Wednesday, July 18, 2012

फायनल ड्रेस अप

थेम्सवरच्या ब्रिजवर झळकणाऱ्या ऑलिंपिक रिंग (छायाचित्र - सोनाली पटवर्धन-भोसले)
हजारो वर्षांची परंपरा असणारा, चार वर्षांतून एकदाच होणारा आणि तीनशेहून
अधिक देशांचा सहभाग असणारा खराखुरा जागतिक क्रीडा सोहळा आता फक्त ११
दिवसांवर येऊन ठेपला आहे. लंडन ऑलिंपिक २०१२ ची पोस्टर सगळीकडे लागली
आहेत आणि सेंट्रल लंडनमध्ये फिरताना आता या काउंटडाऊनकडे दुर्लक्ष करणे
केवळ अशक्य बनले आहे. जागतिक व्यापार केंद्र असलेल्या, राजकीय- सामाजिक –
सांस्कृतिक – ऐतिहासिक अशा सगळ्याच आघाड्यांवर मक्तेदारी सांगणाऱ्या
लंडनसारख्या शहरात जेव्हा हा असा भव्य क्रीडा सोहळा करण्याचे ठरले
तेव्हापासूनच हे जगप्रसिद्ध शहर आता ऑलिंपिकसाठी कसे सज्ज होते, याची
उत्सुकता साऱ्या जगालाच लागली होती.

पुण्यात गेल्याच वर्षी झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धांच्या वेळी जशी
लगबग सुरू होती त्याच्या कित्येक पट जास्त तयारी अर्थातच लंडनमध्ये सुरू
आहे. जगभरातून येणाऱ्या हजारो क्रीडाप्रेमींचे स्वागत करायला शहर सजते
आहे. आपल्या लकडी पुलाच्या सुरुवातीला जसा इलेक्ट्रॉनिक काउंटर बसवला
होता, तसाच काउंट डाउनचा फलक ट्रॅफलगार स्क्वेअरमध्ये गेल्या वर्षीपासूनच
लागला आहे. सदा गजबजलेल्या पिकॅडली सर्कस, ऑक्सफर्ड स्ट्रीट, रीजंट
स्ट्रीटच्या दुतर्फा (हा लंडनचा लक्ष्मी रोड किंवा मुंबईकरांसाठी रानडे
रोडसारखा भाग !) लंडन २०१२ चे झेंडे फडकत आहेत. वेनलॉक आणि मँडव्हील हे
ऑलिंपिक मॅस्कॉट दुकानांतल्या वेगवेगळ्या वस्तूंवर उमटलेले दिसताहेत.
टीशर्ट, मग, पडदे, पर्स, टॉवेल, स्कार्फ, स्वेटर कशाकशावर ऑलिंपिंकची ५
वर्तुळे दिसू लागली आहेत. या वातावरणनिर्मितीमुळे कोपऱ्याकोपऱ्यावर
ऑलिंपिकबाबत, त्याच्या तयारीबाबत, सजावटीबाबत आणि त्यामुळे अडणाऱ्या
वाहतुकीसंदर्भात चर्चा सुरू आहे. (आपल्याकडच्या कॉमनवेल्थ गेम्सची चर्चा
स्पर्धा संपल्यावरच जास्त आणि भलत्याच कारणांसाठी रंगली हे विसरता येत
नाहीय.)

हा सोहळा भव्य- दिव्य करण्यासाठी वारेमाप कष्ट आणि खर्चही होत आहे.
लंडनच्या मुख्य अॅट्रॅक्शन्सवर ऑलिंपिंकच्या रिंग लागल्या आहेत. एक महिना
आधीपासून हे सुशोभीकरण सुरू आहे. लंडनचा ‘फायनल ड्रेस –अप’ व्हायला खरी
सुरवात झाली ऑलिंपिकच्या बरोबर एक महिना अगोदर. २७ जूनलाच लंडनचे मेयर
बोरिस जॉन्सन यांनी टॉवर ब्रिजवर लावलेल्या ऑलिंपिंक २०१२च्या  सिंबॉलचे
उद्धाटन केले. त्यानंतर आता शहरातील सगळ्या महत्त्वाच्या इमारती, ट्रेन
स्टेशन्स, विमानतळ आणि इतर आकर्षणस्थळांवर ऑलिंपिकची छाप दिसत आहे.
ऑलिंपिकची ही छाप केवळ लंडन शहरावरच नाही, तर साऱ्या ब्रिटनभर पडली आहे,
हे विशेष. दिल्लीत झालेल्या १९८२ च्या एशियाडचे लोण जसे देशभर पसरले
होते, तसे लंडन ऑलिंपिकने देशभरात ‘फेस्टिव्हिटी’ निर्माण केली आहे.

जाता जाता...

टॉवर ब्रीजवर लावलेल्या भल्यामोठ्या ऑलिंपिक रिंगचे चिन्ह ८२ फूट रुंद
आणि ३८ फूट उंच आहे. या पुलाखालून उंच जहाज जाते तेव्हा हा पूल मध्यावरून
दोन बाजूला उचलला जातो. त्यावेळी या रिंग्जना धक्का लागू नये म्हणून या
रिंगसुद्धा पुलाबरोबवर फोल्ड करण्याची सोय केली आहे. तीन टनांच्या या
ऑलिंपिक रिंग्ज थेम्स नदीवर शोभून दिसताहेत. पण याच्यावर झालेल्या
खर्चाचीच चर्चा अधिक रंगली आहे. या रिंग बनवण्यासाठी २,५९,८१७ ब्रिटीश
पाउंड फक्त (सव्वा दोन कोटी रुपये) एवढा खर्च आला आहे. त्या पुलावर
टांगण्यासाठी आलेला ५३,००० पाउंडचा खर्च वेगळा. अशा रिंग आणखी काही
ठिकाणी लावण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment