Showing posts with label closing. Show all posts
Showing posts with label closing. Show all posts

Thursday, August 16, 2012

सलाम लंडन ! अलविदा !

बँड –बाजा- बारात सगळे छान झाले आणि निरोपाची घडी जवळ आली तशी लंडन
नगरीला पुन्हा हुरहूर लागली. बिदाईच्या कार्यक्रमापर्यंत अगदी जोषात,
नाचत –गात उत्साहात सगळे पार पडले. सतरा दिवस धगधगणारी ऑलिंपिक ज्योत
विझली. लंडनच्या ‘या’ घरचा लाडका ऑलिंपिक ध्वज रिओच्या ‘त्या’ घराकडे
सोपवण्यात आला, तेव्हा यजमानांच्या वतीने ते कार्य करणाऱ्या लंडनच्या
मेयरच्या चेहऱ्यावर सोहळा यथासांग पार पडल्याचे अपूर्व समाधान दिसत होते.

कार्याची धामधूम संपली तशी, ‘सोहळा कसा बाकी झकास झाला’, अशी चर्चा इथे
सुरू आहे. उद्घाटन सोहळा अर्थवाही होता, समारोपाला त्याची सर नव्हती, अशा
प्रतिक्रियाही येत आहेत. एकूणच ब्रिटीश संस्कृतीला गोंजारणारा, इंग्लिश
विकासाचे टप्पे दाखवणारा डॅनी बॉयलचा कार्यक्रम साहेबाला एकदम पसंत पडला
होता. त्यातून इंग्रजी अभिमान (आणि किंचित अहंकारही) कुरवाळला गेला. तसे
किम गॅविनच्या आफ्टर शो पार्टीतून ब्रिटीशांचे संगीत प्रेम आणि
सेलिब्रेशनचे कल्चर दिसून आले. पण या सगळ्यापेक्षा अधिक कौतुक सध्या होत
आहे, ब्रिटीश अॅथलिट्सचे. तिसऱ्या क्रमांकावर येऊन गेल्या शंभर वर्षातली
सर्वोत्तम कामगिरी इथल्या खेळाडूंनी यंदाच्या ऑलिंपिकमध्ये केली आहे.

आपल्या परंपरा, संस्कृती, ज्ञान, समृद्धी याबाबत पराकोटीचा अभिमान असलेला
साहेब, गुणीजनांचे कौतुक करताना मात्र हातचे काही राखत नाही. या
ऑलिंपिकमधून तेही जाणवले. सुरुवातीला आपल्या रुटीनमध्ये थोडा बदल करावा
लागणार, गर्दी वाढणार असे चुकचुकणारा साहेब ऑलिंपिक सुरू झाल्यावर मात्र
रंगात आला. चांगली कामगिरी करणाऱ्या इतर देशांच्या खेळाडूंनाही इथे
भरभरून प्रतिसाद मिळाला. युसेन बोल्टला तर ब्रिटीशांनी डोक्यावरच घेतले.
त्यातून आपल्या देशाची उत्तम कामगिरी पाहून तर अख्खा ब्रिटन ऑलिंपिकच्या
रंगात रंगला. टीम जीबीचे खेळाडू ब्रिटीश नागरिक असले तरी त्यामध्ये
वेगवेगळ्या वंशाचे, रंगाचे, वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगळी संस्कृती
जपणारे अनेकजण होते. कॉस्मोपॉलिटन लंडन शहराचे स्वरूप अगदी तसेच आहे.
सगळ्या भाषा, धर्म, संस्कृतींना सामावून घेतानाही आपला सांस्कृतिक अभिमान
जपणारी ही आजची लंडननगरी आणि टीम जीबीची या वर्षीची कामगिरी खरोखर
‘इन्सपायर द जनरेशन’ या ऑलिंपिक थीमला साजेशी ठरणारी आहे.

१७ दिवसांच्या या सोहळ्याची धामधूम गेली सात वर्षे सुरू होती. त्याचे चीज
झाल्याच्या समाधानात आता सगळे थोडे थंडावले असले तरी शहर लगेचच आपल्या
रुटीनला जुंपले गेले आहे. लंडनचा ईस्टएंड मात्र पुढचे काही दिवस भकास
दिसणार. जत्रा उठून दुसऱ्या गावी जाते, तेव्हा माणसे, दुकाने उठतात पण
पालं काही दिवस तशीच राहतात. ऑलिंपिकची पालं आता ईस्टएंडमध्ये उरली आहेत.
पुढचे अनेक दिवस ही रिकामी पालं त्या सगळ्या धामधुमीची, जल्लोषाची आणि
आनंदाची आठवण देत राहणार.