ऑलिंपिकचा महासोहळा सुरू व्हायला आता केवळ काही तास शिल्लक आहेत. गेली चार वर्षे सुरू असलेली तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यानिमित्त शहरात येणाऱ्या लाखो लोकांना सामावून घेण्यासाठी लंडन सज्ज झाले असले तरीही, या काळात वाहतुकीवर पडणारा ताण लक्षात घेता, कामाचे रूटीन ठीक राहील ना? बदललेल्या वाहतूक नियमांचा किती परिणाम जाणवेल?याची चिंता लंडनमधील बिझनेस पार्कमध्ये जाणवत आहे. गेले दोन दिवस कार्यालयांमधून होणाऱ्या मिटींगचा अजेंडा ऑलिंपिक काळात काम सुरळीत राहण्यासाठी काय उपाययोजना करता येईल हाच आहे.
कॅनरी वॉर्फ हा लंडनमधील भाग बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून ओळखला जातो. ऑलिंपिक पार्कपासून काही मैलांवर असल्यामुळे येथील कंपन्यांना ऑलिंपिकचा स्ट्रेस जाणवणार आहे. ऑलिंपिक रूट नेटवर्कमधील रस्त्यांवर ऑलिंपिक लेन सुरू झाली असल्याने उरलेल्या लेन्समध्ये वाहनांच्या रांगा आतापासूनच लागत आहेत. कॅनरी वॉर्फला कामासाठी येणारे कर्मचारी लंडनच्या विविध भागातून प्रवास करून पोचतात. ते वेळेवर पोचले नाहीत, तर काम कसे उरकायचे यांसंदर्भातील चर्चा ऑफिस मीटिंगमधून सूरू आहेत. सेंट्रल लंडनमधून ज्यांना यावे लागते, त्यांच्यासाठी तर हा काळ परीक्षेचा असणार आहे.
कामावर परिणाम होऊ नये, म्हणून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. काही कंपन्यांनी ‘पिक टाईम’ टाळण्यासाठी कामाच्या वेळेत बदल करण्याचे सुचवले आहे. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार त्यांनी कामावर यावे, असे सांगत वेळेचे बंधन शिथील करण्यात आले आहे. कामावर येणे अगदीच शक्य होणार नाही अशांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय देण्यात आला आहे.
ट्रान्सपोर्ट फॉर लंडन (टीएफएल) ही शहरातील सार्वजनिक वाहतून सांभाळणारी कंपनी गेले कित्येक महिने ऑलिंपिकसाठी तयारी करते आहे. कितीही प्लॅनिंग केले तरी ऑलिंपिक काळात काही ठिकाणी सेवेत विलंब होणार, वेळापत्रक कोलमडणार याची कल्पना‘टीएफएल’लाही आहे. म्हणूनच ऑलिंपिकच्या काळात बऱ्याच अंडरग्राउंड ट्यूब स्टेशनवर मोफत इंटरनेट वायफाय उपलब्ध असणार आहे. जेणेकरून कर्मचाऱ्यांना तिथूनही काम करता येईल. थोडक्यात काय, तर या अवघड काळातही काम थांबवू नका, सबबी सांगू नका आणि कुठूनही करा पण काम सुरू ठेवा, असे आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे.
ऑलिंपिक स्ट्रेस टेस्ट
डेलॉईट या कंपनीच्या पुढाकाराने मे महिन्यातच कंपन्यांची ऑलिंपिक स्ट्रेस टेस्ट घेण्यात आली. ऑलिंपिक काळात काम सुरळीत चालावे यासाठी कंपनी किती तयार आहे याची चाचपणी करताना कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत हे पाहण्यात आले. यामध्ये २० टक्के कंपन्या ऑलिंपिकच्या स्ट्रेसखाली दबलेल्या दिसल्या.
![]() |
ऑलिंपिक पार्कच्या पार्श्वभूमीवर दिसणाऱ्या कॅनरी वॉर्फच्या गगनचुंबी इमारती.
|

No comments:
Post a Comment