लंडनसारख्या प्रचंड मोठ्या शहरात ऑलिंपिक आयोजित करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. शहराचे इतर व्यवहार सुरळीत चालतील याची काळजी घेणे आणि त्याचवेळी ऑलिंपिकच्या प्रेक्षकांना, खेळाडूंना, संबंधितांना वेळच्या वेळी स्पर्धेच्या ठिकाणी कसे पोचता येईल, याचीही सोय बघणे. एवढ्या मोठ्या शहरात विशेषतः सार्वजनिक वाहतुकीने फिरताना नवख्या माणसांचा गोंधळ उडणे सहाजिक आहे. पण लंडन ऑलिंपिकसाठी लॉजिस्टिक्स इतके छान तयार केले आहे, की कोणीही सराईतासारखा फिरू शकेल. ऑलिंपिकचे साईन बोर्ड्स, नकाशे, स्क्रीन, मोबाईल अॅप्लिकेशन्स यांच्या जोडीला हजारो स्वयंसेवक उभे केल्याने पत्ता विचारण्याची वेळच येत नाही.
लंडनचा पसारा ८ झोनमध्ये विभागला आहे. वेस्टमिन्स्टर म्हणजेच सेंट्रल लंडनचा जुना भाग झोन १ मध्ये येतो. पूर्वेला आणि पश्चिमेला २, ३, ४ असे झोनचे परिघ वाढत जातात. आठव्या झोनमध्ये राहणारी व्यक्ती सेंट्रल लंडनपासून सर्वात दूर राहते. ऑलिंपिक पार्क पूर्वेकडच्या झोन ३ मध्ये येते. ऑलिंपिकच्या अनेक स्पर्धा स्टेडियमबाहेरही वेगवेगळ्या ठिकाणी होत असल्याने लंडनभर ऑलिंपिकची वाहतूक सुरू आहे. पश्चिमेच्या वेम्बलीपासून पूर्वेला ग्रीनीचपर्यंत अनेक ठिकाणे ऑलिंपिकमय आहेत. पण तरीही स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत पोचताना कोणतीही अडचण जाणवत नाही. कारण ऑलिंपिकचे व्हॉलेंटिअर्स जागोजागी मदतीसाठी उभे आहेत.
एखादा गावाकडचा माणूस पहिल्यांदा शहरात येतो मोठे रस्ते, गाड्या पाहून तेव्हा गांगरून जातो, तसे गांगरायला लावणारा ट्यूब- बस- ट्रेनचा पसारा लंडनमध्ये दिसतो. लंडनच्या रस्त्यांखाली रेल्वेचे खरोखर जाळे विणलेले आहे. आठ झोनना जोडणाऱ्या एकूण १० अंडरग्राऊंड ट्यूब लाईन्स, शिवाय ओव्हरग्राऊंड आणि नॅशनल रेल वेगळ्या. एवढा हा पसारा आहे. सुरुवातीला याचेच दडपण येऊ शकते. पण ज्या ट्यूब स्टेशनजवळ ऑलिंपिक इव्हेंट आहे, त्या स्टेशनवर मोठ्या अक्षरात तसे बोर्ड लागलेले आहेत. तिथपर्यंत जायचा नकाशाही आहे. शिवाय काही स्टेशनवर रस्त्याचा टच स्क्रीन इंटरअॅक्टिव्ह मॅप लावला आहे. हॉर्सगार्ड परेडसाठी येथे उतरा अशा अनाउन्समेंट ट्यूबमध्येही सतत होतच असतात. ट्यूब स्टेशनपासून स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत जागोजागी रस्ता दाखवणारे साईनबोर्ड्स लागले आहेत.
वॉटर्लू, व्हिक्टोरिया, पॅडिंग्टन, किंग्ज क्रॉस या लंडनच्या चारही मोठ्या ट्रेन स्टेशनच्या बाहेर मोठा इन्फॉर्मेशन डेस्क उभा केला आहे. तेथे ऑलिंपिकच्या इव्हेंटची माहिती, तिथपर्यंत पोचायचे कसे हे सांगणारे नकाशे शिवाय लंडनचा नकाशा, ट्यूब मॅप, बस रूट, सायकल रूट, वॉकवे असे अनेक नकाशे मोफत उपलब्ध आहेत. ट्रान्सपोर्ट फॉर लंडननेदेखील खास माणसे मार्गदर्शनसाठी तैनात केली आहेत. लंडनच्या चारही बड्या ट्रेन स्टेशनवर आणि स्टेशनबाहेर गुलाबी आणि जांभळे डगले घातलेले अनेक ऑलिंपिक व्हॉलेंटिअर उभे असलेले दिसतात. त्यांचा उत्साहसुद्धा वाखाणण्यासारखा आहे. तुम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन पत्ता विचारण्याआधीच ‘मे आय हेल्प’ ची साद ते घालतात. या हजारो मार्गदर्शकांना ऑलिंपिकचे प्रेक्षक धन्यवाद देत आहेत. जगातील एका प्रचंड मोठ्या शहरातला वावर त्यांच्यामुळे फारच सोपा होऊन जातो. लंडन ऑलिंपिकच्या लॉजिस्टिक टीमला यासाठी सलाम.