ऑलिंपिक स्पर्धेचा चेहरा म्हणजे ऑलिंपिकचा शुभंकर - मॅस्कॉट. आजपर्यंतच्या इतिहासात ऑलिंपिक मॅस्कॉटस तुफान लोकप्रिय झालेले दिसतात. यजमान देशाची ओळख सांगणारा मॅस्कॉट स्पर्धेच्या प्रत्येक ठिकाणी सतत दिसत
राहतो. लंडन ऑलिंपिकचा मॅसकॉट - वेनलॉक हा सुरुवातीला त्याच्या वेगळेपणामुळे गाजला. जागोजागी हा वेनलॉक दिसतोय खरा पण त्याची आत्तापर्यंत फारच कमी दखल घेतली गेली आहे. लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्याचे भाग्य वेनलॉकच्या वाटेला येईल की नाही याची शंका आहे.
स्टीलपासून बनलेला, मोठे डोके असलेला, हातात फ्रेंडशिप बँड घातलेला हा एकाक्ष वेनलॉक प्रथमदर्शनी विचित्र असा प्राणी वाटतो. हा कुठल्या परग्रहावरील जीव आहे का, अशा प्रतिक्रिया याच्या पहिल्या दर्शनानंतर सामान्यांकडून आल्या होत्या त्या यामुळेच. खरे तर संयोजकांना वेनलॉकच्या या असल्या रुपामधून बराच आशय सांगायचा आहे. औद्योगिक क्रांतीची जननी असलेल्या लंडन नगरीने आता जागतिक डिजिटल युगाचा ध्यास घेतला आहे हे सांगायला त्याची निर्मिती स्टीलच्या एका थेंबातून झालेली त्यांनी दाखवली
आहे आणि डोळा म्हणून कॅमेरा लेन्स लावली आहे. पुन्हा मॅस्कॉटमधून जागतिक बंधुभाव व्यक्त करण्याचाही संधी सोडलेली नाही. त्यासाठी त्याच्या हातात ऑलिंपिक रिंगच्या पाच रंगातले फ्रेंडशिप बँड घालण्यात आलेत. लंडनची ओळख असणाऱ्या पारंपरिक ब्लॅक टॅक्सीची आठवण करून देणारा पिवळा हेडलाईट
डोक्यावर लावलेला आहे. हा एवढा सारा गर्भित अर्थ किती लोकांपर्यंत पोचतोय माहित नाही. प्रथमदर्शनी तरी याची ओळख ‘वनआईड क्रीचर’ अशीच बनली गेली आहे एवढे खरे.
ऑलिंपिक मॅस्कॉट छान असावा, लहान मुलांना आवडेल, गोड वाटेल असा असावा, अशी आत्तापर्यंतची पद्धत होती. सर्वसाधारणपणे ऑलिंपिकच्या यजमान देशात सापडणारा प्राणी किंवा यजमान देशाची ओळख ठरू शकेल असे कॅरॅक्टर मॅस्कॉट म्हणून वापरले गेले. यजमान देशातील जनतेने यातील अनेक मॅस्कॉटना अगदी
डोक्यावर घेतले. अस्वलाचे पिल्लू, वाघांचे बछडे, गरुड यांची कॅरॅक्टर्स ऑलिंपिकचे मॅस्कॉट म्हणून येऊन गेली आहेत. आपल्याकडे एशियाडचा अप्पू आणि नॅशनल गेम्सचा राजू अजूनही अनेकांच्या लक्षात असेल. यंदाच्या वेनलॉकला लोकांनी तेवढे आपलेसे केलेले नाही. १९९६ ला अमेरिकेत झालेल्या अटलांटा ऑलिंपिकच्या वेळी व्हॉट्जिट किंवा इज्झी असे विचित्र नाव ठेवलेला मॅस्कॉट असाच लोकांना झेपला नव्हता. पहिले कॉम्प्युटर जनरेटेड कॅरॅक्टर असे कौतुक झाले तरी तो लोकांना फारसा रुचला नव्हता. आता इंग्लिश वेनलॉकची तुलना अमेरिकन इज्झीशी होत आहे.
नाव आले कुठून?
इंग्लंमधील श्रोपशायर परगण्यात असलेल्या ‘मच वेनलॉक’ या गावाच्या नावावरून ऑलिंपिक मॅस्कॉटला तसे नाव देण्यात आले. या गावाला आधुनिक ऑलिंपिकच्या इतिहासात आद्य स्थान आहे. मच वेनलॉक येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धांपासून प्रेरणा घेऊनच प्राचीन ग्रीक ऑलिंपिक परंपरेचे १९ व्या शतकात पुनरुज्जीवन करण्यात आले. पॅरालंपिकचा मॅस्कॉट मँडेव्हिलचे नाव एका इंग्लिश हॉस्पिटलवरून ठेवण्यात आले आहे. बकिंगहॅमशायर परगण्यातील स्टोक मँडेव्हिल हॉस्पिटलच्या डॉ लुडविग गटमन यांनी १९४० च्या दशकात स्टोक मँडेव्हिल गेम्स सुरू केले. पॅरालंपिक गेम्सची ती मुहूर्तमेढ होती, असे मानले जाते.
ब्रिटीश ब्रिटीश परंपरेला जागून काहीतरी खूप वेगळे करण्याच्या नादात लंडन ऑलिंपिकमध्ये हे वेनलॉक आणि मँडेविल सादर केले पण लोकांच्या मनाला ते भिडले नाहीत, हे खरे.
