीमला जोरदार पाठिंबा देत आहेत. नॉर्दन आयर्लंड, स्कॉटलंड, वेल्स, ब्रिटिश आईल आणि इंग्लंडचा प्रवास करत ज्योत आता शेवटच्या टप्प्यात आहे.
ग्रीसमध्ये पारंपरिक पद्धतीने ज्योत पेटवून यजमान देशात पोचवली जाते आणि मग यजमान देशांतील गावांगावांतून ज्योतीचा प्रवास सुरू होतो. लंडन २०१२ ऑलिंपिक ज्योतीचे देशभ्रमण १९ मे पासून सुरू आहे. ब्रिटनमधील ९५ टक्के जनतेपर्यंत पोचता येईल असा हा प्रवासमार्ग आखण्यात आला आहे. जवळपास १००० गावांमधून फिरून येत्या शुक्रवारी ही ज्योत लंडनमध्ये पोचेल आणि पुढच्या पाच दिवसात लंडनभर फिरेल. ऑलिंपिकची मशाल देशभरातील ८००० लोकांच्या हातून प्रवास करत आहे. शेवटी टॉवर ऑफ लंडनध्ये हेलिकॉप्टरने ती आणण्यात येईल आणि या रक्तरंजित इतिहास असणाऱ्या भुईकोटात एक दिवस कुलूपबंद राहील.
![]() |
रीडिंग शहरातील टॉर्च रिले (छायाचित्र – सोनाली पटवर्धन भोसले)
|
ऑलिंपिकज्योतीची बिकट वाट
ब्रिटीशांकडून स्वागत होत असले तरी ऑलिंपिक ज्योतीला काही ठिकाणी स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. टॉर्च रिलेच्या सुरुवातीच्या दिवसातच नॉर्दन आयर्लंडमधील सीमावर्ती भागांत आयरिश नागरिकांनी उग्र निदर्शने करून मिरवणूक थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ही रिपब्लिकन असंतुष्टांची निदर्शने असल्याचे सांगत लगेच निदर्शकांना अटकही केली. रिलेच्या ५३ व्या दिवशी तर एका नग्नावस्थेतील निदर्शकाने उपस्थितांना चक्रावून टाकले. फ्री तिबेट असे त्याने पाठीवर चितारले होते. त्याला ब्लँकेटने गुंडाळताना आयोजकांची आणि पोलिसांची तारांबळ उडाली.

No comments:
Post a Comment